श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ झेन आणि आनंदी राहण्याची कला ☆ श्री सुनील काळे 

झेन आणि आनंदी राहण्याची कला 

काही दिवसांपूर्वी झेन तत्वज्ञानाविषयी एक पोस्ट वाचनात आली होती . त्या पोस्टमध्ये फार सोप्या शब्दात जीवन आनंदाने जगण्याची तत्वे सांगितली होती .

* झेन हा शोधाचा आणि आनंदाने जगण्याचा मार्ग आहे. आयुष्याला आत्ता आणि इथेच अनुभवण्याचा स्पष्टपणे पाहण्याचा आणि सरळपणे अनुभवण्याचा मार्ग आहे.

* कोणतीही गोष्ट करताना ती मनाच्या विशिष्ट एकाग्रतेने,मनाच्या शांतपणानं आणि साधेपणानं करणं,ज्यात ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळतो  ही गोष्ट म्हणजे झेन होय.

*आपले आयुष्य जगत असताना आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या सोबत घडु शकणारी सर्वोत्तम गोष्ट आहे असे समजावे म्हणजे आपण आनंदात जगु शकतो.

* तुमचा सर्वात वाईट शत्रू तुमचे जितके नुकसान करु शकणार नाही तितकेच बेसावध विचार तुमचे नुकसान करु शकतात पण एकदा का आपण त्यांच्यावर प्रभुत्त्व मिळवले की आपण आनंदाने राहु शकतो.

* माणसाच्या मनातल्या नकारात्मक भावना या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात तर सकारात्मक भावना या रोगमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

* एखादी गोष्ट तेव्हाच अनुकूल ठरते जेव्हा माणूस तिच्याशी जुळवून घेतो.

* आयुष्याच्या मार्गांवर जशी तुमची वर्तणूक असेल त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य उलगडत जाते.

* तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना कशी प्रतिक्रिया देता,हे तुमच्या वैयक्तिक तत्त्वज्ञानानुळे निश्चित होतं.तुमच्या आनंदासाठी आणि हितासाठी ते पुर्णपणे जबाबदार असते .

* सत्य नेहमीच हाताच्या अंतरावर,तुमच्या आवाक्यातच असते.

* जेव्हा धामधुमीतसुद्धा तुम्ही शांत राहु शकता तीच निसर्गाची खरी अवस्था असते.

* जेव्हा तुम्ही दुःखाच्या काळातही आनंदी राहु शकता तेव्हा तुम्ही मनाचे खरं सामर्थ्य पाहु शकता.

* माझ्यासोबत जे काही घडतं ते केवळ मला त्यापासुन सर्वाधिक फायदा व्हावा या एकाच हेतुनं घडते.

* आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं,निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात आनंद कसा जोपासावा? वर्तमानात जगत असतानाही भविष्य कसं बदलावे ? याविषयी झेन तत्वज्ञान सकारात्मक शिकवते .  

आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्या विशिष्ट क्षेत्रात अनेक छोटे छोटे विषय असतात आणि या विषयात सुद्धा अनेक छोटे छोटे संप्रदाय तयार झालेले असतात . या संप्रदायानांसुद्धा अनेक वेगवेगळे फाटे फुटलेले असतात आणि या फाट्यांमध्ये सुद्धा अनेक नवनवीन प्रयोग होत असतात . 

काही जण हे प्रयोग , नव्या दिशा , नव्या वाटा , नवे विचार यांचे सहजपणे आत्मचिंतन करून आपल्या जीवनात खरोखर परिवर्तन करून घेतात . या नव्या चिंतनामुळे जो आतमधून बदल होतो , तो बदल होत असताना व झाल्यानंतर आतमध्ये अनेक रोमांचित घटना तयार होत असतात . 

आपल्या वाढण्याऱ्या शरीरात वयामुळे , अनुभवांमुळे , मनामध्ये खूप नाजुक , हळुवारपणे नकळतपणे खूप आश्चर्यचकीत करणारे बदल होत असतात पण त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो . त्यामूळे खरं तर आपले नुकसानच होते .

झेन तत्वज्ञान स्वतःला ओळखवायला , आतमध्ये डोकावयाला प्रेरीत करत असते .

एकदा एक उत्कृष्ट नाव कमावलेला , निष्णात जसे दिसते तसे रेखाटणारा , रंगवणारा निसर्गचित्रकार होता . तो वेळ मिळाला की सर्व साहीत्य घेऊन निसर्गात जायचा . डोंगर , दऱ्या , इमारती , रस्ते , नद्या , समुद्र , बोटी , किल्ले यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्र काढायचा . अगदी बारीकसारीक सर्व डिटेल्स रंगवायचा , रंगवताना तल्लीन होऊन जायचा . त्याला स्वतःचे रंगवलेले निसर्गचित्र पाहुन खूप आनंद व्हायचा व आपण खूप भारी चित्रकार आहोत असा थोडा अहंकारही त्याच्या मनात निर्माण झाला होता . त्या चित्रकाराने आपल्या निसर्गचित्रांची प्रदर्शने करून थोडेफार व्यावसायिक यशही मिळवले होते .

एक दिवस त्याने आपल्या चित्रांचा एक मोठा गट्टा सोबत घेतला आणि तो त्याच्या एका गुरूनां दाखवायला व मार्गदर्शन घेण्यासाठी घेऊन गेला . हे गुरुजी झेन तत्वज्ञानाचे अभ्यासक होते . मोठी साधना केली होती त्यांनी . गुरुजींनी त्याचे प्रत्येक चित्र नीट ,शांतपणे , व्यवस्थितपणे पाहीले आणि चित्राची फाईल पुन्हा होती तशी ठेवली .

निसर्गचित्रकाराने मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली पण गुरुजी काही पुढे बोलण्यासच तयार दिसेनात. त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला व तो परत जायला निघाला . निघताना त्याने गुरुजींच्या पायावर डोके ठेवले .

दरवाजातून बाहेर जाताना त्याने पाहीले की गुरुजी काही तरी सांगत आहेत . तो परत आत आला व जमीनीवर मांडी घालून शांतपणे डोळे मिटून बसला .

गुरुजी म्हणाले प्रत्येक ठिकाणी जाऊन जसे दिसते तसे रेखाटण्याचे कौशल्य तू फार कष्टाने मिळवले आहेस . त्याबद्दल तुझे स्वागत व अभिनंदन करतो . पण आता तुझे डोळे मिटलेले आहेत . आता तुझ्या आतमध्ये डोकावून पहा . तिथला निसर्ग तुला दिसतो आहे का ?

आपण सगळेच जण बर्हीमुखी झालेलो आहोत . आपण बाहेरचा निसर्ग , बाहेरचे रुप , बाहेरचे जग पाहुन एकमेकांची कॉपी व तुलना करून , स्पर्धा करून , जसे दिसते तसे पाहतोय . तेच चित्रण कागदावर , कॅनव्हासवर रंगवतो . आतला निसर्ग , आतला आवाज , आतले जग, आतली अद्भूत दृश्ये , आतला आनंद , आतल्या वेदना कागदावर कधी रंगवणार ?  ज्या दिवशी तु आनंद , दुःख , सर्व संवेदना रंगवायला सुरुवात करशील त्यावेळी तुझी चित्रे नक्की वेगळी असतील . निसर्गात फिरशील त्यावेळी चिंतन कर , खूप वेळा नजर खिळवून एकाच ठिकाणी बस . ते दृश्य मनात साठव . शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या , धमन्यांमध्ये ते दृश्य खेळते राहील व नंतर हृदयावर त्याचे एक प्रतिबिंब उठेल असे ठरव व नंतर त्या प्रतिबिंबालाच कागदावर उतरव . तन मन धन चित्रांवर केद्रींत कर ,एक वेगळे अनवट चित्र निर्माण होईल . जे आतून येईल ते तुझे खरे चित्र असेल.

मग मी देखील या झेन गुरुजींना मनःपूर्वक नमस्कार केला व आतून चित्र काढता येतात का त्याचा प्रयत्न करू लागलो . मनाच्या आतमध्ये खुप खोलवर गेल्यावर उंचचउंच पाचगणीच्या टेबललॅन्डचे पठार दिसू लागले . त्या पठाराच्या अतिउंच कड्यावर मी स्वतः उभा राहून खाली वाकून पाहतोय असे काहीसे दिसू लागले . सभोवतालच्या डोंगररांगा कडेकपाऱ्या , आसमंतात भरलेली शुद्ध हवा , धुक्याची किमया , सुर्यकिरणांमुळे चमकणाऱ्या निसर्गाचे अद्भूत दर्शन दिसू लागले . मग पेन्सीलने रेखाटणे करण्याचीही गरज वाटत नव्हती . सगळे रंग आपोआप एकमेकांचा हात धरून हे अनोखे आकार , वेगळे भावविश्व वेगळे रूप धारण करून चित्रे कागदावर उतरू लागली . जसजसे आत जावू लागलो तसतसे बाहेरच्या जगाचा विसर पडू लागला . स्पर्धा संपल्या, टिकास्त्रे संपली , द्वेष संपला , विरोध संपला , मोठा चित्रकार होण्याची हाव संपली . आतमध्ये एक अद्भूत उजेड आहे . एक मोठी पोकळी आहे . त्या स्वच्छ निर्वात पोकळीतून प्रवास करताना आता फक्त आनंदच आनंद दिसत आहे .

तुम्ही देखील या झेन गुरुजींचे कधी तरी ऐका 🙏

कदाचित तुम्हालाही झेन गुरुजींचे ऐकल्यामूळे धर्मभेद ,जातीभेद , व्यक्तिभेद , स्वार्थ , आंदोलने , टिकास्त्र , हिंसा , द्वेष , सामाजिक , राजकीय , आर्थिक , मानसिक भेदाभेदीचा विसर पडेल व आपल्या आतल्या अनोख्या विश्वात संचार करून नव्या प्रकाशाचा उजेड सापडेल . 

प्रत्येकाला असा आतला नवा आनंद, नवा उजेड सापडावा यासाठी शुभेच्छा ! 💐

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments