☆ मनमंजुषेतून ☆ उडणारी म्हातारी ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते☆

बाबांची बाहेर जाण्यांची तयारी सुरू झाली. तसा सार्थक त्यांच्या मागे लागला ‘मी पण येणार…..मी पण येणार’ त्याचा हट्ट बघून बाबा म्हणाले ‘मला आता वेळ नाही. मी संध्याकाळी तुला बाहेर घेऊन जातो’. आता आपली इथं डाळ शिजत नाही म्हटल्यावर सार्थकने रडायला सुरुवात केली. शेवटी वैतागून बाबा म्हणाले ‘चल गाडीवरून एक फेरी मारून आणतो.’ हाताते डोळे पुसतच म्हणाला ‘मोठी….फेरी पाहिजे.’

‘बरं…चल. ‘म्हणत बाबांनी बुट घातले… ते गेले. सार्थकने अंगात शर्ट अडकवला, चड्डी खाली ओढली, हाताने केस सारखे केले धावत बाहेर आला. धावत येताना दरवाजा जोरात धडकला त्यानं लक्ष दिले नाही. नाही तर एरवी या कारणासाठी तासभर रडला असता. बाबांनी गाडी सुरू केली होती. नेहमी प्रमाणे बाबांच्या पाठीला पाठ लावून गाडीवर उलटा बसला. आता समोरून येणाऱ्या गाड्या, सायकली, माणसे सगळं, सगळं दिसणार होत. धावणारी प्रत्येक गोष्ट त्याला आवडे. गाडीने वेग घेताच यांच्या हाताची गाडी सुरू झाली. तोंडाने पी….प….पी..प..आवाज काढत मजा बघत होता. मधूनच दुस-याना बाय बाय करता होता. त्याची हलचाल झाली की बाबा म्हणत ‘ नीट बैस. हलू नकोस.’तेवढ्या पुरत शाहाणा होई. पुन्हा चळवळ सुरू.

समोरून येणारी हवेत उडणारी पांढरी शुभ्र मोठी म्हातारी त्याला दिसली. तिचा तो मुलायम स्पर्श त्याला खुप आवडे‌. आता त्याचा समोर ती होती. वाऱ्यावर झोके घेत ती जवळ येत होती. ती जशी जवळ येऊ लागली तशी आपण तिला कसे पकडावे यांचा तो अंदाज घेवू लागला. एकदा उजव्या बाजूला झाला, एकदा डाव्या बाजूला झाला. हलला तो.

‘नीट बैस. नाही तर.. उतर खाली जा चालत घरी.’

‘साॅरी बाबा. नीट बसतो’ एवढ्यात ती म्हातारी गुंगारा देऊन कुठे तरी पसार झाली होती. आज हातात आली असती जरा हात पुढे करायला पाहिजे होता. तो चुडपुटला. त्या दिवसा सारखी आज ही… म्हातारी हातातून निसटून गेली. क्षणात तो प्रसंग आठवला.

मधल्या सुट्टीत आम्ही खेळत होतो. खेळ रंगात आला होता. एक पांढरी शुभ्र म्हातारी उडत आली आणि  विन्याच्या खांद्यावर टेकली. माझे लक्ष गेले मी तिला पकडणार तेवढ्यात उडाली आम्ही सगळेजण खेळ सोडून तिच्या मागे धावलो, ती हसत हसत वरवर जात होती. जणू आम्हाला चिडवत होती… असेल हिंमत तर पकडा मला. प्रत्येकजण पकडण्यासाठी धडपडत होता. मला काही क्लिक झाले. मी धावत वरच्या मजल्यावर गेलो. ती म्हातारी खालून वर येत होती. आता कुठे जाईल? समोर होती ती जरा हात पुढे करून पकडण्याचा प्रयत्न केला.पण हातात येईना. तेव्हा कठड्यावर चढलो, पाय उंच केले, दोन्ही हात उंचावले,म्हातारीचा हलका स्पर्श झाला. मी पुढे झुकलो….. आता मी पकडणार एवढ्यातच मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. मी दचकलो. मी पडणार. मुलांनी आरडाओरड केली. मी घाबरलो मी पडणार…. एवढ्यात एका भक्कम हातानी मला धरले, मागे ओढले. माझे पाय लटपटत होते. पुढे पाटील सर उभे होते. भितीने माझी गाळण उडाली होती. आता सर ओरडणार, मारणार म्हणून मी अंगचोरून उभा होतो. छडी घेण्यासाठी हात पुढे केला. पण सरांनी मला जवळ घेतले ‘बाळा पुन्हा असे धाडस करू नकोस. पळ वर्गात. ‘मी सरांनकडे बघत राहिलो.त्यानी‌ डोळ्यांनी खुण केली जा म्हणून. मी तिथून पळालो. माझ नशिब मी वाचलो. पण ती पांढरी शुभ्र म्हातारी पळाली होती.

गाडीच्या ब्रेक बरोबर मी भानावर आलो. गाडी थांबली. घरात गेलो. पण मनातून ती उडणारी पांढरी शुभ्र म्हातारी जात नव्हती.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments