श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ देवदूत : अर्शद सईद भाग-१ ☆ श्री सुनील काळे ☆
अर्शद सईद
मी निसर्गचित्रकार म्हणून जगायचे ठरवले होते . निसर्गात सतत फिरायचे निसर्गाच्या सान्निध्यात राहून जी निसर्गदृश्ये मनाला भुरळ घालतात ती जलरंगात उतरवत राहायचे हा माझा आवडता छंद आहे .
मी पाचगणीत राहायचो . हे तर महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड. निसर्गाने येथे दोन्ही हाताने भरभरून निसर्गवरदान देलेले गाव .अशिया खंडातील सर्वात मोठे टेबललॅन्डचे पठार , त्या पठारावरून दिसणारी चिखली , पांगारी ,भिलार , तायघाट , भोसे , राजपूरी गावांची व्हॅलींची दृश्ये , स्ट्रॉबेरीची शेती , उंचच उंच सिल्व्हर वृक्षांच्या सान्निध्यातील ब्रिटीशकालीन शाळा व बंगले . हिलस्टेशनची टिपिकल उतरत्या छपरांची घरे , धोम धरणाचे चमकणारे पाणी , कमळगड , नवरानवरीचा डोंगर , महाबळेश्वरच्या सह्याद्री व प्रतापगडाच्या पर्वतांच्या विशाल रांगा , जावळीचे खोरे , वाईचे गणपती मंदीर ,पेशवेकालीन दगडी घाटांचा परिसर व मेणवलीचा घाट चित्रित करताना मी देहभान हरपून जायचो . त्या दृश्यानां कागदावर जलरंगात रेखाटण्याचा माझा छंद इतका विकोपाला गेला होता की माझ्या घरच्यांनी मला पुर्णपणे दुर्लक्षित केले होते.
मी अभिनवला शिकलो व तेथे माझी स्वातीशी मैत्री झाली . नंतर लग्नही झाले पण आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात रमलो नाही . चित्रं काढली तरी ती विकायची कशी याची आम्हाला जाणीव नव्हती . आम्ही तीनचार ठिकाणी स्वतःची आर्ट गॅलरी तयार करून प्रदर्शन आयोजित केले . पण त्यात आम्हाला यश आले नाही. त्यात एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला व नाईलाजाने मला व स्वातीलाही आर्टटिचरची नोकरी करावी लागली . चित्रकारीता पूर्ण बंद करून टाय सूटबूट घालून मी एका ब्रिटीश स्कुलमध्ये स्थिरावलो . या स्कूलमध्ये नाश्ता ,जेवण , राहण्यासाठी बंगला , लाईटबील फ्री व इतर सर्व काही सुविधा होत्या पण पगार खूप कमी होता . सकाळी सात ते रात्री सात पर्यंत बारा तासांची व्यस्त नियोजनबद्ध बांधीलकी होती . फक्त रविवारची एक सुट्टी . चारपाच हजारात सर्व गरजा भागविण्यासाठी संघर्ष करायला लागायचा. शेवटी कंटाळून आम्ही एकापाठोपाठ या पर्मनंट सुखाच्या नोकऱ्या कायमच्या सोडल्या व चित्रकार म्हणूनच जगायचे या वेड्या ध्येयाने प्रेरीत होऊन नवा प्रवास सुरू केला .
पाचगणी गावाजवळ असलेल्या रुईघर व्हॅलीत गणेशपेठच्या गावाबाहेर आम्ही एक जागा घेतली . या जागेला जायला सत्तर ऐंशी पायऱ्या चढून जायला लागायचे. घर बांधताना गाढवावर वाहून वीट वाळूची वाहतूक करावी लागली . समोर महू धरणाचे विहंगम दृश्य दिसणार होते . भिलार व कासवंड गावाची व्हॅली समोर दिसायची . आम्ही घरबांधणी सुरु केली आणि लवकरच सर्व प्रकारच्या सामानाची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणींमूळे घराचे बजेट दुप्पट झाले . लवकरच पैसे संपले . चित्रकलेची साधना करत आता जगायचा नवा प्रयत्न आम्ही सुरु केला होता पण स्थिर पगार नव्हता .महिना संपल्यानंतर घरसामान किराणा वस्तू तर विकत आणायला लागणारच होत्या. त्यात सामान वाहतूक व साफसफाईसाठी सुधाकर कांबळे नावाचा गडी कामाला ठेवला होता . त्याला महिन्याला पगार द्यायचे ठरले होते . जीवन जगणे एक कठिण समस्या होती . पैशांशिवाय जगणे म्हणजे मोठी परीक्षाच समोर आली होती .
कलावंत मंडळी थोडी वेडी असतात , त्यानां व्यवहारज्ञान नसते , जगरहाटीचे सर्वसामान्य जगणे त्यानां माहीत नसते असे सगळेजण म्हणतात ते खरे असावे . व्हॅन गॉग नाही का व सतत चित्र काढत फिरायचा तशीच काहीशी माझी मनाची अवस्था झाली होती . आणि येथे तर दोन व्हॅनगाँग होते .असे रोज कलेसाठी वेडे होऊन जगणे म्हणजे रोज विस्तवावरून चालणे असते . जाणूनबूजून नेहमीची तयार वाट सोडून काट्याकुट्यातून प्रवास करत एका अनोळख्या , नव्या अवघड मार्गाचा तो प्रवास असतो . आम्ही अशा काट्यातून प्रवास करत असताना वास्तवात जीवन जगणे किती कठीण असते याची प्रॅक्टीकल झळ आम्हाला वारंवार बसत होती . पण नोकरी करायची नाही या मतांवर मात्र आम्ही दोघेही ठाम होतो .
आम्ही कलावंत आहोत , आम्ही चित्रांसाठी जगतो ना? मग चित्रांनी आम्हाला का जगवू नये ? असा ठाम विचार मनात घेऊन आम्हीच निर्माण केलेल्या प्रश्नाला आम्हीच उत्तर देत होतो . ” चित्रांनीच आम्हाला जगवले ” पाहीजे हे नवे जीवनसूत्र डोळ्यासमोर ठेऊन जगत होतो . रोज चित्र काढणे, चित्र रंगवणे, चित्रमय राहणे म्हणजे जगणे. आपले जीवन जगणे म्हणजे चित्रनिर्मितीशी १००% प्रामाणिक राहणे या सुत्रांवर आमचे प्रयत्न सुरू असायचे . आलेला दिवस आम्ही आनंदाने चित्रमय जगत मस्त एन्जॉय करत होतो.
विहीरीत पाण्याचा साठा असला तरी विहिरीच्या तळाशी सतत जिवंत निर्झर वाहणारे झरे असावे लागतात तरच विहीर सतत पाण्याने भरत असते . तसे रोजचे जगण्यासाठी पुरेसा पैशांचा साठा असला तरी सतत नवीन पैशांचा पुरवठा करणारी यंत्रणा लागतेच . अन्यथा जवळ असलेला साठा एक ना एक दिवस कधीतरी संपतोच आणि ती वेळ आमच्यावर लवकरच आली . त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा .
महाबळेश्वर हे महाराष्टातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गिरिस्थान आहे . त्याच्या शेजारी असलेलया पाचगणीतही कधीकधी प्रचंड पाऊस पडतो . त्यात आम्ही डोगरांच्या व्हॅली फेसिंगला राहत होतो . पावसाळ्यात कडाक्याची थंडी , धुके व पावसाचा तडाखा कायम लक्षात राहील असा असतो , कारण आमच्या घरावर पत्रा बसवला होता . या पत्र्यावर पावसाचा जोर वाढला की दणादण पावसाच्या गारांचा , पाण्याचा वर्षाव व्हायचा . पडणाऱ्या गारा दगडासारख्या टणाटण पत्र्यावर आपटायच्या . निसर्गाचे हे रौद्र रूप आम्हाला त्यावेळी विलोभनीय वाटायचे . पावसाळ्यात पर्यटकांची संख्या खूपच कमी व्हायची . शाळा जून महिन्यांमध्ये नियमित सुरु झाल्यामुळे पालकवर्गही यायचा नाही . त्यामुळे चित्र विकत जाण्याची अजिबात शक्यता नसायची . अशा वेळी शांतपणे बसून चित्रनिर्मिती करणे एवढेच हातात असायचे . पण महिन्याच्या गरजा भागविण्यासाठी पैसे कसे कमवायचे ? याची चिंता नेहमीच असायची . असाच चिंतामग्न अवस्थेत असताना तो दिवस उजाडला. जो भावलेला व कायम मनात घर करून राहिला आहे .
त्यादिवशी भयानक गारांचा पाऊस कोसळत होता. गारांमुळे पत्र्यावर दगडांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते . सगळीकडे धुक्याचे इतके दाट पदर पसरले होते की पाचसहा फुटांवरचेही ढगाळ वातावरणामूळे काहीही दिसत नव्हते . दिवसभर पाऊस ,पाऊस आणि नुसता पाऊस . पावसामुळे हवेत गारठा वाढलेला होता . त्यात लाईट गेल्यानंतर तर नुसते बसून राहणे एवढेच हातात होते . मुख्य रस्त्यालगत मोठे लोखंडी गेट बसवले होते त्यानंतर सत्तर पायऱ्या चढून रात्रीच्या वेळी कोणी येण्याची शक्यता नव्हतीच . बंगल्यासमोर दुसरे गेट कुलूपबंद करून आम्ही दोघे निवांत बसून राहिलो होतो . बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता व मनात पैशांची, रोजच्या जगण्याची चिंता खूपच भेडसावत होती त्यामुळे थोडासा अंधारही भयानक काळोखासारखाच भासत होता .
रात्रीचे सातआठ वाजले असावेत . रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती . स्वाती जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली होती . हॉलमध्ये मी निराश मनाने बसून राहिलो होतो आणि अचानक खालच्या पायऱ्याशेजारचे गेट कोणीतरी उघडल्याचा आवाज आला . मी खाली डोकावले तर डोक्यावर हुडी असलेले जॅकेट घालून कोणीतरी अज्ञात तरुण व्यक्ती हळूहळू पायऱ्या चढून येत होती . पायऱ्या चढून आल्यावर मोठे बंगल्याचे गेट कुलूपबंद असल्याने मी घाबरलो नाही . त्या अनोळखी हुडीवाल्या तरुणाने दरवाजात उभा राहून मला हाक मारली .
मिस्टर काळे , प्लीज ओपन दी गेट !
आय वाँट टू बाय युवर पेटींग्ज .
मी तर चकीत झालो . एवढया मोठया दाट धुक्याच्या पावसात चिंब भिजलेली कपडे घालून सत्तर पायऱ्यांचा हा डोंगर चढून कोण अनोळखी इसम माझ्या दारात चित्र विकत घेण्यासाठी आला असावा ? कदाचित क्षणभर मीच स्वप्नात आहे की काय ? किंवा मनात जास्त प्रमाणात विचार करून मलाच काही भास होतोय आहे की काय? असेही मला वाटू लागले .
माय नेम इज अर्शद सईद .
आय एम स्टेईंग अब्रॉड.
बट आय स्टडीड इन न्यू इरा स्कूल .
आता हा पाचगणीतील एका शाळेचा माजी विद्यार्थी , ज्याची माझी कधीही भेट झाली नव्हती , अशा अज्ञात व्यक्तीने माझ्याकडे येऊन चित्र विकत घेण्याची इच्छा प्रकट करावी आणि तीदेखील अशा प्रचंड पावसात पूर्णपणे भिजत . मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले . आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले .
– क्रमशः भाग पहिला.
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566