सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ “ते” होते म्हणून ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
आई म्हणायची, “आण्णा कर्वे, म. फुले आगरकर होते, न्या. रानडे होते म्हणून तू आणि मी इतकं छान जगतो आहोत. नाहीतर स्वयंपाकघर आणि माजघरापलिकडे जग नसतं आपलं.” हे आठवलं की अनेक नावं आठवतात आणि “ते होते म्हणून” असं त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं.
त्यापैकी एक स्वामी दयानंद सरस्वती.
आर्य समाजाचे संस्थापक. शाळेत असताना दयानंद सरस्वती हा एक मार्काचा प्रश्न असायचा. दयानंद सरस्वती आणि आर्य समाज ही जोडी जुळलेली की झालं! तिसरीत असताना शंकराच्या पिंडीवर नाचणारा उंदीर बघून त्यांचा मूर्तीपूजेवरचा विश्वास कसा उडाला, हा धडा होता. तो शिकवताना माझा मूर्तीपूजेवरचा विश्वास बिलकुल उडू नये आणि त्याचवेळी दयानंदांबद्दल आदर मनात राहील याची काळजी घरी वडिलांनी घेतली होती. पुढे पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमधे दयानंदांवर संशोधन केलं गेलं आणि या व्यक्तिमत्वानं मी भारून गेले.
गुजरातमध्ये ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या दयानंदांचा मूर्तीपूजेवरचा विश्वास उडाला आणि खऱ्या ईश्वराच्या शोधात ते घरातून बाहेर पडले. अत्यंत ज्ञानी संन्यासी गुरुंकडून त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला.
त्या काळी मॅक्समुल्लर या जर्मन पंडिताने ५०वर्षांच्या कष्टाने प्रथम ऋग्वेदाची लिखित प्रत बनवली होती. त्यांना या संस्कृतीबद्दल आदर होता. पण पूर्ण ज्ञान नव्हतं. पाणिनीच्या व्याकरणाचे नियम लावून त्यांनी वेदांचा अर्थ लावला आणि त्यांना “मेंढपाळांची गाणी” म्हटलं. काही हिंदू पंडितांनीही वेदांचा चमत्कारिक अर्थ लावला होता. पण मुळात वेदांचा व्याकरण वेगळं आहे. त्याला “निरुक्त” म्हणतात. त्याच्या आधाराने वेदांचा अर्थ लावून त्यातील उदात्त, विश्ववंद्य विचारांची ओळख दयानंदांनी समाजाला करून दिली आणि वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ही त्या काळाची गरज होती. कारण ख्रिश्चनांच्या सुटसुटीत, फारशी कर्मकांड नसलेला, भेदभाव विरहित धर्म लोकांना आवडू लागला होता. मुस्लिमांचा एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा न मानणं पटू लागलं होतं. हिंदू लोक मोठ्या प्रमाणात धर्मांतर करीत होते. याचे दोन परिणाम झाले असते.
एक… राजकीय! ख्रिश्चन धर्म आवडला की ब्रिटिशांची गुलामगिरी जाचण्याचं कारण नाही. पारतंत्र्य, आपल्यावरचा अन्याय, देशाची आर्थिक लूट. . काहीच झालं नसतं. “राष्ट्र” म्हणून आपण संपलो असतो. पूर्ण राजस्थानात इस्लाम धर्माची छाया होती. तिथल्या आदिवासी जमातीत आपल्या मुली मुस्लिमांना द्यायची प्रथा होती. ही प्रथा दयानंदांमुळे बंद झाली. अन्यथा फाळणीच्या वेळी राजस्थान पाकिस्तानात गेला असता.
दुसरं म्हणजे… एक पूर्ण विचारधाराच नष्ट झाली असती. वेदांमधील भूमिती, शून्याचा शोध, विज्ञान, पशुविज्ञान, वृक्षायुर्वेद, आयुर्वेद, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, काव्य, जीवनविषयक तत्त्वज्ञान.. जे पूर्ण सृष्टीतील चैतन्याचा शोध घेतं… फक्त मूर्ती रुपातील देवतेचा नाही.. हे सगळं कालौघात विसरलं असतं. म्हणून हिंदू धर्मात मुळात एकेश्वरवाद आहे, मूर्तीपूजेचं अवडंबर नाही. जातिव्यवस्था नाही, तर गुणांनुसार व्यवसायाच्या संधी आहेत (aptitude नुसार…) हे सारं दयानंदांनी पटवून दिलं आणि वेदांचा व धर्माचा ऱ्हास थांबवला. त्यांनी या व्यतिरिक्त खूप कामं केली. त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात!!
© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
मो – 7499729209
(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खुप सुंदर लेख
या मालिकेला हार्दिक शुभेच्छा ⚘