??

☆ दि लास्ट एम्परर… भाग-२ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

(याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का?) – इथून पुढे —

‘कारवाँ’ या चित्रपटाचं उदाहरण घ्या ना, तिथं नायिकेवर म्हणजे आशा पारेखवर चित्रीत झालेलं ‘दैया ये मैं कहां आ फसी’ हे गाणं आशाताईंनी गायलं आहे आणि अरुणा इराणीवर चित्रित झालेलं ‘दिलवर दिल के प्यारे’ हे गाणं दीदीचं आहे. अशी बरीच उदाहरणं देता येतील. ज्या सातत्यानं आशाताई गाणी गात राहिल्या, ते तर अफाट आहे, विस्मयजनक आहे.

‘उमराव जान’ हा चित्रपट म्हणजे आशाताईंचा अक्षरशः पुनर्जन्म होता. त्यांच्या कारकीर्दीचा मोठा आणि यशस्वी टप्पा तोवर होऊन गेला होता. एक प्रकारचा ठहराव त्यांच्या कारकीर्दीत आला होता. त्याच सुमारास अचानक ‘उमराव जान’ आला. दीदी त्यांच्या स्थानी अढळ होत्याच; तरीही संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’नंतर आशाताईंच्या गायकीला, लोकप्रियतेला मिळालेली झळाळी अभूतपूर्व होती आणि अगदी या क्षणापर्यंत ती उंची तशीच कायम आहे.

मी ‘प्रभुकुंज’समोरून जातो, तेव्हा मनात येतं, की भारताचा सांगीतिक इतिहास लिहायचा म्हटलं, तर या इमारतीच्या एकाच मजल्यावर किमान २५ हजार गाणी आहेत. काजव्यांनी लगडलेलं एखादं झाड असावं, तशी ही इमारत गाण्यांच्या लखलखत्या सुरांनी लगडलेली आहे. असा चमत्कार जगात कुठं तरी असेल का? साक्षात प्रभूचंच तिथं वास्तव्य आहे, असं म्हणायला हवं. या सगळ्या पुरुषप्रधान उद्योगामध्ये या दोन बायकांनी अक्षरशः राज्य केलं. देश पातळीवर असा दरारा असणाऱ्या केवळ तीनच स्त्रिया मी पाहिल्या आहेत. एक लता मंगेशकर, दुसऱ्या आशा भोसले आणि तिसऱ्या इंदिरा गांधी.

एस. डी. आणि आर. डी. यांची बरीच गाणी ईशान्य भारतातील लोकगीतांवर बेतलेली आहेत. तिथल्या पारंपरिक संगीताचं सौंदर्य या दोघांनी हिंदी गाण्यांत अतिशय नजाकतीनं ओतलं आहे. ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले’ हे ‘अजनबी’मधलं गाणं ऐकून बघा किंवा ‘हरे राम हरे कृष्ण’मधलं ‘कांची रे कांची रे’ ऐकून बघा. अशा खूप चाली तयार झाल्या असतील. आपण त्या दीदी किंवा आशाताईंच्या आवाजात ऐकतो, तेव्हा मूळ चालींचं ते वेगळंच रूप असतं. मूळ ट्यूनपासून केवळ स्फूर्ती घेतलेली असते, बाकीची निर्मिती संगीतकाराची असते, गायक ते अधिक फुलवतो.

‘बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासमोर दोन केवढे सक्षम पर्याय होते. एखादं गाणं दीदीला द्यावं, की आशाताईंना असा त्यांना प्रश्न पडत असेल,’ असं लोक अनेकदा म्हणतात; परंतु मला त्याहीपेक्षा पंचम यांचं जास्त कौतुक वाटतं. आशाताई तर त्यांच्या पत्नी होत्या; परंतु त्यांनी किती बरोब्बर वाटणी केली आहे बघा गाण्यांची. दीदींचं गाणं दीदींना, आशाताईंचं आशाताईंना. ‘हमशक्ल’ नावाचा चित्रपट होता, राजेश खन्ना आणि तनुजाचा. तनुजा वेडी असते आणि तिला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवलेलं असतं. त्यातलं गाणं आहे, ‘देखो मुझे देखो, कैसी मैं दिवानी हूँ’ हे गाणं ऐका. त्या गाण्याची स्केल बघा. एक तर पंचम यांनी ते बसवलंच खूप वेगळं आणि आशाताईंनी काय गायलंय बघा. व्यक्तिरेखा ‘वेडी’ आहे, तो वेडेपणा सुरांमधून बरोब्बर थ्रो करायचा, म्हणजे काय आव्हान होतं! त्यात सुरुवातीला आशाताई अगदी एखाद्या वेडीसारखं हसल्यादेखील आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या कडव्याची चाल पूर्ण वेगळी आहे. वरच्या पट्टीतून थेट खालच्या पट्टीत गाणं येतं; पण आशाताईंनी ते सहजपणे पेललं आहे. ‘जवानी दिवानी’मधल्या ‘जाने जां ढूंढती फिर रहीं हूँ’मधले चढ-उतार ऐका. ‘ज्वेलथीफ’मधलं ‘रात अकेली है’ ऐका. ‘अनहोनी’ या चित्रपटातल्या ‘मैने होठों से लगाई तो हंगामा हो गया’ यातली मदहोशी अनुभवा. राजेश रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’मधलं ‘आनेवाला, आयेगा आनेवाला’ बघा. त्या गाण्यात केवढे चढ-उतार आहेत. ही गाणी ऐकल्यावर मग तुम्ही थेट ‘ज्यूली’मधलं राजेश रोशननं संगीत दिलेलं भजन ऐका, ‘सांचा नाम तेरा…’ काय जबरदस्त भजन आहे. त्यात सोबत उषाताईही आहेत. या गाण्यात आशाताईंचा आवाज भक्तीरसात अगदी ओथंबलेला आहे. ही रेंज कल्पनातीत आहे.

आशाताईंना खाण्याची आणि खिलवण्याची आवड आहे. एकदा मी आशाताईंच्या घरी जेवायला गेलो होतो. संपूर्ण टेबल वेगवेगळ्या पदार्थांनी भरलं होतं. लॉबस्टर, प्राँझ, बांगडा, पापलेट, मटण, चिकन, बिर्याणी… तुम्ही नाव घ्या, तो पदार्थ टेबलवर होता. मी विचारलं, ‘आणखी कोण कोण आहेत जेवायला?’ त्या म्हटल्या ‘तुम्ही एकटेच आहात.’ मी हसून विचारलं, ‘अहो आशाताई, मला काय भस्म्या लागला का?’ तर मला म्हणाल्या, ‘सगळं खाऊ नका; पण सगळं खाऊन बघा. प्रत्येक पदार्थाची फक्त चव बघा.’ त्या दिवशी मला सुगरण या शब्दाचा खरा अर्थ कळला. गाणं असो की खाणं, प्रत्येक गोष्ट आशाताई जीव ओतून करणार. त्या साक्षात शारदा आहेत आणि साक्षात अन्नपूर्णही आहेत!

‘पुलं’चंच एक वाक्य आहे, ते सखाराम गटणेला म्हणतात, ‘करोडो लोकांमधून एक असा जन्माला येतो, ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणतात. बाकीच्यांचं फक्त आयुष्य असतं.’ दीदी आणि आशाताई यांच्या जगण्याला जीवन म्हणतात. त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केलं, सुसह्य केलं. त्यांना नव्वदी निमित्त त्रिवार शुभेच्छा !

– समाप्त – 

लेखक : श्री राज ठाकरे

प्रस्तुती –  श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments