☆ मनमंजुषेतून ☆ || देवत्व || ☆ सुश्री मनीषा कुलकर्णी ☆
? || देवत्व || ?
दिव्यत्वाची जेथ प्रचिती | तेथे कर माझे जुळती ||
१९४७ मधली गोष्ट..! डाॅ .आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे…!
तो जुलै महिना होता. रात्री तुफान पाऊस पडत होता. डॉक्टरांचा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं. बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या-काठ्या घेतलेली सात-आठ माणसं उभी होती.. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीड एक तासाच्या प्रवासानंतर गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार..! लाठीधार्यांनी डाॅक्टरना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी.. बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती…!
डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर.. मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमिनदार आहेत. मी मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं आहे.. त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे नां.. मरू दे तिला माझ्यासारखे भोग तीच्या नशिबी येतील…!”
डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १००रु. देण्यात आले.. त्याकाळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या निमित्ताने डाॅक्टर खोलीत आले.. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, ” आक्का.. आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरंवाईट करून घेऊ नको. संधि मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा. आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णींनी पाठवलंय असं सांग.. ते तुला नक्की मदत करतील. ही भावाची विनंती समज…! ”
पुढे डॉक्टरांनी स्त्री-प्रसूती विषयात विशेष प्राविण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला ते गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ.चंद्राच्या भाषणानी ते खूप प्रभावित झाले.. डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना अदबीने ” डाॅ.आर्.एच्.कुलकर्णी सर.. “अशी हाक मारली.. हे ऐकताच डाॅ. चंद्रानं चमकून डॉक्टरांकडे पाहिलं आणि म्हणाली, “सर.. तुम्ही कधी चंदगढ़ला होता कां..?” “हो.. पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला बेटा..”
डोळ्यांत टचकन् पाणी आलं.. स्वतःला सावरत ती म्हणाली, ” तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल…!”
” डाॅ.चंद्रा.. मी तुला आज पहिल्यांदाच बघतोय.. तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो.. असं अचानक घरी यायचं म्हणजे..” “सर please…” “आई.. बघितलंस काम कोण आलंय ते..?”
डाॅ. चंद्राच्या आईने क्षणभरंच पाहिलं आणि डाॅक्टरांचे पायच धरले.. ” डॉक्टर.. तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले.. आपटेंना भेटले.. स्टाफ नर्स झाले.. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं.. तुमचा आदर्श ठेवून तीला स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं…! ”
आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती. ” चंद्रा.. बेटा तू मला कसं ओळखलंस..? ”
“तुमच्या नावामुळे.. सतत जप चाललेला असतो आईचा..” ” तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव चंद्रा ठेवलं.. तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय.. तुमचाच आदर्श ठेवून चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते…!”
डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या.. सुप्रसिद्ध लेखिका.. इन्फोसिसच्या सर्वेसर्वा. असलेल्या सुधा मूर्तींचे वडील…!
तुझ्यामाझ्या जड देही …| देव भरोनिया राही … ||
© सुश्री मनीषा कुलकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
प्रेरक प्रसंग