श्री मकरंद पिंपुटकर
मनमंजुषेतून
☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
सन २००५, सप्टेंबर महिना. अमेरिकेतील अराकान्सास राज्याची राजधानी लिटल रॉक्समधील रॉबिन्सन शाळेचा नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. सगळी मुलं सुट्टी संपवून मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या उत्साहात होती.
इतिहास शिकवणाऱ्या मार्था शिक्षिकेच्या डोक्यात मात्र काही तरी वेगळंच शिजत होतं. मुख्याध्यापकांच्या परवानगीने, तिने तिच्या वर्गातली सर्व बाके काढून टाकली होती. वर्गात मुलं आली आणि मोकळा वर्ग बघून भांबावली.
” मॅम, बाकं कुठे आहेत ? आम्ही बसू कशावर ?”
” त्या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्हाला कसा मिळाला, हे जर तुम्ही सांगितलंत, तरच मी तुम्हाला बाकांवर बसू देईन.”
मुलांच्या चेहऱ्यावर भली थोरली प्रश्नचिन्हं…
“आम्ही चांगले गुण मिळवले म्हणून …” एकाने धीर करून सुरुवात केली. मार्थाची मान नकारार्थी हलली.
“आम्ही चांगले वागतो म्हणून …” आणखी एक प्रयत्न.
“चांगली वागणूक, चांगले गुण – या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेतच. पण बसायला बाक मिळण्यासाठी त्या पुरेशा नाहीत.” मार्था.
प्रत्येकजण आपापल्या परीने कारणं सांगत होता, पण योग्य उत्तर काही गवसत नव्हतं.
पहिला तास संपला, दुसरा, तिसरा, चौथा. मधली सुट्टी झाली. शाळाभर बातमी पसरली, मुलांनी आपल्या आईवडिलांना कळवलं, वृत्तवाहिन्यांना या घडामोडींचा सुगावा लागला. शाळेत गर्दी जमू लागली. तर्क वितर्क होऊ लागले.
होता होता शेवटची तासिका सुरू व्हायची वेळ आली. मार्थाचे विद्यार्थी वर्गात जमिनीवरच फतकल मारून बसले होते. विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार – कोणी शाळेच्या प्रांगणात, कोणी वर्गाच्या खिडक्यांमधून आत डोकावत होते.
“ठीक आहे. तुम्ही तुमच्या परीने योग्य उत्तरं देण्याचे चांगले प्रयत्न केलेत. आता मी तुम्हाला खरं उत्तर सांगते.” असं म्हणत मार्थाने वर्गाचं दुसरं दार उघडलं. त्या दारातून, हातात एक बाक घेऊन, एक पूर्ण गणवेशधारी माजी सैनिक वर्गात आला, त्याच्या मागोमाग आणखी एक, आणखी एक… सैनिकांनी ते सगळे बाक व्यवस्थित लावले आणि बाजूला उभे राहिले.
विद्यार्थ्यांच्या आणि खिडकीतून डोकावणाऱ्या पालकांना – पत्रकारांना हळूहळू थोडा अर्थबोध होऊ लागला होता.
“या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्ही मिळवलेला नाहीत. तो या सैनिकांनी तुम्हाला दिला आहे. काहींनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले असेल, काहींनी मनावर दगड ठेवून त्यांच्या तुमच्यासारख्या लहान मुलांना घरी ठेवलं असेल आणि स्वतः सीमेवर लढायला गेले असतील, बर्फ – ऊन – वारा – पाऊस यांना तोंड दिलं असेल, स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या असतील, जीवलग मित्रांना वीरगती प्राप्त होताना पाहिलं असेल – यांच्या त्यागाने, निरलस सेवेने हा हक्क तुम्हाला दिला गेला आहे. आता तुमची जबाबदारी ही आहे की चांगलं शिकून, चांगलं नागरिक बनून सैनिकांच्या या उपकाराचे तुम्ही उतराई व्हाल.”
मार्थाची ही सत्य कथा इथे संपली.
… पण ही कथा आपल्यालाही तितकीच लागू होते.
अगणित स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपले सैनिक, पोलीस कामावर तैनात आहेत म्हणून आपण सुरक्षित जगू शकतो. आपले आई वडील, शिक्षक या सगळ्या सगळ्यांनी खस्ता खाल्ल्या त्यामुळे आपल्याला हा जगण्याचा हक्क मिळाला आहे.
…. सचोटीने वागून त्यांच्या या त्यागाला सार्थ, यथार्थ बनवणं हे आता आपलं कर्तव्य हे आहे, नाही का ?
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈