डॉ गोपालकृष्ण गावडे
☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
(पण काळाच्या ताकतीपुढे सर्वांना झुकावेच लागते. हळूहळू का होईना पण सर्व कालबाह्य प्रथापरंपरांचा नाश होतोच.) – इथून पुढे —-
परंपराबद्दल माझी समज मी आपल्याला सांगितली. पण खरे विचाराल तर मी विचारलेला प्रश्न सनातन परंपरांबद्दल नव्हताच मुळी! उत्तर देणाऱ्या व्यक्तीचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे हे तपासण्यासाठीची ही परीक्षा होती. तुमच्या मनाला हा प्रश्न पडेलच की तुमची परीक्षा घेऊन मला काय मिळाले? मला तुमच्याकडून काहीच नकोय. उलट मलाच तुम्हाला काही तरी द्यायचे आहे. मला तुम्हाला द्यायचे आहे सकारात्मक विचारांनी जगण्याचे भान!
आमुक समाजातील सर्व परंपरावर चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत असा जनरल शिक्का मारणा-या व्यक्तीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यातून दिसतो. सर्व चांगल्या परंपरा असणारा आदर्श समाज कुठेही अस्तित्वात नाही. तसेच सर्वच परंपरा खराब असणारा समाजही कुठे अस्तित्वात नाही. प्रत्येक समाजात काही चांगल्या तर काही वाईट प्रथापरंपरा आहेत. परंपराच काय तर आपल्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग वा संस्था यापैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. आपण स्वतःतरी कुठे परिपुर्ण आहोत? मग जगाकडून परिपुर्णतेची अपेक्षा ठेवायचा अधिकार आपल्याला कसा असेल?
आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचार आपल्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात ते पाहू. नवरा बायकोचे उदाहारण घेऊ. नवरा-बायको दोघेही परिपुर्ण नाहीत. दोघांमध्येही चांगले-वाईट गुण आहेत. बायकोने नव-यातील केवळ चांगले गुण पहायला सुरवात केली. या सकारात्मक विचारांमुळे काही वेळात ‘आपल्याला देवासारखा नवरा मिळाला आहे’ अशी भावना बायकोच्या मनात निर्माण होते. ही भावना बायकोच्या मनाला सुखावणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी समाधान निर्माण होते. आता त्याच बायकोने त्याच नव-यामधील सर्व दुर्गुण पहायला सुरूवात केली. तासाभरात तिला जाणवेल की ‘मला राक्षस नवरा मिळाला आहे’. ही भावना बायकोच्या मनात दुःख निर्माण करणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी असमाधान निर्माण होणार आहे. दुःख आणि असमाधानाने भरलेले मन सुख आणि समाधान शोधायला बाहेर पडते. आनंद आणि समाधान मिळवायचा एकच मार्ग आपण शिकलेलो असतो. अपेक्षा ठेवायच्या आणि त्या पुर्ण करायच्या. अपेक्षा पुर्ण झाल्या की मन, तात्पुरते का होईना पण, आनंदी आणि समाधानी होते. या अपेक्षा असतात तरी कुठल्या? कुणाला सत्ता हवी असते तर कुणाला संपत्ती मिळवून आनंद मिळतो. कुणी प्रतिष्ठेच्या मागे लागतो तर कुणी मुलांच्या यशात आनंद शोधतो. पुरेशा प्रमाणात सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि गोड नातेसंबंध मिळालेले असतील तर अशा व्यक्तीचे आयुष्य यशस्वी झाले असे आपण म्हणतो.
अपेक्षांच्या शेवटी थोडाफार आनंद असला तरी अपेक्षापुर्तीचा मार्ग मात्र काटेरी आहे. यशाची अपेक्षा निर्माण झाली की सोबत अपयशाची भीती आपोआप निर्माण होते. भीती ही मोठी त्रासदायक भावना आहे. तिचे लवकरात लवकर निरसन करणे क्रमप्राप्त ठरते. मग भीतीचे कारण आणि उपाय शोधण्यासाठी चिंतन चालू होते. यशाच्या अपेक्षेच्या प्रमाणात अपयशाची भीती वाढते आणि भीतीच्या प्रमाणात चिंतन गहन होत जाते. चिंतन गहन झाले की त्यालाच चिंता असे म्हणतात. चिंता मनासाठी अतिशय खराब असते.
“चिता मृत शरीरको एक बार मे जला डालती है.
लेकीन चिंता जिंदा मन को हर वक्त जलाती रहती है.”
प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थांपैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत. बघायचे काय याचे स्वातंत्रही प्रत्येकाला आहे. तरी केवळ वाईट गोष्टी बघून स्वतःच्या मनात दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंता अशा त्रासदायक भावनांना जन्म देणे कितपत शहाणपणाचे आहे? हा एक प्रकारे आत्मघातच आहे.
मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांपैकी ८०% विचार हे आत्मघाती नकारात्मक विचार असतात. यामागे नेमके कारण काय? सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी समोर असताना लोक स्वतःलाच दुःखी करणाऱ्या नकारात्मक गोष्टीच का पाहतात?
जसे पाणी चढाकडून उताराकडे सहज वाहते तसाच मानवी मनाचा सहज प्रवाह सकारात्मकतेकडून नकारात्मतेकडे असतो. आपल्या आजुबाजुला असलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी या अपेक्षित असतात. अपेक्षित गोष्टी जागेवर असतील तर मेंदू त्याची नोंद सुद्धा घेत नाही. उदा. गृहणीने नेहमीप्रमाणे जेवनात अपेक्षित मीठ घातले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. याउलट सर्व नकारात्मक गोष्टी या अनपेक्षित असतात. उदा. नेहमी सुग्रण स्वयंपाक करणाऱ्या गृहणीने जेवनात जास्त किंवा कमी मीठ घातले तर सर्वजन लगेच ते बोलून दाखवतात. अनपेक्षित गोष्टी समोर आल्या तर आपल्या मेंदूला धक्का बसतो. मेंदू त्याची तात्काळ दखल घेतो. त्या धक्कादायक नकारात्मक गोष्टीची कारणमिमांसा होते. ती गोष्ट परत घडणार नाही यासाठी उपाय शोधले जातात. या चिंतनात एका नकारात्मक विचारांमधून दुसरा नकारत्मक विचार जन्माला येतो. प्रत्येक नकारात्मक विचाराचा शेवट दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंतेत होतो.
प्रत्येकाला मनाच्या सहज प्रवाहाविरूद्ध नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे प्रयत्नपुर्वक जायचे आहे याचे भान देण्यासाठी हा लेख लिहला आहे. मी सुद्धा हीच धडपड करतो आहे. मनाच्या प्रवाहासोबत दुःख आणि असमाधानाकडे वाहावत जायला प्रयत्न करावे लागत नाहीत. पण प्रवाहाविरूद्ध सुख आणि समाधानाकडे आयुष्याची नाव न्यायची असेल तर मात्र तिला सतत वल्हवावे लागते. हे भान सुटले आणि वल्हवणे थांबले की लगेच आपली नाव नकारात्मतेकडे वाहू लागते. एका बाजुला आपल्या वाट्याला आलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी प्रयत्नपूर्वक शोधून त्यांची प्रशंसा झालीच पाहिजे. दुसऱ्या बाजुला धक्कादायकपणे समोर आलेल्या नकारात्मक गोष्टींना चघळत बसण्यात आत्मघात आहे याचे सदैव भान ठेवावे लागणार आहे. पण कुणी कर्तव्यास चुकले तरी पदरी दुःखच पडते. त्यामुळे नकारात्मक गोष्टी सुधारण्यासाठी आपल्या आवाक्यात असणारी आवश्यक ती कृती करून झाली की नकारात्मक गोष्टींशी गांधींजींच्या तीन माकडांप्रमाणे वागायचे.
बुरा मत देखो
बुरा मत बोलो
बुरा मत सुनो
नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे जाण्याचे भान प्रत्येकामध्ये सदैव जागृत व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
– समाप्त –
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈