सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 10 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
अंदमानच्या त्या रमणीय प्रवासाने माझ्या नृत्याच्या क्षेत्रात आणि माझ्या आयुष्यातही मानाचा शिरपेच खोचला गेला. अंदमान हून परतल्यानंतर मला ठिकठिकाणी नृत्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे येऊ लागली. अनेक छोट्यामोठ्या ठिकाणी अगदी गल्लीबोळातून सुद्धा मी माझे नृत्याचे कार्यक्रम सादर केले आणि माझ्या परीने सावरकर विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. माझी ती झेप आणि प्रयत्न खारुटीचा असला तरी माझ्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात आनंद निर्माण करणारा होता. माझ्या या जिद्दीची दखल मिरजकर यांनी सुद्धा घेतली आणि 2011 च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या मिरज महोत्सवांमध्ये “मिरज भूषण” हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केले.
अपंग सेवा केंद्राच्या संस्थेने मला “जीवन गौरव” हा पुरस्कार देऊन पुरस्कृत केले. मी शिकत असलेल्या कन्या महाविद्यालयात “मातोश्री” हा पुरस्कार देऊन माझ्या विशेष सन्मान केला.
माझा नृत्याचा हा सुवर्णकाळ सुरू असताना माझ्या गुरु धनश्री ताई यांच्या मनामध्ये वेगळाच विचार सुरू होता. त्यांना केवळ एवढ्यातच मला समाधानी ठेवायचे नव्हते. त्यांचा विचार ऐकून मला केशवसुतांच्या कवितेच्या ओळी आठवल्या, “खादाड असे माझी भूक, चकोराने मला न सुख कूपातील मी नच मंडूक, मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला हे साहे. ”
आणि ताईनी मला भरत नाट्य घेऊन एम ए करण्याविषयी चा विचार माझ्यासमोर मांडला. ज्याला मी सहजच होकार दिला. कारण ताईंना अगदी प्राथमिक स्वरूपातली आणि नृत्याच्या वर्गात छंद म्हणून नृत्य करणारी मुलगी नको होती तर त्यांना माझ्यातून एक प्रगल्भ, परिपक्व आणि विकसित झालेली नर्तिका हवी होती कि जिच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य “भरतनाट्यम” या प्रकाराचा प्रचार आणि प्रसार योग्यरीतीने सर्वत्र केला जावा.
ताइनी केवळ प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि स्वतःच्या मनावर अवलंबून न राहता त्यांनी माझे नृत्य त्यांच्या गुरु सुचेता चाफेकर आणि नृत्यातील सहकारी वर्ग यांच्यासमोर सादर करून, त्यांच्याकडून पोच पावती मिळवली आणि मला एम ए करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈