सौ. अमृता देशपांडे
स्व विनायक नरहरी भावे ( आचार्य विनोबा भावे)
(जन्म – 11 सितम्बर 1895 मृत्यु – 15 नवम्बर 1982)
☆ मनमंजुषेतून ☆ भूदान चळवळ…. ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
प.पू. आचार्य विनोबा भावे व भूदान पदयात्रा
प.पू. विनोबा भावे यांचे कार्य हे एखाद्या संताप्रमाणे दीपस्तंभासारखे आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी निःस्वार्थी सेवेची शपथ घेतली. आध्यात्मिक सत्य व नित्य व्यवहारातील कर्मे व कर्तव्ये यांचा सुंदर संगम असलेल्या महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित झाले. क्रियाशून्य व सुस्त अशा कमजोर समाजात नवचैतन्य आणणे व सत्य, अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे या गांधीजींच्या कार्याबद्धल विनोबाजींनी एके ठिकाणी म्हटले आहे, ” महात्मा गांधींच्या रूपात मी हिमालयातील शांती व क्रांतीकारी शक्ती अनुभवली. शांतीद्वारे क्रांती आणि क्रांती द्वारे शांती रा दोन्हींचा मिलाफ मी त्यांच्याकडे पाहिला.” तर महात्मा गांधीनी विनोबाजींच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात ते.म्हणतात, ” इतक्या कोवळ्या वयात विनोबांनी जी आध्यात्मिक पातळी गाठली आहे, ती उंची गाठण्यासाठी मला परिश्रम व सहनशक्ती ची पराकाष्ठा करून आयुष्यातली अनेक वर्षे खर्ची घालावी लागली आहेत.”
अशी ही गुरूशिष्याची जोडी. 1940 साली अहिंसक मार्गाने चळवळ करण्यासाठी महात्मा गांधीनी पहिला सत्याग्रही म्हणून विनोबाजींची निवड केली
सत्य, अहिंसा व प्रेमाची विश्व व्यापक शक्ती या मूल्यांवर असलेला ठाम विश्वास, या तत्वांशी असलेली वचनबध्दता या गुणांमुळे त्यांचे संतस्वरूप निश्चितच वेगळे होते. मनाचे आंतरिक सौंदर्य म्हणजे विचार व बाह्य सौंदर्य म्हणजे आचरण यांचा अलौकिक परिपोष म्हणजे पू. विनोबाजींचे जीवन.
स्वातंत्र्यानंतरही पूर्वापार चालत आलेली भारतीय भूमि समस्या कायमच होती. जमीनदार आणि भूमिहीन यांच्यात प्रचंड आर्थिक दरी होती.तेलंगणामध्ये समानता आणण्याच्या कव्पनेने कम्युनिस्टांनी हिंसक मार्गाने चळवळ उभी केली होती. शासन कायद्याने त्याचा प्रतिबंध करू पहात होते. ‘ कत्ल किंवा कानून’ हे मार्ग भूमि समस्या सोडविण्यासाठी उपायकारक ठरणार नाहीत. त्यासाठी करूणेचा शाश्वत मार्ग शोधावा लागेल असे आचार्य विनोबांचे चिंतन होते. त्यातून भूमीदान यज्ञाचा प्रारंभ झाला.
जगात विनोबाजींचे भूदान कार्य इतिहासात अभूतपूर्व मानलं जातं. विनोबाजींनी भारतभर पदयात्रा केली.
श्रीमंत जमीनदारांनी आपल्या जमिनीला काही भाग भूमिहीनांना स्वेच्छेने दान करणे हे भूदान चळवळी चे मुख्य आणि एकमेव ध्येय होते. अशा मिळालेल्या जमिनी भूमिहीनांना वास्तव्यासाठी व पीक उत्पादनासाठी वापरून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करावी हा हेतू होता. अशाप्रकारे कष्टकरी वर्ग गाव सोडून रोजीरोटीसाठी इकडेतिकडे न जाता गावातच रहावा व त्यांच्या कामाची मदत धनवान शेतक-यांना व जमीनदारांना व्हावी, तसेच मोबदल्यात मिळालेलं धन गरीब शेतक-याना मिळावे व अशा रितीने गावातील धन गावातच रहावे हा उद्देश. अशी दानात मिळालेली जमीन विकता येत नसे. जमीनदारांनी आपल्या जमिनीचा तुकडा आपल्याच भूमिहीन बांधवांना दान करावा, म्हणून ही भूदान चळवळ.
चित्र साभार >> – विनोबा भावे – विकिपीडिया (wikipedia.org)
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈