डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती, परंतु माझी बहीण भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता… आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती…) इथून पुढे —
एकदा तिला म्हणालो, ‘ अशी भीक घेण्यापेक्षा ‘चार पैशे’ कमव… काहीतरी धंदा आपण सुरू करू…. ‘
ती म्हणाली होती, ‘ मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय…?’
मी म्हणालो होतो, ‘ नाही ना, तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल घालल…’
यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात…
यानंतर मी तिला पाच ते दहा विक्रीयोग्य वस्तू विकत आणून दिल्या होत्या आणि तिला म्हणालो, ‘ बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर. ‘….
तिने माझं ऐकलं…. मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तिने त्या फूटपाथवरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या…… व्हीलचेयर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली…. येणार्या-जाणार्या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली….
व्यवसाय हळूहळू वाढत गेला. मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तिने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली. आता वस्तू ठेवायला घर पुरेना… हे कर्तुत्व तिचं होतं…. !
तिला मी फक्त एक हात दिला होता, तिने या संधीचं सोनं केलं…. ती आकाशात भरारी घेत होती…. !
कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तिच्या दारावर यायचा…. या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. स्वतःला जाणवते ती वेदना.. पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते ती म्हणजे संवेदना…. ! तिने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता…. आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्यालासुद्धा मदतीचा हात द्यावा….. कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात… ?
मी तिला मनोमन नमस्कार करायचो.
ती मला नेहमी म्हणायची, ‘ एवढ्या लोकांचं करतोस, याचं पण पांग फेड बाबा, या अधू पोरासाठी पण कायतरी कर…. ‘
कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले, तो आता स्वतःच्या पायावर चालतो, यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. त्याचं सर्व छान झालं, या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल, तर तिला… !
… दुसर्याच्या आनंदात आपलं सुख मानणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं…. बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा होतं नसतो…. !
.. मोठं होणं म्हणजे maturity येणं…. ! किती कॅरेटचं सोनं घातलंय यापेक्षा किती मूल्यांचं कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity…. ! चुका शोधायला मेंदू लागतो…. पण माफ करायला हृदय…. हे समजणं म्हणजे maturity…. !
… अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं…. तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले….
कृतज्ञतेने म्हणाली, ‘ ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा ‘
खरंच तिची भरभराट झाली होती…. पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तिला भरभराट म्हणायचं
का ?.. मुळीच नाही…..
… काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट….
… सर्वकाही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट…
… पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट…
चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे… स्वतःचा विकास करत असताना, या सर्व प्रवासात तिने रस्त्यावरच्या आणखी एका व्यक्तीला हात दिला होता…. याचंच मला जास्त अप्रूप !
दिवसेंदिवस ती उन्नती करत होती… रस्त्यावर व्यवसाय करताना तिला अनंत अडचणी सुद्धा येत होत्या परंतु त्यातून ती मार्ग काढत होती…
… फुंकर मारल्याने दिवा विझतो….. अगरबत्ती नाही…. !
… जो दुसऱ्याला सुगंध देतो तो कसा विझेल…. ?
रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास…. मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे…. नव्हे अनुभवलाय….
… स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना, आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती…. !
ती शिकली नाही, तिची भाषा ओबड-धोबड आहे…. पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे… !
या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं….
भाऊबीजेच्या दिवशी तिने फुटपाथवर तिच्या घरासमोर रस्त्यावरच एक चटई अंथरली….
तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले… मी तिला ओवाळणी दिली.
तिने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला….
‘ पेढ्याच्या बॉक्सवरच भागवते म्हातारे… मला वाटलं जेवायला बोलवशील… ‘, मी हसत म्हणालो.
‘ म्हातारी म्हणू नगो ‘.. तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत, हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली.
‘ बघितलं तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण… ‘ मुद्दाम मी तिला उचकवलं…. आता पुढं काय होणार हे मला माहित होतं…
‘ म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या… ‘ म्हणत तिने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती….
एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलीपेक्षा आणखी जास्त काय हवं…. ? माझ्या आईच्या वयाची ती बाई, आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो.
तिच्या पाया पडत म्हणालो, ‘ तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही, तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे…. परंतु खरं सांगू का ताईपेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे…. !’
तिच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं…
तिला म्हणालो, ‘ अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस, मात्र जेव्हा स्वतः सावरलीस, तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस हे सारं काही एक आईच करू शकते ना…. ’
आता तिच्या डोळ्यात पाणी होतं…. ती म्हणाली, ‘ पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय, रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उन्हात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय हे सुदा मला म्हाईत हाय, मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस…. डोक्यावर छत टाकलंस…. पोटातली भूक भागवलीस…. तू माजा कुनीही नसताना माज्या साटी तू हे केलंस… मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास…. म्हणलं, चला बीन बाळंतपनाचं या वयात आपल्याला बी पोरगं झालंय…. तर संबळु या अपंग पोराला…. आपुन बी या वयात आई हुन बगु…. मी आय झाले आन ह्यो बाप…… ‘ तिने नवऱ्याकडे बोट दाखवत म्हटले…. !
आता डोळ्यात पाणी माझ्या होतं…. !
म्हटलं, ‘ म्हातारे तू लय मोटी झालीस…. ‘ यावेळी “म्हातारी” म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली…. हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली… त्यातून एक शर्ट काढला…. एक साडी घेतली आणि मला म्हणाली, ‘ दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ? तू घिवून जा, नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे… तिला म्हणावं साडीतच ब्लाउजपीस पन हाय…. ‘
हा ” भरजरी पोशाख ” मी घेतला…. गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो, ‘ जातो मी माई… ‘ ती म्हणाली, ‘ ए मुडद्या, जातो म्हणू न्हायी…. येतो म्हणावं…. आनी हो…. माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगोस, मला आपली म्हातारीच म्हन…. मी तुजी म्हातारीच हाय…. !
मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो…
… आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो…!
— समाप्त —
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈