डॉ गोपालकृष्ण गावडे
☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
(जातीव्यवस्थेसारख्या काही दुष्ट परंपरा मात्र अजूनही थोड्या मुळ धरून आहेत.) – इथून पुढे —
आता चांगल्या परंपरामागील तर्क लोक का विसरतात ते पाहू. अनेक प्रथा-परंपरा पाळणा-या लोकांला आज त्यामागील तर्क सांगता येत नाही. तर्क माहित नसला तरी लोक परंपरा पाळतात. त्यामुळे ते आपल्या परंपरांचे कम्युनिस्टांसमोर तार्किक समर्थन करू शकत नाहीत. कधी कधी परंपरा कालबाह्य झाली तरी त्याची कल्पना लोकांना येत नाही. परंपरांमागील तर्क हळूहळू कसे नष्ट होतात यावर एक सुंदर प्रयोग झाला आहे. माकडांसाठी एक मोठा पिंजरा तयार केला गेला. पिंजऱ्याच्या मध्यभागी शिडी लावली आणि शिडीच्या वर केळ्यांचा घड लावला. विस माकडांना पिंजऱ्यात सोडले. केळी खाण्यासाठी कुठलेही माकड शिडी चढू लागले की सर्व माकडांवर थंडगार पाण्याचे फवारा मारला जाई. हळूहळू माकडांना या दोन गोष्टींमधील संबंध कळाला. मग बहुतेक माकडांनी केळ्याचा मोह सोडला. पण काही आगाऊ माकडे अधूनमधून शिडी चढायचा प्रयत्न करत. अशा माकडांमुळे काही वेळा थंड पाण्याचे फवारे सहन करायला लागल्यावर इतर माकडांनी शिडी चढायचा प्रयत्न करणाऱ्या माकडाला धरून चोप द्यायला सुरवात केली. अशा प्रकारे आगाऊ माकडांची खोड मोडली गेली. मग काही दिवसांनी शास्रज्ञांनी त्या पिंजऱ्यातील एक माकड काढून त्या जागी एक नवीन माकड पिंजऱ्यात सोडले. आता पिंजऱ्यातील माकडांवर थंड पाण्याचे फवारे मारले जाणार नव्हते. केळ्याच्या आशेने नवीन माकड लगेच शिडी चढू लागले. लगेच इतर सर्व माकडांनी त्याला धरून चोप दिला. त्याने जेव्हा जेव्हा हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याला चोप पडला. मग त्याने धडा घेत शिडी चढण्याचा नाद सोडून दिला. नंतर दुसरे एक जुने माकड बदलले गेले. त्या नव्या माकडानेही चोप खाऊन धडा घेतला. चोप देणाऱ्या माकडांमध्ये कधीही थंड पाण्याचा फवारा सहन न केलेले पहिले नवीन माकड पण होते. त्यानंतर शास्रज्ञांनी एक एक करत सर्व माकडे बदलून टाकली. आता थंड पाण्याच्या फवारा सहन करावा लागलेले एकही माकड पिंजऱ्यात नव्हते. तरी नव्याने आलेल्या प्रत्येक माकडाला शिडी चढण्याच्या प्रयत्नासाठी सर्वांकडून चोप खावा लागत होता. पिंजऱ्यातील कुठल्याही माकडाला हे माहित नव्हते की ते शिडी चढणा-या माकडाला आपण का मारत आहोत. पण परंपरेनुसार ते कृती मात्र करत होते. याबाबतचे जिवंत उदाहरण बेटी व्यवहारात देता येईल. पुर्वी आपल्या जातीतच मुलीचे लग्न कले जाई. त्या काळी व्यवसाय जातीनुसार ठरे. जात जन्माने ठरत असल्याने व्यवसायही जन्माने ठरे. सोनाराचे मुलं सोनारकाम करी तर लोहाराचे मुलं लोहारकाम करी. व्यवसायाच्या स्वरूपानुसार जातीतील प्रत्येक स्री-पुरूषाला शारीरिक आणि मानसिक श्रम पडत. प्रत्येक व्यवसायाच्या उत्पन्नक्षमतेला मर्यादा असत. त्यामुळे प्रत्येक जातीतील व्यक्तीच्या वाट्याला ठराविक आर्थिक परिस्थिती, ठराविक सुखसुविधा आणि ठराविक त्याग येई. प्रत्येक मुलं आपल्या आईबापाकडे पाहून मोठेपणी आपल्या वाट्याला येणाऱ्या सुखसुविधांचा आणि त्यागाचा अंदाज बांधत असे. त्याप्रमाणे मुलांची मानसिक आणि शारीरिक तयारी लहानपणापासून होत असे. श्रिमंत सोनाराच्या घरात वाढलेल्या मुलीने गरीब लोहाराच्या मुलासोबत लग्न केल्यास तिला सुविधांचा अभाव असलेल्या घरी रहावे लागे. लोहाराच्या स्री प्रमाणे भाता चालवणे तसेच तापल्या लोखंडावर घणाचे घाव घालण्यासारखे अंगमेहनीचे कामे करावी लागत. लोहाराच्या घरातील अशा वातावरणात राहण्यासाठी सोनाराच्या मुलीची मानसिक आणि शारीरिक तयारी झालेली नसे. तरी नव-यावरील प्रेमापोटी वा जननिंदेच्या भयापोटी शंभरातील ऐंशी मुली या नवीन वातावरणाशी कशाबशा जुळवून घेतील असे आपण गृहीत धरू. विस मुलींना मात्र नव्या वातावरणाशी जुळवून घेता येणार नाही. त्या शेवटी कंटाळून काडीमोड घेतील. तोपर्यंत जन्माला आलेल्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होईल. विस जोडप्यांचा काडीमोड झाल्यावर आता समाजात असे चाळीस लोक फिरू लागतील ज्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा अपुर्ण आहेत. ‘बुभुक्षिता किं न करोती पापम्’ यासुत्रानुसार शारीरिक गरजांसाठी भुकेलेले हे लोक समाज अमान्य संबंधांमध्ये लिप्त होत. आता हे चाळीस लोक आणखी चाळीस कुटुंबांसाठी डोकेदुखी ठरत. भावनांच्या आहारी जाऊन अनेक गुन्हे घडत. अशा प्रकारे कुटुंव्यवस्था बिघडे आणि त्यामुळे समाजव्यवस्थाही बिघडे. कुटुंबाचा व्यवसाय कुटुंबातील सर्व लहानथोरांचे शारीरिक आणि मानसिक अनुकुलन करवून घेत असे. व्यवसाय जातीने ठरत असल्याने सुज्ञ लोकांनी जातीत लग्न करण्याची परंपरा सुरू केली. आज परिस्थिती बदलली आहे. अंगभुत गुणवत्तेनुसार प्रत्येकाला कुठलेही व्यावसायिक शिक्षण घेण्याची आणि आपला व्यवसाय निवडण्याची मुक्त संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आज व्यवसाय जातीधिष्ठीत वा जन्माधिष्ठित राहिलेला नाही. त्यामुळे आज जातीत लग्न करण्याचा आग्रह धरणे वेडेपणाचे ठरेल. तरी पिंजऱ्यातील माकडांप्रमाणे परंपरामागील तर्क माहित नसल्याने आजही आंतरजातीय विवाहाला विरोध होतो आहे. काही ठिकाणी आॕनर किलिंग सारखे अपराधही घडत आहेत.
तर्क हरवला असला तरी ‘जातील लग्न करावे’ हे मुळ तत्व आजही समाजहिताचे आहे. फक्त ती जात जन्माधिष्ठित जात नसावी तर स्विकारलेल्या व्यवसायामुळे मिळालेली जात असावी. डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट, शिक्षक, इत्यादी व्यवसाय याच आजच्या काळातील जाती आहेत. डॉक्टर जातीच्या मुलीने डॉक्टर जातीच्या मुलाशी लग्न करावे. IT इंजिनियर मुलीने IT इंजिनिअर मुलाशी लग्न करावे. व्यवसायाईक शिक्षण निवडतानाच मुलांनी आपल्या व्यवसायात असणाऱ्या विशेष त्यागाशी आणि विशेष सुखसुविधांशी मानसिक समझोता केलेला असतो. एकाच व्यवसायात असलेल्या दोघां नवरा-बायकोला मिळणाऱ्या सुखसुविधा x त्याग समान आणि अपेक्षित असल्याने त्यांचे सहजीवन सुखद होते. दोघांना एकमेकांच्या कामातील समस्या माहित असल्याने ते दोघे एकमेकांना व्यवस्थित समजून घेतात आणि एकमेकांसाठी पुरक होतात. तेव्हा जातीत लग्न करण्याची परंपरा आजही व्यवहारी आहे. फक्त ती जात पुर्वीप्रमाणे जन्माधिष्ठित नाही.
चांगल्या परंपरा वाईट ठरण्याचे तिसरे कारण म्हणजे काळ असते. समाजव्यवस्था गतिशील असल्याने ती सतत बदलत असते. प्रत्येक समाजात काही प्रथापरंपरा हळूहळू कालबाह्य होतात. त्याची उपरती होऊन अशा प्रथापरंपरांना नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होते. पण ही प्रक्रिया प्रथापरंपरांच्या निर्मितीप्रमाणेच वेळखाऊ असते. नवीन प्रथापरंपरा स्विकारायला समाज जसा विरोध करतो तसाच तो जुन्या प्रथापरंपरा सोडायलाही विरोध करतो. पण काळाच्या ताकतीपुढे सर्वांना झुकावेच लागते. हळूहळू का होईना पण सर्व कालबाह्य प्रथापरंपरांचा नाश होतोच.
– क्रमशः भाग दुसरा
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈