श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ दुसरी बाजू… ☆ श्री सतीश मोघे

‘प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते ‘, हा वाक्प्रयोग आपण लहानपणापासून वाचलेला, ऐकलेला आणि बऱ्याच प्रसंगी आपली बाजू मांडतांना उपयोगात आणलेला आहे. पहिल्याच भेटीत किंवा एखाद्या प्रसंगी  समोरच्या व्यक्तीने केवळ एखादी कृती करणे, न करणे किंवा एखादे वाक्य बोलणे, न बोलणे यावरून समोरच्याविषयी आपले कायमचे मत न बनविता, काही काळ त्याच्या सहवासात राहून तो ज्या विचाराने चालतो आहे ते विचार, ज्या भावनांचा आदर करतो त्या भावना, त्याच्या व्यथा, वेदना जाणून घेऊन या सर्व जाणीवांच्या संदर्भाने त्याच्या कृती अथवा उक्तीचा अर्थ लावावा, त्याच्याविषयीचे मत तयार करावे, असा या वाक्प्रयोगाचा मतितार्थ आहे.

कोणत्याही नात्यात नाण्याची समोर येणारी बाजू ,ही त्या व्यक्तीने पहिल्याच भेटीत अपेक्षित असलेली केलेली कृती किंवा उक्ती असते, अपेक्षित नसलेली केलेली कृती किंवा उक्ती असते किंवा अपेक्षा असतांनाही न केलेली कृती किंवा उक्ती असते. ही बाजू पूर्णत: त्या व्यक्तीच्या हातात असते. मात्र दुसरी बाजू समजून घेणे, हे त्या व्यक्तीच्या हातात नसून आपल्या हातात असते. आपल्याला अपेक्षित असलेली कृती तिने केली,  आपल्याला अपेक्षित असलेली उक्ती, म्हणजे यथास्थिती प्रेमाचे,कौतुकाचे, आधाराचे, उत्साहवर्धक बोल ती बोलली तर तिची दुसरी बाजू आपल्याला उजळ वाटून ती आपल्याला खूप प्रिय होते, थेट काळजात जाऊन बसते. तेच तद् विरुद्ध  बोलली, वागली किंवा अपेक्षित असे वागलीच नाही, बोललीच नाही तर तिची दुसरी बाजू काळी वाटून ती व्यक्ती अप्रिय होते. अशा पहिल्याच भेटीतल्या भाळण्याच्या किंवा पहिल्याच भेटीतल्या तिरस्काराच्या धावणाऱ्या भावनेला, ‘नाण्याला दुसरी बाजूही असते’ हा विचार वेग कमी करण्याचे स्पीड ब्रेकरचे काम करतो. भावनेला विचारांची जोड देतो.

काहींचे मन मोठे असते. पण हा मनाचा मोठेपणा योग्यवेळी, योग्य कृतीतून, वाणीतून व्यक्त करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते किंवा ‘मनाचा मोठेपणा’ ही प्रदर्शन करण्याची वस्तू नाही, असाही त्यांचा अंतरीच भाव असतो. तर काहीचे मन अजिबात मोठे नसते, ते कोतेच असते. पण त्यांचे वागण्याचे,बोलण्याचे कौशल्य  असे काही असते की आपल्याला ते व्यापक हदयाचे, हितचिंतक वाटू लागतात. अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसमवेत काही काळ राहून, संवाद साधत राहिलो तरच त्यांची दुसरी बाजू, समोर येते. या व्यक्ती अशा का वागतात? याची उत्तरे समजतात. चांगल्या व्यक्तींना न गमावण्यासाठी आणि चुकीच्या व्यक्तींच्या मोहपाशात न अडकण्यासाठी काही काळ जाऊ देणे आणि दुसरी बाजू समजून घेऊन मग निर्णय घेणे केव्हाही चांगले.

अर्थात अशी दूसरी बाजू समजून घेणे अशाच व्यक्तींच्या बाबतीत घडते, ज्या व्यक्ती आपल्याला जीवनात हव्याशा वाटतात. पहिल्याच भेटीत एखादी व्यक्ती आवडली नाही आणि भविष्यात त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात निकड नसेल किंवा अन्य कारणांमुळे ती नको असेल तर त्या व्यक्तीची दुसरी बाजू समजून घेण्याची आवश्यकता राहत नाही. मात्र अशावेळी कुठेही बोलतांना त्या व्यक्तिविषयी नकारात्मक, टिकात्मक बोलणे टाळले पाहिजे. कारण त्या व्यक्तीची दुसरी बाजू आपण पुरती समजून घेतलेली नसते. 

दुसऱ्या व्यक्तीची ‘दुसरी बाजू’ समजून न घेता अनेकांजवळ जर तिच्याविषयी आपण नकारात्मक बोललो तर ऐकणाऱ्यांसमोर नकळत आपल्या व्यक्तीमत्वाची नकारात्मक, अंधारलेली बाजू प्रदर्शित होते आणि आपण त्या क्षणी प्रियता गमावतो, आपले मूल्य कमी होते, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. काही प्रसंगात आपलीही दुसरी बाजू असते, दुसऱ्याचीही दुसरी बाजू असते. सकृतदर्शनी दोन्हीही बाजू खऱ्या असतात. अशावेळी आपली दुसरी बाजू बाजूला सारुन, दुसऱ्याचीच दुसरी बाजू समजून घेणे हे आवश्यक असते. हेच मनाचा मोठेपणा दाखविणारे असल्याने जनमानसात तुमची उंची वाढविणारे असते.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ज्यांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली होती, त्या प्रसिद्ध लेखकांचा नामोल्लेख पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाकडून त्याच्या भाषणात करावयाचा राहून गेला. प्रस्तावना लिहिणाऱ्या लेखकांनी त्यांच्या भाषणात याविषयी जाहिर नाराजी व्यक्त केली. यात दोघांच्याही ‘दुसऱ्या बाजू’सकृतदर्शनी खऱ्या होत्या. ‘अनेक व्यवधानात नजरचुकीने नामोल्लेख राहिला’, ही लेखकाची दुसरी बाजू. तर ‘मी रात्रभर जागुन, अल्पकालावधीत विनंती आली असतांना, प्रस्तावना लिहिली. लेखकाने भाषणात अनेकांचे उल्लेख केले, आभार मानले. आपलाही उल्लेख आवश्यक होता’, ही प्रस्तावनाकार लेखकमहोदयांची दुसरी बाजू .दोन्हाही बाजू  सकृतदर्शनी खऱ्या. पण मोठ्या माणसानेच मोठे मन दाखवून छोट्याची दुसरी बाजू समजून घ्यायची असते, या प्रस्थापित मूल्याला त्यांच्या कृतीने धक्का बसला आणि त्यामुळे जनमानसात  त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. उच्च पदावर पोहचलेल्या व्यक्तींवर समाजात वावरताना, व्यक्त होतांना,आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना काय अपेक्षित आहे? ही चाहत्यांची दुसरी बाजू समजून घेऊन कृती होणेही आवश्यक असते.

कोणत्याही नातेसंबंधात आणि त्यातही कौटुंबिक किंवा मैत्रीच्या नातेसंबंधात ‘समोरच्याची बाजू ऐकून घेणे’ याहीपेक्षा ‘ त्या व्यक्तीला समजून घेणे’ अधिक अपेक्षित असते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी मानवजीवनाची व्याख्या करताना असे म्हटले  आहे की, “माणसात देव आणि दानव दोघांचे अस्तित्व आहे. देवाची प्राणप्रतिष्ठा आणि दानवांचा नाश करण्याकरिता होणारा संघर्ष म्हणजेच मानवजीवन आहे.” प्रत्येकाच्या ठिकाणी चांगल्या-वाईट वृत्ती असतात, गुण-दोष असतात. पण त्याची वाटचाल ही जर अधिक चांगले होण्याकडे, देवत्वाकडे असेल तर अशा व्यक्तीला समजून घेणे गरजेचे ठरते. मानवी जीवनाची ही दुसरी बाजू समजून घेतली,म्हणजे स्वीकारली की समोरच्या व्यक्तीला समजून घेणे सोपे जाते. दोषांचे, अवगुणांचे पाढे न वाचता गुण-दोषांची बेरीज वजाबाकी केली जाते.त्यात गुण अधिक असल्याचे दिसले तर ही अधिक गुणांची ‘दुसरी बाजू’ समजून घेऊन दोषांसह त्या व्यक्तीला  स्वीकारले जाते. बेरीज- वजाबाकीत दोष अधिक असल्याचे दिसले, तर त्या व्यक्तींचा आपण त्याग करतो किंवा दोष अधिक असूनही त्याग करण्याचे धैर्य नसेल किंवा असलेल्या नाजूक नात्यामुळे त्याग करण्याची मनाची तयारी नसेल, तर आहे त्या गुणांवर समाधानी राहून त्या व्यक्तीशी असलेले नाते आपण कायम ठेवतो. दुसरी बाजू  आणि त्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया, आपल्याला नाते  टिकविण्याची  असलेली गरज, आपल्या अंगी असलेले धैर्य, मनाची तयारी, समाजाच्या टिकेचे भय अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. कौटुंबिक नातेसंबंधात दुसरी बाजू समजून घेणे हे बऱ्याचदा आपल्याच सहनशीलतेची परिक्षा असते.

काळाच्या ओघात नात्यांची वीण घट्ट होते. नात्यात आपलेपणा येतो, ओलावा येते. नाते परिपक्व होते. अशा परिपक्व नात्यात समोरच्याची बाजू त्याने न सांगता, न मांडताच ऐकू येते, समजते.ती समजून वागणे घडते. जवळच्या औषधाच्या दुकानात न मिळणारी आयुर्वेदिक औषधे आणायला बाबा मला सांगायचे. ऑफिसमधून निघाल्यावर कामाचा थकवा, ट्रॅफिक या सर्वात बऱ्याचदा लक्षात असूनही मी कंटाळा करायचो. घरी आल्यावर बाबा कधीही ‘औषध का आणले नाही?’ याचा जाब विचारत नसत. दुसऱ्यादिवशी ते फक्त एव्हढेच म्हणायचे ‘आज जमले तर आण.’ दुसऱ्याला जाब विचारून, त्याची दुसरी बाजू ऐकून मग आपले समाधान करून घ्यायचे, अशी लांबची प्रक्रियाच तिथे नव्हती. समोरचा, ‘तसेच योग्य कारण असल्याशिवाय  असे वागणार नाही, बोलणार नाही’, हा समंजस भाव व्यापक असला की,दुसरी बाजू न सांगताही समजते आणि समोरच्यालाही, झालीच चूक, तरीही आपली बाजू मांडण्याचे अवघड काम करण्याची आवश्यकता राहत नाही.नाती अधिक आरामदायी, सुखदायी, समृद्ध होतात. 

बऱ्याचदा ज्या व्यक्तीशी आपला कधीही प्रत्यक्ष संबंध आलेला नाही आणि आपण केवळ एक नामांकित, मोठी व्यक्ती म्हणून तिला ओळखत असतो अशा व्यक्तीच्या जीवनात जर एखादी  घटना घडली तर अशा घटनांबाबत सत्याची एक तिसरी बाजूही असते हेही लक्षात ठेवावे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, प्रसिद्ध अभिनेते जर रविंद्र महाजनी यांचा मृत्यू ही याची उदाहरणे देता येतील. त्यांच्या निधनाची आलेली बातमी ही  त्या घटनेची पहिली बाजू होती. माध्यमांनी माहिती मिळवून मांडलेली बाजू दूसरी बाजू होती. पण सत्याची तिसरी बाजू  गेलेली व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांनाच माहिती होती. तेव्हा अशा प्रसंगात दुसरी बाजू माहीत झाली तरी तिसरी बाजू ज्ञात नसल्याने दुसऱ्या बाजूच्या आधारे कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे उचित नसते.

असं म्हणतात की, चंद्रावर पोहचल्यावर चांद्र यानाला असे जाणवले की, ‘चंद्र माणसासारखाच आहे. त्यालाही दुसरी, काळी.. अंधारलेली बाजू आहे. पण तो, प्रकाशित बाजूच नेहमी सर्वांसमोर ठेवून आपला प्रभाव पाडत असतो.’ बऱ्याचदा ही दुसरी  काळी ,अंधारी बाजू ‘हे असेच असायचे’ याची खूणगाठ बांधून, त्याकडे दुर्लक्ष करून, उजळ बाजूकडे बघत ,आहे ते नाते टिकविण्यासाठी,  त्यात आनंद घेण्यासाठीच जाणून घ्यायची असते.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments