सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ – माका तुजें जडले पिशें… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
‘मंगलदीप’च्या मैफिलीनंतर आम्हा कलाकारांच्या अवतीभवती कौतुकानं जमणारा श्रोतृवर्ग, हा खरं तर नेहमीचाच अनुभव ! मात्र त्यादिवशीच्या माझ्या चाहत्यांची झालेली माझी गळाभेट, मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम संपता-संपता एकच गलका झाला आणि अनपेक्षितपणे मुलींच्या एका लोंढ्याने, झपाटल्यासारखं जवळ येत मला घेरून टाकलं…
कुणी थरथरत्या हातानं, माझे हात पकडले तर, कुणी थंडगार हातांनी, “ताई, तुमचा गाणारा गळा कसा आहे पाहू!” म्हणून माझा गळा चाचपू लागल्या, तर काही मुली मला चक्क बिलगल्या! त्या बिलगण्यात उत्कट प्रेमाचा वर्षाव होता! त्या विलक्षण स्पर्शात, आपलेपणाचा ओलावा होता. मला भेटून त्या निरागस मुलींचे गोंडस चेहरे उजळून गेले होते. पण डोळे?….. त्यांचे डोळे मात्र जन्मतःच प्रकाशाला पारखे झाले होते, हे जाणवलं आणि मला गलबलून आलं. मनात आलं, थोडा वेळ जरी अंधारलं तरी आपण किती अस्वस्थ होतो, मग कसं असेल हे दृष्टिहीन आयुष्य? माझे डोळे भरून आले.
तेव्हापासून माझं आणि कमला मेहता अंधशाळेचं नातं जुळलं. त्यानंतर मात्र दरवर्षीची १४ जुलैची माझी आणि त्यांची भेट पुढील बरीच वर्षं होत होती. कारण नेहमी ओढ असते, ती माझ्या या बालमैत्रिणींना भेटायची, त्यांच्याबरोबर गाणी गायची, त्यांच्यातल्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य यासारख्या कलागुणांचा मनसोक्त आनंद घेत दाद द्यायची!
अॅना मिलार्ड बाईंनी ही शाळा स्थापन करून आज शंभराहून जास्त वर्षं झाली आहेत!! इथं १४ जुलै हा शाळेचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा या शाळेत आले. संस्थेच्या विश्वस्त हंसाबेन मेहता यांनी हसतमुखाने आणि अत्यंत आपुलकीनं माझं स्वागत केलं. ‘धन्य अॅना मिलार्ड बाई…!’ या गौरवपर गीताचे सूर मुलींच्या कोकीळ कंठातून पाझरू लागले. गडबडीचं वातावरण एकदम शांत झालं. मुलींच्या सुरात आत्मविश्वास पुरेपूर होता. सुरेल स्वरांनी वातावरण एकदम शांत झालं, वातावरण भारून गेलं. या मुलींपैकीच एक निवेदिकाही खणखणीत आवाजात कार्यक्रम रंगवत होती. हे सर्व अनुभवताना मीच बिथरले होते..!
त्यानंतर काही नाट्यप्रवेश, एकांकिका आणि थक्क करून सोडणारं बांबूनृत्य झालं. भीती, त्याचबरोबर आश्चर्य आणि आनंद माझ्या डोळ्यांत मावत नव्हता. मी स्तंभित झाले! त्यांच्या प्रत्येक स्टेप्स, इतक्या अचूक कशा? कुठेही अडखळत नाहीत, पडत नाहीत, अडचण नाही. सर्व काही सुंदर आणि बिनचूक! त्यानंतर मी त्यांच्यासाठी गायले. माझ्या ‘मंगलदीप’ परिवारातल्या साथीदारांनीही अत्यंत आनंदात मला या सेवेत साथ केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘हासरा नाचरा श्रावण’ ही कविता, ‘केंव्हातरी पहाटे’, ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, या गझला व अशी अनेक गाणी सर्व मुली माझ्यासंगे सुरेलपणे गात होत्या. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! ‘दिवे लागले रे दिवे लागले, ‘तमाच्या’ तळाशी दिवे लागले’ ही कविवर्य शंकर रामाणींची माझ्या स्वररचनेतली कविता, मुली तन्मयतेनं गाताना पाहून माझ्यासमोर प्रकाशाचं झाडच लखलखलं! वाटलं, या मुलींना ही सर्व गाणी पाठ कशी? नंतर जाणवलं, अरे सूरदास नव्हता का अंध? पण त्यालाही परमेश्वरानं जशी दैवी दृष्टी दिली होती, तशीच या मुलींना स्मरणशक्तीची जबरदस्त देणगी दिली आहे. या कार्यक्रमात आम्ही सर्वांनीच खूप आनंद घेतला.
त्यानंतर सुरेल गळ्याच्या स्नेहल, सारिका, तेजल, पल्लवी तसंच सणसणीत ढोलकी व तबला वाजवणारी योगिता, अशा मुलींच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. रेडियो टीव्हीवर कुठेही माझा आवाज ऐकला तरी आजही यांचा फोन असतो. योगिताने तर माझ्या कार्यक्रमातही मला साथ केलीय.
मधून मधून मी त्यांना कमला मेहता शाळेत जाऊन काही गाणीही शिकवली. त्यांची आकलनशक्ती जरी तीव्र असली तरी लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे त्यांना शिकवणं, ही किती कठीण गोष्ट आहे हे मला उमगलं. त्या मुलींना शिकवताना आपल्याला संयमाची खूप गरज असते हे जाणवलं. म्हणूनच त्यांना सांभाळून घेणार्या त्या-त्या वेळच्या मुख्याध्यापिका स्मिताताई, श्यामाताई, शिक्षक आणि शिपायांचंही मला नेहमीच मोठं कौतुक वाटतं. शिवाजी पार्क मधील समर्थ व्यायाम शाळेच्या श्री. उदय देशपांडे सरांनीही या मुलींना मल्लखांब, दोरखंडावरची हवेतली वेगवेगळी आसनं आणि अव्यंगालाही सहजतेनं न जमणारे, चकित करून टाकणारे, व्यायामाचे भन्नाट प्रकार शिकवताना मी अनेकदा पाहिलंय. कराटे, ज्युडोसारख्या स्वसंरक्षणार्थ खेळांचंही व्यायामशाळेत शिक्षण दिलं जातं..
बाहेरच्या जगात कुणी फसवू नये म्हणून खचून न जाता, धैर्यानं कसं वागावं, याचं शिक्षण या ‘कमला मेहता अंध शाळे’त दिलं जातं. स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून जगण्याचं भान येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न इथे केले जातात. ‘तू करू शकतेस, Nothing is impossible…’ असं म्हणत आयुष्याला वळण दिलं जातं. या शाळेतले निरलस सेवाव्रत घेतलेले सर्व शिक्षक, शिपाई, हंसाबेन मेहता या कामाशी आणि मुलींशी एकरूप झाल्या आहेत, ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.
शाळेत रोज प्रार्थनेच्या वेळी वाजवल्या जाणार्या ‘जन गण मन’मधून मुली माझ्या आवाजाशी घट्ट परिचित आहेत. तसंच माझ्या इतर सीडींमधील ‘दारा बांधता तोरण’, ‘प्रीती जडली तुझ्यावरी’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आणि मुलींचं सर्वांत आवडतं ‘गो मजे बाय, तू माका जाय, माका तुजें जडले पिशें….’ सारखी अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत.
मी शाळेला भेट दिल्यावर दर वेळेस या लाडक्या चिमण्यांचा घोळका आनंदाने चिवचिवाट करत येतो आणि मला बिलगतो. त्यावेळी माझा हात हाती घ्यायला, माझा स्पर्श अनुभवायला आसुसलेल्या, चिमुकल्या मैत्रिणींच्या स्पर्शात मला जाणवतं,….
‘माका तुजें जडले पिशें….’
‘world sight day’ निमित्त…..
© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈