सुश्री वर्षा बालगोपाल
☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे.
असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना?
मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?
तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो.
मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते.
तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची
☆ ते माझे घर…. ☆
ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।
आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।
कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।
भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।
परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।
मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।
ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।
बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।
– श्रीराम बाळकृष्ण आठवले
आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती.
याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा.
तिने घरासाठी लागणार्या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला.
घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे.
त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.
आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे.
घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.
मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते.
दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?
आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते.
मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून?
मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?
घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?
शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्याला त्याची बाधा होणारच ना?
उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड, असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?
आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?
प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली.
घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈