सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
प्रकाश हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही.
आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.
आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पने विषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. पण प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते एका खास कार्यक्रमात.
एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.
त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक वीस-बावीस वर्षांची विवाहित मुलगी स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती. एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हे खूप भारावले होते. घरातली स्वतःची कामे स्वतः करणे, स्वयंपाक करणे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामं या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने किती क्षुल्लक कामे, पण त्यासाठी त्यांना परावलंबित्व आले होते. थोडक्यात निरुपयोगीपणाची अगतिक भावना त्यांच्या मनातून आता दूर झाली होती.
त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता करताना या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.
आपले आयुष्य आनंदात घालवल्यानंतर आपल्या पश्चात आयुष्याचे सार्थक करण्याचा नेत्रदान हा अतिशय महत्त्वाचा सोपा उपाय आहे. त्यामुळे दोन अंधांची आयुष्य प्रकाशमान होतात. त्यासाठी नेत्रदाना बाबत जागरूक असायला हवे. आपण तर नेत्रदानाचा संकल्प करायचाच पण जवळपास, ओळखीत कुणाचा मृत्यू झाला तर अगदी शांतपणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेत्रदाना विषयी सुचवायचे. कारण दु:खामुळे त्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येईलच असे नाही. तेव्हा अशी जागृती करीत प्रत्येक जण नेत्रमित्र बनू शकतो.
आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. त्याचा आनंदाने उपभोग घेतला. आपल्या पश्चात या छोट्या कृतीने आपण आनंद वाटू शकतो. मग काय हरकत आहे. हीच आपल्या माणुसपणाची जाणीव जागृती आहे.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈