सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

 

☆ – मी गतीचे गीत गाई— – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधना ताईंचे हात बळकट तर होतेच.त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे!

विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं ,म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय! या गौरव ग्रंथात प्रत्येकाने त्याबद्दल लिहिले आहेच! त्यामुळे मी आज विकासदादांबद्दल  एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.

साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकास दादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला  गेले होते.

कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय!

विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून  त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.

कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन , पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!

आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना.मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली!

इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, “पद्मजा, काही काळजी करू नकोस,” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद…

परत धक्का देणे…असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो.

सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं  औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं ! त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्‍यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !

बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या…

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई…

दुःख उधळायास आता

आसवांना वेळ नाही….

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments