सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ मावळण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
1953-54 ची ऐकिवात आठवण. वडील वयस्क आणि आई देवाघरी गेलेली. पाठोपाठची 11 भावंडे. सगळ्यात धाकटी 2 वर्षाची . बाकी सगळी 2-3 वर्षांनी मोठी, एकमेकांच्यात. जमीन जुमला फक्त नावावर. मोठ्ठे घर असले तरी या कुटुंबाला एक कोपरा. अशा परिस्थितीत खायचे वांधे, तिथे मुलांचे लाड ते कसले?
परिस्थितीनं मुलांना वयापेक्षा खूप मोठ्ठं केलं होतं. सगळीचजणं समंजस. कसला हट्ट नाही, कसलेही मागणे नाही. जे असेल त्यात आनंद मानणे.
दिवस सरत होते. सणवार येत आणि जात. ही सगळी भावंडे दिवाळी ला गोडधोड, फराळ, फटाके याची इच्छा न धरता, आनंदाने दिवाळी साजरी करायचे. कशी? तर सुंदर सुंदर रांगोळ्या काढून..त्यातच इतके मग्न होत कि, दुस-या कशाचेच भान नसे. देवानं कलेचं वरदान दिलं होतं प्रत्येकाला.
काळ पुढे सरकला. परिस्थिती ही हळूहळू सुधारली. शिक्षणं चालू होती. 1955- 1960, त्या काळी मॅट्रीक पास हे शिक्षणाचं लिमिट होतं मुलींसाठी. ते झालं की लग्न.
कोल्हापूर सोडून सासरी जाणे..अशाप्रकारे चौघीजणी सासरी पुण्यात पोचल्या. सासरी गेलेली, दुधात साखर विरघळावी तशी सासरी माणसांत मिसळून जायची. आणि तसंच झालं पाहिजे, हा अलिखित नियम आणि हेच संस्कार.
ही पण अगदी लवकर संसारात रमली. घरी सासू सासरे, दीर असं एकत्र कुटुंब. नंतर तेही वाढत गेलं. जावा आल्या. मुलं झाली. मिस्टर एकटेच कमावते. पण ही झाशीची राणी. घर सांभाळून अंगी असलेल्या कलागुणांची मदत घेत कलावस्तु करून विकणे, गरजूंना जेवणाचे डबे देणे, अशा मार्गांनी आर्थिक बाजू पण उचलून धरत होती. तेही अगदी आनंदाने. सास-यांना तिचं खूप कौतुक वाटत होतं.
संसारवेलीवर चार गुलाब एकापाठोपाठ एक फुलले.जणु रघुवंशाचे चार सुपुत्र.
आर्थिक परिस्थिती गडगंज नसली तरी समाधानकारक झाली. ती पण कष्ट घेत होती. कष्ट करणा-याचे हलाखीचे दिवस जास्त टिकत नाहीत. पण एका शब्दानं माहेरी चुगली केली नाही.
ती माझी आत्या. आम्ही आते-मामे भावंडे कधी सुट्टीत एकत्र खेळायचो. हळूहळू अभ्यासात मग्न झालो, जाणं येणं कमी झालं. त्यावेळी मोबाइल सोडाच, साने फोनही घरोघरी नव्हते.त्यामुळे संपर्क नव्हता.
माझ्या लग्नाच्या दिवशी आली होती, माझी तिची भेट झाली नाही. नंतर खूप दिवसांनी फोटो बघितल्यावर कळलं.
जवळजवळ 38-40 वर्षांनी तिला भेटायचा योग आला. तिला नुकतंच 90वं वर्ष लागलं होतं. मुलं छान शिकून मोठ्या पदावर काम करत होती. सुना आल्या. नातवंडे झाली. मागच्या वर्षी नातवाचं लग्न झालं. काकांना जाऊनही बरीच वर्षे झाली.
मी येते असं फोनवर सांगितल्यावर बाल्कनीत वाट बघत होती. मी गेल्यावर तिला नमस्कार केला. तिनं मला घट्ट मिठीत घेतलं. खरंतर माझा जन्म झाला तेव्हा ती लग्न होऊन सासरी गेली होती. नंतर तीनचार वेळाच भेटलो असू. आज तिच्या मिठीत खूपकाही हरवलेलं सापडलं होतं. दोघींचंही बालपण आणि माहेरपण.
खूप गप्पा मारल्या. नव्वदाव्या वर्षी स्वतः केलेल्या थालिपीठ आणि चहाचा आग्रह करत होती. भेटून पोट भरलं होतं. चहाचा घोटन् घोट तिच्या काळजातल्या प्रेमानं गोड गोड लागत होता.
बोलता बोलता मुलांच्या प्रगतीचा अभिमान तिच्या शब्दाशब्दांमधून जाणवत होता. सुना कशा छान आहेत, नातवंडांचं कौतुक करताना मोहरून गेली होती.
माझी निघण्याची वेळ झाली. थांब थांब म्हणत अर्धा तास गेला. पुढच्या वेळी रहायला येते असं सांगून जड अंतःकरणाने निघाले. मनाशी ठरंवलं पुढच्या वेळी नक्की दोन दिवस तिच्या बरोबरच रहायचं. तीनच महिने झाले तिला भेटून.
एका दुपारी तिच्या मुलाचा फोन आला. ” आई गेली”.
मन सुन्न झालं. तो दिवस चैत्र शुद्ध तृतीयेचा. 13 वर्षांपूर्वी माझे बाबा याच दिवशी गेले.त्यांच्या पाठची ही बहीण. त्याच तिथीला गेली. योगायोग…….
रात्री मी आतेभावाला फोन केला. इतक्या दुरून मी फक्त शब्दानीच धीर देऊ शकत होते.
बोलताना तो म्हणाला, ” आता कसं करायचं बघू, कारण आईनं तिची इच्छा सांगितली होती की मी गेल्यावर माझ्या अस्थी कोल्हापूर ला पंचगंगेत विसर्जित करा, म्हणून. “मला हुंदका आवरेना.
आमच्या कोल्हापूर भागात माहेरवाशिणीला ” मावळण” म्हणतात. लग्न होऊन सासरी नांदणा-या लेकी, बहिणी जेव्हा गौरीच्या सणाला, सुट्टीला माहेरी येतात तेव्हा”मावळण केव्हा आली? कशी हाईस पोरी? म्हणून प्रेमानं, आपुलकीने आणि मानानं विचारपूस करतात.
आत्यानं मनाशी ठरंवलंच होतं की काय , इथून आता निघायचं ते माहेरी जायचं.
अशी ही मावळण.
आयुष्य भर संसारासाठी
पुण्यभूमित राहिली..
चैत्र गौरीच्या तीजेला
परत निघाली…
जणु भेटण्या माहेरा
आतुर मावळण
पंचगंगी समर्पित झाली……
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈