श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ अमूर्ततेचा शोध… ☆ श्री सुनील काळे ☆
भारतात अनेक जातींची, वेगवेगळ्या धर्मांची, विविध पंथाची, विविध भाषांची , वेगवेगळ्या विचारसरणींची , वेगवेगळा पेहराव करणारांची जशी रेलचेल आहे तशीच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत . काहीजण वास्तववादी चित्र काढतात , काहीजण व्यक्तीचित्र रेखाटण्यात तर काहीजण निसर्गचित्रात माहीर असतात . काहीजण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेली असतात . या सर्व चित्रकारांची माध्यमेही वेगवेगळी असतात . काही चित्रकार जलरंगात , काही तैलरंग तर काहीजण ॲक्रलिक रंगाचा वापर करतात . एकाच विषयाच्या , वेगळ्या अमूर्त आकारांच्या चित्रशोधकार्यात कलाकार मंडळी कधी पाहून रंगवत असतात तर काहीजण प्रथम रंगवतात व नंतर पाहत असतात . प्रत्येकाची रंगवण्याची पद्धती वेगवेगळी असते .माझा एक जिज्ञासू चित्रकार मित्र भेटला की मला नेहमी अमूर्त चित्रांविषयी माहिती विचारायचा पण त्याच्या प्रश्नानां उत्तरे देताना मी भांबांऊन जायचो कारण अँब्स्ट्रॅक्ट चित्र काढणे एक अवघड आणि तितकीच सोपी पण आव्हानात्मक व मानसिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे मला आजही प्रामाणिकपणे वाटते .
1993 साली उमेदीच्या काळात मी मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीटला पारशी डेअरी शेजारी असलेल्या प्रसिद्ध केमोल्ड फ्रेम्समध्ये कामाला होतो . त्याठिकाणी अनेक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे फ्रेमिंगसाठी येत असत . एके दिवशी खास मजबूत पॅकींग केलेले एक मोठे पार्सल खास स्पेशल गाडीत घेऊन कंपनीचे मालक केकू गांधी स्वतः वर्कशॉपला आले होते . एका मोठ्या चित्रकाराचे चित्र खास स्पेशल महागडी फ्रेम करण्यासाठी आले होते . ते अमूर्त चित्र एक कोटी रुपयांचे असून त्या चित्राला कंपनीद्वारे खास विमा संरक्षण केले होते . त्यामूळे त्या चित्राची फ्रेम काळजीपूर्वक करून घेण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे होते .
वर्कशॉपचा इन्चार्च म्हणून मी काम करत असल्याने त्या चित्राची पूर्ण जबाबदारी माझी होती . त्यासाठी मी सर्व तयारी केली . पण मलाही चित्र समजून घेण्याची उत्सुकता मोठी होती . वर्कशॉपला एक मोठे बर्हीवक्र भिंग घेऊन ते अमूर्त चित्र इतके महाग का आहे याचाच शोध घेण्याचे ठरवले . ते चित्र पूर्ण रात्रभर अगदी जवळून भिंगातून मी पहात होतो . कधी दूरून पाहायचो . त्या अदभूत चित्राचे आकार , रंगाचे ॲप्लीकेशन भलतेच वेगळे वाटत होते . कशाचा कशालाच मेळ लागत नव्हता . कधी वाटायचे फाटक्या विविध रंगाच्या लहानमोठ्या चिंध्या एका लाकडाच्या तुकड्यात अडकल्या आहेत . तर कधी वाटायचे ह्या छोट्या छोट्या आकारांच्या रंगाच्या फटकाऱ्यांमूळे या चित्रात एक वेगळी रंगसंगती तयार झाली आहे . संपूर्ण चित्रात एक निर्जर निवांत शांतता पसरली आहे असे वाटायचे. कधी वाटायचे एक निवांत बेदरकार वाहणारी नदी एका नादभऱ्या तालात मनसोक्तपणे , स्वच्छन्दीपणे वहात आहे . ते चित्र गतिमान वाटायचे तर काही अँगलमधून शांत वाटायचे . अनेकवेळा पाहूनही मला त्यावेळी त्याचा अर्थ नक्की समजला नव्हता . त्या चित्राचे न समजलेले आकार , रंग , चित्राची रचना कित्येक वर्ष कायमची डोक्यात ठाण मांडून बसलेली होती . ते अमूर्त चित्र नक्कीच विसरण्यासारखे नव्हते .
पावसाळा संपल्यामूळे आज सकाळी सगळीकडे स्वच्छ वातावरण होते . मेणवली गावाजवळ कृष्णा नदी वाहते तेथे निवांतपणे फिरायला नदीकिनारी गेलो होतो . सगळीकडे हिरवागार परिसर , थंड हवा व नुकतीच सुर्याची किरणे पडत असल्याने पाण्याचा खळखळाट व त्या पाण्यावरील प्रतिबिंब मोत्याचा सर पडल्यासारखे चमकत होते . अनेकविध पक्षांच्या चिवचिवटामूळे आसंमतात एक वेगळे नादभरे संगीत कानांवर पडत होते .
नदीच्या किनाऱ्यावर चालताना मात्र एकदम वेगळेच अद्भूत चित्र दिसले . नदीच्या प्रवाहातून वहात आलेली घाण ,माणसांनी टाकलेली रंगीबेरंगी फाटलेले कपडे , प्लास्टीकच्या पिशव्या , बारदाने , थर्माकोलच्या वस्तू , बिसलरीच्या बाटल्या , जुन्या बॅगा , वापरलेल्या बूटांच्या व चपलेच्या जोड्या , झाडांच्या मोठमोठ्या बुंध्यावर व लटकत्या फांद्यांवर लोंबकळत होत्या .
ती लाल ,पिवळी , जांभळी असंख्य अनेकरंगी छोटी छोटी फाटकी लफ्तरे निसर्गाच्या मोठ्या कॅनव्हासवर जणू अमूर्त चित्रांसारखी वाऱ्यावर डोलत होती . त्याच्या एकत्रित असण्याने ,फडकण्यामूळे त्या कॅनव्हासला एक अद्भूत गुढता निर्माण झाली होती . त्या चमकणाऱ्या सुर्यकिरणांच्या साक्षीने तो कॅनव्हास आता एका मोठ्या अमूर्त पेंटींग असल्यासारखाच भासत होता .
तीस वर्षानंतर त्या अमूर्त चित्राचा विषय आता मनामध्ये हळूहळू पूर्णपणे उलघडत होता . माणसांनी टाकलेल्या अनेक बिनवापराच्या वस्तू , माणसांनी टाकलेला कचरा माणसांसाठीच किनाऱ्यावर मुक्तपणे सोडून नदी मात्र स्वच्छपणे पाण्याच्या प्रवाहाचा खळखळाट करत नव्या उर्जेने , नव्या उमेदीने , नव्या धेय्याने , नव्या आकांक्षेने वाहत चालली होती
नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . .
कोणतीही अपेक्षा , कोणतीही गुंतागुंत , कोणतीही तक्रार न करता ,मनात कोणतीही आढी न ठेवता स्वच्छ पाण्यासोबत नदी वेगाने वाहत चालली होती
नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . . .
आपणही कोणती अढी , कोणत्या इच्छा , कोणतेही वादविवाद डोक्यात न ठेवता नदीसारखे स्वच्छ वहात राहत राहीले पाहीजे कशातही गुंतून न राहता. सगळा जात , पात, धर्म , उच्च , नीच आशा , अपेक्षांचा साचलेला डोक्यातला कचरा , राग , लोभ, मोठेपणाची हाव किनार्यावरच सोडून दिली पाहीजे आणि जीवनात मुक्तपणे आशाविरहित निर्विकार प्रवास केला पाहीजे …. नदीप्रमाणे
नव्या अमूर्ततेच्या शोधात…….
नव्या अमूर्ततेच्या शोधात…….
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566