??

प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देताना सामाजिक प्रवर्तकांना हेच अपेक्षित होतं का? समाजातल्या व्यावसायिकांना अशाप्रकारे लुटणं अपेक्षित होतं का? याची उत्तरं कुणी मागायची आणि या प्रकारांवर अंकुश कोण आणणार? याचं ठोस उत्तर समाजाला हवं आहे. 

सार्वजनिक उत्सव हे अशा गोष्टी राजरोसपणे करण्यासाठीचं हक्काचं निमित्त आहे का? माणसांना जे एकट्याला किंवा स्वतंत्रपणे करता येणार नाही, नेमक्या त्याच गोष्टी अशा मोठ्या गर्दीचा फायदा घेऊन केल्या जातात का? यातलं तथ्य शोधण्याकरिता सामाजिक संशोधनाची आवश्यकता आहे. 

सार्वजनिक मिरवणुकीचं गणितच फार निराळं आहे. दहा दिवसांकरिता प्रतिष्ठापित केलेला देव नवव्या दिवशी दुपारीच मांडवाबाहेर काढायचा, आदल्या दिवशी रात्रीच त्या पूजेतल्या देवालाच थेट रस्त्यावर नंबरासाठी रांगेत उभं करायचं, पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर नंबर लागत नाहीच. मग या रांगेत उभ्या असलेल्या गणपतींचा अनंत चतुर्दशीची सकाळ ची पूजा, आरती, नैवेद्य आणि संध्याकाळची पूजा-आरती-नैवेद्य होतो का? शोडषोपचार होतात का? रांगेत गणपती उभा केला की, त्याची पूजाअर्चा माणसं पार विसरूनच जातात. त्यांना मिरवणुकीचे वेध लागलेले असतात. (त्यातही “वाट पाहे सजणा, संकष्टी पावावे” अशांचीच संख्या जास्त. अनेकांना तर तेवढंही येत नसतं. मग आरती आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा स्पीकर वरच लावली की काम ओके !) 

कार्यकर्त्यांची मिरवणुकीची हौसच मोठी दांडगी. 

ते गणपतीच्या रथासमोरच रस्त्यावरच जेवतात, तिथंच झोपतात. डीश, द्रोण, पत्रावळी, चमचे, पाण्याच्या (आणि अन्य सर्व प्रकारच्या द्रव पदार्थांच्या) बाटल्या वगैरे तिथंच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. गणपती बाप्पा सकाळ होण्याच्या प्रतिक्षेत रथावरच बसून असतात. 

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पारोश्या अवस्थेतच मिरवणूक सुरू होते, आंघोळही न केलेले सो काॅल्ड भक्त मोठ्या भक्तिभावानं शीला की जवानी, बोल मैं हलगी बजावू क्या, पोरी जरा जपून दांडा धर अशा गाण्यांवर नाचत राहतात. हे कुठल्याच शुचितेत किंवा पावित्र्याच्या व्याख्येत बसत नाही. 

राष्ट्रीय सणांच्या दिवशी शोभायात्रा निघतात, त्यात केवळ देशभक्तीपर गाणीच वाजवली जातात. पण मग देवाच्या मिरवणुकीत आयटम साॅंग्ज कशी काय लावली जातात? अशा सर्व कार्यकर्त्याकरिता एखाद्या वेगळ्या दिवशी डीजे नाईट आयोजित केली तरी काम होऊन जाईल, त्याकरिता गणेशोत्सवाचंच निमित्त कशाला हवं? 

कित्येक ठिकाणी तर निवडलेल्या दुर्वांच्या जुड्या नसतातच. त्याऐवजी उपटून आणलेलं गवतच वाहिलेलं असतं. म्हणजे तेही महत्वाचं वाटत नाही. मग याकडे धार्मिक उत्सव म्हणून कसं पहावं? आणि का पहावं? 

दहाच्या दहा दिवस अंडी किंवा मांसाहारी पदार्थ खुशाल खायचे, व्यसनं करायची, मनसोक्त अपेयपान,धूम्रपान करायचं आणि ‘हा बघा आमचा हिंदूंचा प्रिय उत्सव’ असं वरून पुन्हा आपणच म्हणायचं, हा कुठला अजब प्रकार? एकूणच सवंगपणा, आचरटपणा, छचोरपणा, स्वत:च्या मनातल्या असामाजिक कृती करण्यासाठी गणेशोत्सव आणि मिरवणुका यांचा व्यवस्थित वापर केला जातोय, यामागची सामाजिक मानसिकता जाणली पाहिजे. 

लोकमान्य टिळक, न.चिं.केळकर अशा मान्यवरांनी पुढाकार घेऊन हा उत्सव उभा केला आहे. मिरवणुकीची सांगता मान्यवरांच्या भाषणांनी होत असे. यांची शिस्त तर इतकी करडी होती आणि सामाजिक जरब अशी होती की, त्यांचा शब्द मोडण्याची कुणी प्राज्ञा करू शकत नसे. आज तशीच शिस्त पुन्हा लावण्याची आवश्यकता नाही का? की उत्सवातला आनंद आम्ही लुटणार आणि गैरप्रकार किंवा तत्सम गोष्टी घडल्या की त्याची जबाबदारी प्रशासन-पोलिस यांच्यावर ढकलणार?  याचा विचार आपल्या मनात आहे की नाही? 

सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची कोणती विशेष आचारसंहिता किंवा चौकट आहे का? आजवर ती नसेल तर, ती असायला नको का? उत्सवाचं नियोजन, आखणी, खर्चाची सोय, मूर्तीचा आकार किंवा तपशील, देखाव्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे, मिरवणुकीसंबंधी चे मार्गदर्शक नियम, उत्सव संपल्यानंतर रथ किती दिवस रस्त्यात तसाच ठेवायचा, मांडव किती दिवस ठेवायचा, आॅडीट कुणाकडून करून घ्यायचं, उत्सवासाठी शिस्तपालन समिती कशी नियुक्त करायची याविषयी आजवर कुणीही पुस्तिका काढलेली नाही. १२५ वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या उत्सवाविषयीचं असं मार्गदर्शनच असू नये, ही केवढी मोठी तृटी आहे? 

प्रत्येक कार्यकर्ता सूज्ञ असतोच, असा आपला समज आहे का? असा सरकारचा समज आहे का?असा धर्मादाय आयुक्तांचा समज आहे का? आपण सर्वांनाच जन्मत:च सूज्ञ, समंजस, समजूतदार, विवेकी असं समजण्याची चूक करतो आहोत का? उत्सव हा उत्सवासारखाच झाला पाहिजे याविषयी सर्वांचं एकमत असेलच, पण मर्यादांचं भान सुटणाऱ्यांविषयीचं कारवाईचं पाऊलही तितक्याच कठोरपणे टाकलं पाहिजे. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता नेहमीच असते, ही गोष्ट नाकारण्यात अर्थच नाही. पण जेव्हा समाजच आम्हाला कुणीही अक्कल शिकवण्याची गरज नाही असं एकमुखानं म्हणायला लागतो तेव्हा काय समजावं? 

उत्सवाला परिवर्तनाची गरज नाही, उत्सव पुन्हा त्याच्या मूळ सात्विक रूपाकडे नेण्याची खरी गरज आहे. 

– समाप्त – 

लेखक : डॉ. मयुरेश डंके

मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments