डॉ गोपालकृष्ण गावडे
☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
चार-पाच दिवसांपुर्वी मी माझ्या ” BBG-Books By Gopal Gawade ” या फेसबुक पेजवर सार्वजनिकपणे एक प्रश्न विचारला होता.
तीन प्रकारचे भारतीय असतात—-
१) सनातन परंपरेतील सर्वच गोष्टी खराब होत्या / आहेत असे मानणारे भारतीय
२) सनातन परंपरेतील सर्वच गोष्टी चांगल्या होत्या / आहेत असे मानणारे भारतीय
३) सनातन परंपरेतील जे चांगले होते/आहे त्याला चांगले आणि जे वाईट होते/आहे त्याला वाईट मानणारे भारतीय
तुम्ही कुठल्या प्रकारातील भारतीय आहात? कॉमेंट करून सांगा…. अशी ती पोस्ट होती.
तब्बल एक हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यासाठी सर्वांचे आभार ! या बाबतीत माझीही काही मते आहेत. ती आज मी मांडतो आहे.—-
परंपरा म्हणजे काय हे समजून घेण्याआधी परंपरा कशा निर्माण होतात ते पाहू. बहुतेक समाजात परंपरा धर्माधिष्ठित असतात. मग परंपरा समजून घेण्याआधी धर्म म्हणजे काय ते समजून घेऊ.
भारताबाहेर जन्मलेले धर्म भारतात येण्याआधी भारतात एकच धर्म होता. पण त्या वेळी भारतात धर्म या शब्दाची व्याख्या आजच्या व्याख्येपेक्षा पुर्णपणे वेगळी होती. आज उपासना पद्धतीला धर्म म्हटले जाते. श्रीकृष्ण गीतेत वारंवार धर्माचा आणि अधर्माचा उल्लेख करतो. श्रीकृष्णाने उल्लेखलेल्या धर्माचा आणि उपासना पद्धतीचा काडीमात्र संबंध नाही. आजच्या धर्माच्या व्याख्येनुसार एकाच कुटुंबात जन्मलेले कौरव आणि पांडव एकाच उपासना पद्धतीचे पालन करत होते. मग पांडव धार्मिक आणि कौरव अधर्मी का ठरले? कारण त्या काळी धर्म या शब्दाची व्याख्या ही ‘नैसर्गिक न्यायला धरून असणारी वर्तणुक’ अशी होत असे. नैसर्गिक न्यायाला धरून असणारी वर्तणुक दुरोगामी काळात व्यक्तीच्या पदरात आनंद आणि यश टाकते. समाजातील प्रत्येक घटक नैसर्गिक न्यायाने वागू लागला तर लोकांचा एकमेकांना त्रास होत नाही. अशा प्रकारे समाजातील बहुतांशी लोकांचे वर्तन धर्मसंगत झाले तर सामाजिक स्वास्थ्य आणि व्यवस्था टिकून राहते. असा समाजच प्रगती करू शकतो.
समाजव्यवस्था टिकवण्याच्या उद्देशाने जगात सर्वत्र नैसर्गिक न्यायावर आधारित नियम बनवले गेले आहेत. आपल्याकडे त्यांना ‘यम’ असे म्हटले गेले. जगातील बहुतेक न्यायव्यवस्थाही याच सूत्रांवर आधारित आहेत. यमधर्माला सोडून वागणारा व्यक्ती इतरांवर अन्याय करत समाजव्यवस्था बिघडवत असल्याने बहुतेक न्यायव्यवस्थेत अशा वागण्याला शिक्षा ठरवून दिल्या आहेत.
यमधर्मात नैसर्गिक न्यायाला पूरक असे पाच यम सांगितले आहेत.
१) अहिंसा – विनाकारण हिंसा करू नये.
२) सत्य – खरे बोलावे आणि ख-याची साथ द्यावी
३) अस्तेय – चोरी करू नये. केवळ आपल्या कष्टाचे ते आपले मानावे.
४) अपरिग्रह – गरजेपेक्षा जास्त साठवू नये.
५) ब्रम्हचर्य – ब्रम्हाचा म्हणजे ज्ञानाचा मार्ग निस्पृहतेकडे जाणारा आहे. ज्ञानमार्गाच्या विरूद्ध जाणारा मार्ग स्वार्थाकडे जाणारा असतो. निस्पृहतेकडे जाणारा ज्ञानाचा मार्गच आनंद आणि यश देणारा मार्ग आहे. अशा ब्रम्हमार्गाचे आचरण करणे म्हणजे ब्रम्हचर्य.
भारत वर्षात वरील पाच नियमांना धरून वागणे यालाच धर्म वा यमधर्म म्हटले आहे. या धर्माचे रक्षण करणाऱ्या देवाला यमदेव म्हटले आहे. याच यमदेवतेला मृत्यूची देवताही मानले गेले आहे. अशा प्रकारे भारतवर्षात अधर्माने वागणे हे मृत्यूसमान दुःखद मानले गेले आहे.
धर्माची व्याख्या स्पष्ट झाल्यावर आता परंपरांकडे वळूया. प्रत्येक समाजातील सूज्ञ कारभारी इतर लोकांच्या वर्तणुकीचा सतत अभ्यास करत असतात. लोकांच्या धर्माधिष्ठित कृती समाजहिताच्या ठरतात तर अधर्मी कृतींमुळे समाजाचे अहित होते. समाजासाठी हितकारक असणाऱ्या धर्माधिष्ठित कृतींची सूज्ञ लोक नोंद ठेवतात. अशा कृती वारंवार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जाते. समाजहिताच्या विरुद्ध कृती करणाऱ्यांना साम, दाम, दंड, भेद वापरून वठणीवर आणले जाते. यमधर्माचा आधार असलेल्या हितकारक कृतींना समाज परंपरा म्हणून स्विकारतो. बालवयातच काही गोष्टींचे संस्कार झाले तर मोठेपणी लोकांचे वागणे त्या संस्कारानुसार सहज घडते. म्हणून या परंपरांचे बाळकडू लहानपणापासून दिले जाते.
अशा प्रकारे यमधर्मावर आधारित वागण्याच्या अनेक परंपरा निर्माण झाल्या. ज्या देशात लोकांचे यमधर्मानुसार वागण्याचे प्रमाण कमी असे त्या भागाला अनार्य देश म्हटले गेले. ‘ आर्य ‘ या शब्दाची व्याख्या ‘ धर्मानुसार आदर्श (noble) वागणूक असणारा व्यक्ती ‘ अशी होती.
थोडक्यात काय तर, समाजाच्या दैनंदिन व्यवहारात चालू असलेल्या समाजमान्य संकल्पना, प्रथा आणि त्यानुसार लोकांची होणारी वागणूक म्हणजे परंपरा होय.
पण चांगल्या परंपरांसोबत वाईट परंपरा का निर्माण होतात? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्याची दोन कारणे आहेत.
१) स्वार्थी कारभारी सत्तेचा दुरूपयोग करत स्वतःच्या हिताच्या परंपरा सामाजिक परंपरांमध्ये घुसवतात.
२) परंपरा चांगल्याच असतात पण त्या परंपरा कशा प्रकारे समाजहित साधतात हे लोक हळूहळू विसरून जातात.
२) समाजाच्या परिस्थितीत कालानुरूप आमूलाग्र बदल झाल्याने चांगल्या परंपरा पुढे जावून कालबाह्य ठरतात.
सत्तेचा दुरूपयोग करून वाईट परंपरा कशा तयार होतात ते पाहू. प्रत्येक समाजात बलिष्ठ आणि दुर्बल असे दोन गट असतातच. काही समाजात बलिष्ट लोकांनी आपल्या हिताच्या काही परंपरा समाजाच्या अनेक परंपरांमध्ये नकळत घुसडल्या. पण बलिष्टाचे असे विनाकारण हित होणार म्हणजे दुर्बलांचे विनाकारण अहित होणारच. अशा दुष्ट परंपरांमधून दुर्बलांचे होणारे अहित आणि शोषण पाहून न्यायप्रिय लोकांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. पाश्चात्त्य देशांमध्ये रक्तरंजीत क्रांती झाल्या. सुदैवाने भारतीय समाजात केवळ वैचारिक समाजमंथन झाले. दोन्ही बाजूने तर्क दिले गेले. समाजाला जे जास्त तार्किक वाटले त्याचा विजय झाला. काही परंपरा टिकल्या तर काही नष्ट झाल्या. स्त्री शिक्षण बंदी, बालविवाह, सतिप्रथा, विधवा केशवपन, विधवा पुनर्विवाह बंदी, अस्पृश्यता, स्रीने केवळ चूल-मूल पाहणे, शिक्षणाचा अधिकार, व्यवसाय निवडीचा अधिकार, वेठबिगारी, जमिनदारी इत्यादी प्रथा परंपरा हळूहळू नष्ट झाल्या. जातीव्यवस्थेसारख्या काही दुष्ट परंपरा मात्र अजूनही थोड्या मूळ धरून आहेत.
– क्रमशः भाग पहिला.
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈