श्री सतीश मोघे
मनमंजुषेतून
☆ बा गणेशा !… ☆ श्री सतीश मोघे ☆
बा गणेशा ! येण्याचे आवाहन करत असतांनाच तुझ्या विसर्जनाची तारीख आम्ही निश्चित करत असतो. मुर्तीच्या ठायी देवत्व पाहिल्यावर तिचे विसर्जन करणे योग्य नाही, या समर्थांनी सांगितलेल्या सीमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन आम्ही करत असतो. पण हा आमचा अपराध तू पोटी घालतोस. या उल्लंघनासाठी खरे तर आम्हाला तू दंड करायला हवा. पण तसे न करता उदंड उत्साह, आनंदाचे दान तू पदरात टाकून जातोस. ज्या प्रसन्न मुद्रेने येतोस, त्याच प्रसन्न मुद्रेने निरोप घेता होतोस.
‘तू अनादि, तू अनंत’ हे आम्ही जाणत का नाही ! तुझ्या व्यापक ब्रम्हस्वरूपाचा अनुभव घेऊन क्षणोक्षणी ब्रम्हचैतन्याची सळसळ आणि त्याच्या भेटीचा आनंद अनुभवणे, हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे, हे तूच दिलेल्या बुद्धीने आम्ही जाणून असतो. पण गरजा पूर्ण होऊनही इच्छा निर्माण होत राहतात. त्या अनंत इच्छांच्या मागे धावण्यात काळ लोटत असतो. तुला जाणण्यासाठी वेळच शिल्लक रहात नाही. पण तुला जाणणे, तुझे ध्यान करणे, किमान तुझ्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे, याची जाणीव मात्र आत खोलवर असते. ही जाणीवच वर्षातून दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, दहा दिवस का होईना, तुझ्यासाठी वेळ काढायला भाग पाडते. या दहा दिवसात तुझे व्यापक स्वरूप जाणणे शक्य नाही, हे आम्हाला ठाऊक असते. मग या व्यापक रूपाला आम्ही मुर्तीत पाहतो. छोट्याश्या मुर्तीच्या ठायी व्यापक ब्रम्हचैतन्याचा अनुभव घेऊ पाहतो. आभासी विश्वातले भास खरे मानून तुझ्या भेटीचा आनंद आम्ही घेऊ पाहतो. तू हा आनंद आम्हाला घेऊ देतोस. ‘तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुन खऱ्या देवा’,हे तुकारामानी म्हटलेले चालतं. विठ्ठलाने असं म्हणायचं नसतं, हे तू जाणतोस.काही दिवस का होईना, तहान भूक विसरून केवळ आपल्या भेटीच्या ओढीने येणाऱ्या भक्तांना दर्शनाचे, भेटीचे सुख घेऊ दयायचे असते, खरा भक्तीमार्ग सांगण्याची, दाखविण्याची ती वेळ नसते, हे भगवान पांडुरंग जाणतो, तसेच तुही जाणतोस. व्यग्र जीवनात वेळ काढून तुझ्या आगमनाची प्रतिक्षा करणाऱ्या, तुला स्थापन करणाऱ्या, तेवढे दिवस का होईना तुझी मनोभावे पूजा करणाऱ्या आम्हा भाविकजनांना मुर्तीच्याच ठायी भेटीचा, चैतन्याचा अनुभव तु सुखेनैव घेऊ देतोस.
मुर्तीच्या रुपाच्या बाबतीत तर पांडुरंगाच्याही एक पाऊल तू पुढे. पांडुरंगाची मुर्ती ठरलेली. काळ्या पाषाणाची, कटेवरी कर, कानी कुंडले. तुझे मात्र तसे नाही. तुला घडविण्याची सृजनशीलता आणि कल्पकता यांना तू पूर्ण वाव देतोस. तू म्हणजे एखाद्या चित्रकाराचे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. त्यात तुला कोणीही, त्याला हवे तसे पाहू शकतो, हवे तसे घेऊ शकतो. कुणी तुला मूषकावर बसवतो, कुणी नंदीवर, कुणी कैलासावर तर कुणी चांद्रयानावर. विशिष्ट वाहनाचाही तुझा आग्रह नाही. कुणी तुला उभे ठेवतो, कुणी बसवितो यावरही तुझा आक्षेप नाही. केवळ गजानन आणि लंबोदर या दोन गोष्टी अंतर्भूत करून हवे तसे घडवून घ्यायला तू तयार असतोस.मुर्ती, बनविण्यापासून ते विसर्जनापर्यंत तुझ्या कोणत्याही अटी, शर्ती नाहीत. आम्हाला हवे तसे तू करू देतोस. आम्ही म्हणू तेव्हा निरोप घेतोस. बरे, निरोप घेतांना पुन्हा दूषणे लावत नाहीस वा खडे बोलही ऐकवत नाहीस. खरे सांगू… तू जेवढे आम्हाला मनाप्रमाणे करू देतोस, वागू देतोस ना, तेवढे दुसरे कुणीच करू देत नाहीत, वागू देत नाहीत. म्हणुनही असेल कदाचित….. तू आम्हाला सर्वांहून अधिक प्रिय आहेस.
तुझी मूर्ती साकारण्याचे कौशल्य तरी आमच्याकडे कुठे आहे ? आमच्यापैकी बोटावर मोजता येतील एवढयाच भाविकांना हे जमते. बाकी आम्ही सारे मुर्तीकाराने त्यांच्या कल्पकतेतून घडविलेल्या मूर्तींमधून तुझी मूर्ती निवडतो. ती निवडतांनाही मोजमाप घेऊन. घरात तुझ्यासाठी जागा किती, हे मोजतो. त्यानुसार तुझी उंची ठरवतो. मुर्तीकाराने तुझी स्थापना केली असते, प्रदर्शन सजवले असते.त्यातून आमच्या मोजमापात बसणाऱ्या मुर्तीची आम्ही निवड करतो. तुला आणायचे मोजूनमापून. तुला ठेवायचे तेही काही दिवस मोजून. आमचे सर्वच मोजून मापून. पण तू मात्र या मोबदल्यात अमाप उत्साह आणि चैतन्याचे माप पदरात टाकून जातोस. समोरचा कितीही मोजून मापून करत असो, आपण मात्र स्वतःला उधळतांना हिशेबी राहू नये, अशी छान शिकवण कृतीतून देऊन जातोस.
काही तुला विसर्जीत करतात, काही करत नाहीत..कायमचे घरात ठेवतात.तर काही ‘मुर्तीत देवच नसतो’, अशी वैचारिक बैठक असल्याने तुला स्थापितही करत नाहीत. महर्षि व्यासांचे महाभारत तुझ्या लेखणीतून उतरलेले. त्यातले अनेक दाखले देऊन, तुला विरोध करणाऱ्यांना खरे तर तू निरुत्तर करु शकतोस. पण तसे तू करत नाहीस. भूतलावावर आल्यावर समाजात वावरतांना सर्वांनीच तुला मोठे मानले पाहिजे, असा तूझा आग्रह नाही. विरोधी विचारधारेचाही तू आदर करतोस. तात्विक वाद घालून तिचे खंडन करुन स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचाही तुझा स्वभाव नाही. समाजभान राखण्यासाठी अंगी सहनशीलता, सहिष्णूता असणे आवश्यक असते, याचा परिपाठ तू घालून देतोस. प्रत्येक वेळी आपल्याविरुद्ध कुणी काही बोलले तर लगेच त्याच्या अंगावर धावून जाऊन, तात्विक वाद घालून, त्याच्या बोलण्याचे खंडन करुन, आपला तात्विक विजय उन्मादाने साजरा करायचा नसतो. समोरच्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार मान्य करायचा असतो, याची शिकवणच तू देत असतोस. म्हणूनच असेल कदाचित…. तुझे आगमन, वास्तव्य आणि विसर्जन यात आम्ही प्रत्येकजणच दुसऱ्याला स्वातंत्र्य देत असतो. तेवढे दिवस तरी दुसऱ्याच्या घरात डोकावून न पटणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणे, वाद घालणे आम्ही टाळत असतो.
बा गणेशा ! तुझ्या आणखी एका गुणाचे आम्हाला खूप अप्रूप वाटते. सुखाने जगण्यासाठी तूझा हा गुण आत्मसात करायलाच हवा. हा गुण म्हणजे जीवन ‘तटस्थ साक्षीभावाने’ जगणं. खरं तर आम्हीच तुला बोलावतो. स्थापित करतो. पण तीन वेळच्या आरत्या सोडल्या तर तुझ्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळही नसतो. यावरही तुझा आक्षेप नाही. सकाळची फुलं तुला संध्याकाळी… बऱ्याचदा तर दुसऱ्या दिवशीही अर्पण करतो.. यावर तुझा आक्षेप नाही. नैवेद्य, आरती कधी वेळेत तर कधी उशीरा, तरीही तूझा आक्षेप नाही. हळदी, कुंकू थोडेसे जास्त लागले तरी लागलीच रुमालाने ते पुसणाऱ्या स्त्रिया आम्ही पाहतो. पण येणारा प्रत्येकजण तुला हळदी-कुंकू लावत असतो. बऱ्याचदा ते तुझ्या डोळयातही जाते. तिकडेही आमचे लक्ष जात नाही, गेले तर बऱ्याच उशिरा जाते. त्याविषयी तुझी तक्रार नाही. स्थापना करतांना वर्षानुवर्षे तेच दागिने घातले तरी तुझी तक्रार नाही, विसर्जन करतांना दागिने काढले तरी तुझी तक्रार नाही. भक्तीगीतं लावली म्हणून तू अधिक प्रसन्न नाहीस वा नको ती गाणी लावली म्हणून तू नाराज नाहीस. ही तुझी तटस्थ साक्षीभावाने राहण्याची वृत्ती, हे आमचे खरे आकर्षण आहे. मधूनच वाटते, तू प्रकट व्हावेस, खडे बोल ऐकवावेस, खरे काय हे सांगावे. पण तू असे करत नाहीस.
तटस्थता कधी अज्ञानातून येते,तर कधी ज्ञानातून. तुझी तटस्थता ज्ञानातून आलेली. तू जाणून असतोस.. तूझ्या खऱ्या, व्यापक, अनंत रूपाला. कोणी मोठी मुर्ती केली म्हणून तू मोठा होत नाहीस, लहान मूर्ती केली म्हणून लहान होत नाहीस, हे तू जाणून असतोस. आपल्या व्यापक स्वरूपाचे ज्ञान असले आणि या जगात आपण काही दिवसाचे पाहुणे आहोत याचे भान असले की घडणाऱ्या गोष्टींकडे तटस्थपणे साक्षीदार म्हणून पाहता येते. त्यातल्या काही मनासारख्या आहेत म्हणून उन्माद नाही आणि काही मनाविरुद्ध आहेत म्हणून दु:ख, तक्रार नाही, असे होऊन जाते. आमच्यासाठी तू जडमुर्तीत येतोस. आमच्या आनंदाचे निमित्त होतोस. तुला निमित्त करून, आनंद भोगुन आम्ही तुझे विसर्जन केले तरी पुन्हा मूळ व्यापक रुपात विलीन होण्याच्या आनंदात ‘तुझा केवळ वापर आम्ही केला’, अशी नैराश्याची भावना नाही. बा गणेशा ! द्यायचाच झाला तर होणाऱ्या गोष्टींकडे तटस्थ साक्षीभावाने बघण्याचा हा तुझा दृष्टीकोन आम्हाला कायमचा देऊन जा. म्हणजे दीड दिवसाचा आमच्या आयुष्यातला हा आनंदसोहळा वर्षभर सुरु राहील.
बा गणेशा ! या आपल्या संवादातही आता निरोपाची वेळ झाली आहे. खरे तर तू आमचा, सृष्टीचा निर्माता. पण आमच्या हातून निर्माण होतोस, आमच्या हातून विसर्जित होतोस. कधी विसर्जित करायचे, हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला देतोस. जन्माला आला त्याला विसर्जित व्हायचे आहे आणि जो जन्माला घालतो त्यालाच, विसर्जित कधी करायचे याचा अधिकार असतो, या दोन गोष्टी तू ठसवतोस. या गोष्टी आम्ही नक्कीच ठसवून घेऊ.तू ठरवशील त्याप्रमाणे विसर्जन स्वीकारू. तोपर्यंत आम्हाला सांभाळून घे.
निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी…
© श्री सतीश मोघे
मो – +91 9167558555
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈