श्री संभाजी बबन गायके
मनमंजुषेतून
☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कवी थॉमस मेकॉले यांनी १८४२ मध्ये लिहून ठेवलंय…. ‘मरण तर प्रत्येकाला येणारच आहे… कुणाला आधी तर कुणाला नंतर. परंतू भयावह विपरीत परिस्थितीशी दोन हात करतांना, आपल्या पित्याच्या राखेसाठी आणि मंदिरातल्या देवांसाठी झुंजत असताना येणारं मरण सर्वांगसुंदर!
आपली तरणीताठी पोरं अशीच मरणाला सामोरी जाताहेत. आजवरच्या सर्व मोठ्या युद्धांपेक्षा जास्त भयावह युद्ध आपले सैन्य आपल्याच सीमेमध्ये लढते आहे. आपलेच जंगल आहे मात्र त्यात परकी क्रूर श्वापदं शत्रूच्या मदतीने घुसून दबा धरून बसलेली आहेत. त्यांनी आपल्यावर झेपा टाकण्याआधी त्यांच्या अंगावर धावून जाणं हा एक धाडसी पण अपरिहार्य मार्ग उरला आहे आपल्या हाती. कारण ही जनावरं जर मुलुखात शिरली तर किती निरपराध माणसं मारतील ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पावलांचा माग काढीत काढीत त्यांच्या गुहांमध्ये शिरावंच लागतं. यात आपल्या जीवाला सर्वाधिक धोका आहे आणि हे प्रत्येकाला ठाऊक आहे… आणि तरीही आपली मुलं त्या अरण्यात शिरतात. कधी शिकार गवसते तरी कधी शिकार बनावं लागतं.
या जीवघेण्या खेळात जाणाऱ्या जीवांचा हिशेब ठेवण्यास कुणाला सवड असो नसो…. आईबापाला एकुलती एक असलेली, थोड्याच दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर उभी राहण्याच्या तयारीत असलेली, सणासुदीला नाही निदान नंतर काही दिवस घरच्यांना, म्हाताऱ्या आईबापांना, कोवळ्या लेकरांना भेटायला जावं म्हणून तळमळणारी तरूण, धडधाकट, वाघाच्या काळजाची पोरं आपल्या जीवाचा हिशेब मांडत बसत नाहीत. ती लढताहेत ते आपल्या बापजाद्यांनी प्राणांची बाजी लावून जपलेल्या देशाच्या अखंडत्वासाठी, हृदयमंदिरातल्या देश नावाच्या देवासाठी. ही पोरं जर तिथं उभी राहिली नाहीत तर देश आणि देव यांना वाली कोण असेल?
पण भारतमातेचं सुदैव असं की, एक पडला तर दुसरा त्याच जागी पाय रोवून उभा राहतो… त्याच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्यासाठी. जबर जखमी झालेलाही बरा झाल्यावर पुन्हा सीमेवर जाण्याची शपथ घेतो…..
देशवासियांनो…. सुखनैव रहा….. पोरं तिथं जागता पहारा देताहेत….. त्यांना जगण्याचा अर्थ कळाला आहे आणि मरण्याची रीत. हे जग सोडून निघून जाणाऱ्या हुतात्म्यांनो.. शुभास्ते पंथान: संतु! इकडे तुमचे देह मांडीवर घेऊन बसणाऱ्या चिता तुमच्या बलिदानाने सुगंधित झाल्या आहेत… सदगतीस प्राप्त व्हालच!
जय हिंद… `जय भारत !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈