श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फुलपुडा…” ☆ श्री मंगेश मधुकर

“एक फुलपुडा द्या”

“कितीचा”

“वीसचा” पुडा बांधताना काकूंनी प्रत्येक पिशवीतून मूठभर फुलं घेतली. किमतीच्या मानानं फुलं जास्त होती. मी आणि सौनं एकमेकांकडे पाहिलं.

“काकू,वीस रुपयांचा फुलपुडा पाहिजेय” सौ. 

“माहितीये”

“मग एवढी फुलं”

“घ्या हो. तेवढीच माज्याकडून देवाची सेवा” प्रसन्न हसत काकू म्हणाल्या.

“खूप जास्त देतायेत”

“असू द्या.” काकूंच्या प्रेमळ बोलण्यानं क्षणात माणुसकीचं नातं जोडलं गेलं.

“डोळ्याचं ऑपरेशन कधी झालं ? ” सौनी आस्थेनं विचारलं.

“आठ दिस झाले”

“घरी आराम करायचा”

“असं कसं चाललं,पोटाची खळगी भरावी लागते ना. मी ही अशी म्हातारी, पोरं मोठी झाली. सुना आल्यात पण आज बी म्या कुणावर अवलंबून नाय. माज्या पैशानं फुलं आणून इकते. पैसे मिळवते म्हणून घरात अजूनही मान हाये.”

“या वयातही काम करता कौतुक वाटतं”

“तेत माजा स्वार्थ हायेच की”

“म्हणजे”

“इथं फुलं इकायला बसते त्यात जीव रमतो. येगयेगळी लोकं भेटतात.ईचारपुस करतात ते बरं वाटतं. घरी नुसतं बसून डोकं कामातून जातं. माज्याशी कुणालाबी बोलायला येळ नाई. काई ईचारल तर वसकन वरडतात. त्यापरिस इथं बसलेलं बरं”

“काकू,एक विचारू”

“काय ईचारणार ते माहितेय. जास्त फुलं का देता”

“बरोबर”

“ताई,आतापतूर लई पुडे दिले पण ह्ये इचरणारी तूच पयली.”

“इतर दुकानदार असं करत नाही. माल देताना हात आखडता घेतात.वर परवडत नाही असं ऐकवतात.”

“ते बी खरंय.”

“कमी फुलं दिली तर पैसे जास्त मिळतील की”

“जास्त दिल्यानं डबल फायदा व्हतो. माज्याकडून फुलपुडा घेतलेलं गिर्हाइक पुना पुना येतं. जास्त फुलं मिळाल्यावर  लोकाला जो आनंद व्हतो ते पावून लई बरं वाटतं.”

“पण यात तुमचं नुकसान होतं ना”

“हा आता पैशे कमी मिळतात पण माल संपतो. फुलं ताजी हायित तोपतूर मागणी.  एकदा का शिळी झाली की मग फेकूनच द्यायची. माणसाचं जगणं सुद्धा फुलासारखच .. उपयोग हाय तवर मान, नायतर….”

“म्हातारपणी पैसा उपयोगाला पडतो” सौ 

“तो कितीबी कमवला तरी कमीच. पैसा हा पाणीपुरीसारखा असतो,कधीच मन भरतं नाई. अन गरजंपेक्षा जास्त मिळालं की जगण्याला फाटे फुटतातच”

“वा,कसलं भारी बोललात.”

दोन दुकानदारांचे टोकाचे अनुभव. परिस्थिती भिन्न. एक माल देताना हात आखडणारा पक्का व्यवहारी तर दुसरी सढळ हातानं फुलपुडा देणारी. दोघेही आपआपल्या जागी बरोबर !! पहिल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक तर दुसऱ्या ठिकाणी भावनेची. 

“निघतो,आता भेट होत राहिलच” आम्ही फुलपुडा घेऊन  निघाल्यावर गुलाबांचं टपोरं फुल देत काकू म्हणाल्या “ *माणसानं घेताना आवर घालावा पर देताना हात कायम सैल सोडवा.*” खूप मोठी गोष्ट काकूंनी अगदी सहज सांगितली. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments