डाॅ.भारती माटे

??

☆ सुईबाई गं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे  

“मावशी,अगदी थोडं दुखेल हं म्हणत सुनंदाने मला इंजेक्शन दिलं मला रोज इंजेक्शनची सुई टोचवायची म्हणून तीच हळहळायची.

मी म्हटलं,”अगं तू इंजेक्शन देत्येस म्हणून तर मी बरी होत्ये ना.गेला महिनाभर तू माझी किती काळजी घेत्येस. या सुईने तर तुझं आणि माझं इतकं छान  नातं जोडलंना गं बाई “.

तिने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली,

“मावशी तुम्ही आयुष्यभर या सुईसारखी किती प्रेमाने नाती जोडली आहेत ऐकतेय ना मी पण, तुम्हाला भेटायला येणार्या लोकांकडून”.

” हो गं बाई, मी आपली माणसं  जोडण्याचं काम करत राहीले हेच माझ्या आवडीचं काम “.

“पण तुला गंमत सांगू का?”

“नाही,पण तुला वाटेल, काय म्हातारी बडबड करतेय, पण तू आहेस ना  गं माझं ऐकायला म्हणून बोलावसं वाटतय “.

इतर वेळेस कोण असतं इथे ?कामापुरतं येतात निघून जातात.

सुनंदा म्हणाली,” नाही मावशी बोला ना मला आवडेल ऐकायला” 

मग मी सरसावलेच,” अगं एकटीच असले ना की काही बाही सुचतं बघं. आत्ता तू सुईचा विषय काढलास ना तर मला नेहमी वाटतं माणसानेच तर सुई शोधली त्यात त्याचे गुण येणारच.

बघ ना….

घरात बाई सगळं जोडते शिवते  बारिक सुईने अगदी बारीक दोरा घालून जसं कुणालाही न दुखवता ती घरातली नाती जपते आणि ती दृढ करते.

पण घरात सुद्धा सगळ्यांना एकच सुई चालत नाही आई बरोबर वेगळ्या सुया वापरते.

 त्या सुईचा एक भाऊ असतो बघ दाभण नावाचा,जाड गोणपाट शिवायला वापरतात बघ.

 जेव्हा दांड मुलं निबर तनामनाची असतात तेव्हा बारिक सुई नाही कामाची तिथे दाभणच पाहिजे दोन दणके धाकदपटशा लागतोच.

ते आईला बोबर ठाऊक असतं जे सगळ्यांना ताळ्यावर आणून एकसंध ठेवेल.

वाकळ गोधडी शिवताना बघ जरा लांब सुई लागते.

खूप अंगभर टाके घालायचे असतात ना.

जेव्हा सर्वांना एकत्र बांधून एकमेकांना एका बंधनात ठेवायचं तेव्हा अशी लांब सुई सगळ्यांना एकत्र बांधून एकमेकांना नात्यांची उब द्यायला शिकवते बघ.

आणि ती क्रोशाची सुई पाहीली आहेस का तू ?

अगं खूप काम केलं मी त्यावर.

त्या सुईला नेढं नसतं बरका नुसता थोडसं नाक वाकवून तो भास केलेला असतो पण धागा बरोबर अडकतो बघ त्यात अशी माणसं असतात बघ फार न गुंतता आपल्या जवळ हात धरुन  ओढून पण छान सुबक जाळीदार काम करुन दाखवणारी पण चटकन वेगळी होणारी जेवढ्यास तेवढं वागणारी त्यांना सौंदर्य असतं पण नात्याची उब नसते.

फार गुंतत नाहीत ती कुठं.  

आणि जरा कुठे एखादा धागा निघाला की पार सगळं कसं सहज उसवत जातं कळतच नाही.

आणि शेवटीss तुमच्याss विणकामाच्या सुयाss त्याना का सुया म्हणतात ?नाही नेढं नाही टोक. मला तर आजकाल event साजरे करणारे असतात किनई ते अश्या सुयांसारखे वाटतात.

अगदी कुणालाही न दुखवता सगळ्यांना पटापट हलवत राहतात एकमेकात गुंतून काम करत असतात तेव्हा असं वाटतं अगदी गळ्यात गळा वाटतो पण काम झालं की प्रत्येक जणं इतका वेगळा होतो की इथे थोड्या वेळापूर्वी अगदी एकमेकांजवळ येऊन  काही छान प्रसंग उभा केला होता असं वाटतच नाही.

कुठेही गाठ नाही सुई टोचल्याची खूण नाही.

कर्तव्य म्हणून सारं काही.

जशी  विणकामाच्या बाबतीत पण गंमत आहे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत उब.

दोन सुया दोन हातात नाचत नाचत धागे जोडत उब तर निर्माण करतात पण…पण सुईतून एक धागा ओढत गेलं की सगळं विणकाम उसवलं की तिथे काही दिसतच नाही काही विणलं होतं का नाही ते. अगदी तसच.

मध्ये कुठे नात्यांच्या गाठी बांधलेल्याच नसतात या सुयांनी पण खरी सुई कुणाची सांगू तुमच्या डॉक्टर लोकांची.

त्यांना साक्षात दंडवत बघ.

माणसाचं फाटलेलं शरीर जोडून परत एकसंध करणं सोपं नाही किती बारिक दोरा त्यांच्या चिकाटीचा,किती बारिक सुई त्यांच्या ज्ञानाची, अलगद हाताने टाके घालणं आणि परत ते आत विरघळून जातील असं पाहणं हे फक्त देवाचे हातच करु शकतात बघ.

त्यांची सुई पुनर्जन्म देते गं रुग्णाला आणि तुमच्यावरचा म्हणजेच देवावरचा आमचा विश्वास दृढ करते.

एकच वाईट वाटतं बघ इतक्या  सुयांनी किती मदत केली आपल्याला…..

पण बाप्पाने, डोक्यावरच्या फाटक्या आभाळाखालचं एखाद्याचं  फाटकं नशिब शिवायची सुई दिली नाही बघ माणसाला…….

“सुईबाई गं… तुलाही वाईट वाटत असेल ना मी इतकं सगळं शिवते मग मला असं नशिब का नाही शिवता येत?” 

दुवा तरी मिळाला असता.

सुनंदाने पाहिलं मावशी  आपल्याच तंद्रीत होत्या आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते 

ते पाहून सुनंदालाही आपला कढ आवरावा लागला….

तिला वाटलं किती दुखण्यातूनही यांनी मन संवेदनशील राखलय.

असं जगावं आजूबाजूचं जग न्याहाळत त्यातील गंमती शोधत.

लेखिका : सौ. नीलिमा लेले.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments