श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले) इथून पुढे

एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ), बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर मोठी क्रिकेटची टोपी, व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोडवर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली. माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? हाच विचार चालला होता व वेगळ्या विचारात मी चित्रकामात पूर्ण गुंग झालो होतो.

पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर, आंब्रळ, खिंगर,  भिलार, राजपूरी, तायघाट अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत. त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात, हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे. आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात.

इकडे माझे  ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते. मी पूर्ण स्वतःचे  देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला. 

“ भूत, भूत,चित्रकाराचे भूत……… चित्रकाराचे भूत…….पळा पळा “

असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहिले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले, म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी दोनचार जण घाबरून तेही पळू लागले.

त्यांना असे पळताना पाहून मीही घाबरलो. कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला, तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने  पटापट सामान आवरून मी रस्त्याच्याजवळ एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो.

दांडेघरची ही माणसे आता  राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत  म्हणत दबकत दबकत हळूहळू, दमादमाने सावधपणे येत होती. आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना. त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकून आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता….. 

“ म्या इथंच बघितला ते भूत, मोठ्ठी टोपी घातली होती.”

दुसरा त्यात भर घालून म्हणाला.. 

“ अरं इंग्रजाचे होतं ते भूत “

“नाय,अरं बाबा ही पारशांची शाळा होती, म्हंजी भूत पारशीच असणार नव्ह.”

“अरं पारशी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम लेका, लई डेंजर असणार ‘

“लई कटकटी असत्यात पारशी लोकं, म्हंजी भूत भी कटकटी आन जालीम असलं तर सोडणार नाय, आपल्या मागंसुद्धा लई कटकट  लागलं. “ एकाने असा अनुभव सांगितला. 

“अरं तुला सांगतो एकदा का धरलं ना, तर आजिबात सोडत नाहीती ही भूत. मानगुटीवर बसत्यात, नाचत्यात, लई हाल हाल करत्यात.” 

मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत एकमेकांचा हात पकडत त्यांनी जकात नाका पार केला. मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला. रात्रीचे चित्र काढणं एवढ काही सोप्प काम नाही हे माझ्या लक्षात आले व नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही. सगळा मूडच गेला आणि मी चित्राचे सामान घेऊन गूपचूप पणे परत शाळेत परतलो. 

दुसऱ्या दिवशी शाळेतला दांडेघरचा एक कामगार सर्व स्टाफला सांगू लागला, की रात्री शाळेच्या रस्त्यावर चित्रकाराचे भूत गावातल्या लोकांनी पाहिले….. 

…  भूत असा छोट्या खूर्चीवर बसला होता, लई मोठी हातभर लांब टोपी घातली होती. त्याचे पाय व हात खूप लाबंच्या लांब होते. ते पारशी भूत होते. लई जालीम, लई डेंजर. थोडक्यात वाचली मंडळी, नाहीतर मानगुटीवर बसला असता. 

लई डेंजर भूत होते. यापुढे रात्रीचे सावध रहा,असा सल्ला देखील त्याने दिला. मी देखील हो हो म्हणत  त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भारी गंमत वाटली. माणसे एखादी घटना अव्वाच्या सव्वा करून कसे सांगतात ते मी अनुभवले.

त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच. रात्री चित्र काढायला कधी बाहेर ऑन दी स्पॉट जात नाही. पण एक नाईटस्केपचा चांगला विषय चित्रित करायचा राहिला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले.

आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते. त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही. आजही डोंगररांगा, शेतीची हिरवळ, समुद्र, बोटी, झाडे, इमारती, टेबललॅन्डची पठारे, वाईची मंदीरे, घाट, महाबळेश्वरचे  सृष्टीसौंदर्य पाहिले की  मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते. या  चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे, झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या. 

कितीतरी मोठी माणसे अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली. आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली. चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले. हे भूत तुमची ध्येये सतत आठवण करून देते व कामाला जुंपते. नवनव्या गोष्टी, संशोधन, साधना करण्यास भाग पाडते. त्यामुळे माणूस सतत उत्साही व कार्यमग्न राहतो.

आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे. 

आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा.  लेखन, चित्रकला, शिल्पकला, खेळ, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य,चित्रपट, शिक्षण, वकील, इंजिनियर्स, पत्रकारिता, डॉक्टर,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो किंवा स्वत:च्या उद्योग व्यापारक्षेत्रात असो.आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो, पछाडलो तर काम उत्तम होते. 

हाती घेतलेले कार्य मनापासून,आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो,त्यातून सर्वांना आनंद घ्यायला व द्यायला शिकलो तर कार्यात सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच. 

म्हणून सर्वानांच ज्या त्या आवडत्या विषयातील भूताने पछाडलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. ज्यावेळी हे भूत आपल्याला पछाडते त्यावेळी आपली सर्व शक्ती वापरून खरोखर उत्तम कार्य करण्याची असामान्य प्रेरणा मिळते. स्वत:ला विसरून दिवसरात्र आवडीच्या क्षेत्रात यश संपादनासाठी झोकून घ्यावेसे वाटते.

त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments