सुश्री नीता कुलकर्णी
☆ दृष्टी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆
जोशी काकांबरोबर दोन दिवसांची ट्रिप सुरू झाली. दीड तास झाल्यानंतर काकांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.
काका म्हणाले शेतातल्या पायवाटेने चालावं लागेल .चला …तुम्हाला जरा वेगळी गंमत दाखवतो…
तुम्ही कधी पाहिली नसेल….
थोडं पुढे गेलो लांबूनच काहीतरी दिसायला लागलं….
काय आहे ते ओळखायला येईना…
जवळ जाऊन बघितलं तर तिथे डोंगरी आवळ्यांची असंख्य झाडं तिथे होती.
झाडावर आवळ्यांचे अक्षरशः घोसच्या घोस लगडलेले होते.
त्यांचा मंद मधुर वास आसमंतात पसरला होता…
वाऱ्याबरोबर दरवळत होता… बघताना खूप मजा वाटत होती…
दृष्टी सुख घेत कितीतरी वेळ आम्ही उभे होतो….
ते टपोरे आवळे ती झाडं अजूनही स्मरणात आहेत….
काकांनी हे एक निराळच आम्हाला दाखवलं.
काका म्हणाले रात्री पण एक गंमत दाखवणार आहे……
दिवसभर आम्ही काही काही पाहत होतो….
आपण एका साध्या खेड्यात रात्री राहणार आहोत त्यांनी आधीच सांगितलं होतं.
साधस चवदार जेवण झालं आता रूमवर जायचं झोपायचं असं वाटलं….
तर काका म्हणाले चला आता
इतक्या रात्री त्या खेड्यात काय बघायचं?….
निघालो…
गाडी पुढे गेली अजूनच अंधार…
काजवे…या दिवसात नाही दिसत
भूतं वगैरे नाहीत ना…
आदिवासींचा नाच…..
कोणालाच अंदाज येई ना….
नाही म्हटलं तरी मनात भीती दाटून आली…..
एका जुनाट देवळाच्या पायरीवर आम्ही बसलो…
आता इथे काय पाहायचं….
काका म्हणाले
आकाश . …..
आकाशात काय?
आम्ही वर बघायला लागलो
आकाश असंख्य चांदण्यांनी भरलेले होते…
त्या गडद अंधारात चांदण्या स्पष्ट दिसत होत्या चंद्र आणि शुक्राची चांदणी गोड दिसत होती…
सप्तर्षी दिसले खूप वर्षानंतर…..
निसर्गाचं एक अलौकिक असं रूप आम्हाला दिसत होतं….
आकाशात इतक्या चांदण्या असतात…..
अंधारात डोळे जरा सरावले आणि आमच्या आसपास पसरलेले चांदणे आम्ही पाहिले….
त्यात चांदण्या खाली आपण बसलेलो आहोत हे आम्ही अनुभवले
सगळे निशब्द झालो होतो….
निरव शांतता ……
मी घरी गॅलरीत ऊभी होते आणि हे आज आठवले…..
काय कुठे आणि कसं बघायचं हे सांगणारे जोशी काका आठवले…..
विचार करता करता लक्षात आलं की जरा बाहेर बघितलं तर हे सुखाचं चांदणं दिसेल….
पण आम्ही ते बघतच नाही…
लांब लांब जाऊन काय काय पाहायच्या नादात हा हाताशी असलेला आभाळभर आनंद बघायचा राहूनच जातो का काय…..
एक सांगू….
बघा ना कधीतरी तुम्ही पण…
तुमचं तुमचं आभाळ
आताशा मी बघत असते
चांदण्यांबरोबर अजूनही काही काही दिसते….
कल्पनेच्या पलीकडलं…
अदभुत अस….
दरवेळेस काहीतरी मला वेगळंच दिसतं….
कधीतरी वर गेलेले ही दिसतात बोलता येत त्यांच्याशी…..
मनातल्या मनात….
आपलं सुखदुःख…
आयुष्याच्या वळणावर असे जोशीकाकांसारखे भेटले त्यांच्या अनुभवानी ज्ञानानी त्यांनी आमचं आयुष्य अधिक समृद्ध केलं आणि जगणं अधिक सुंदर झालं…..
© सुश्री नीता कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈