प्रा. डॉ. सतीश शिरसाठ
☆ एथनिसीटीच्या पलिकडे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
इंग्लंड मुक्कामात मी एक दिवस माझी पत्नी आणि मुलीबरोबर लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव पहायला गेलो होतो. दुपारचं जेवण आटोपल्यावर हिचीनवरून आम्ही ट्रेननं लंडनला निघालो. हवेत खूप गारठा होता. पाऊस येण्याचीही शक्यता होती. यादृष्टीने छत्री, स्वेटर, जर्कीन वगैरे
अगदी बंदोबस्तात निघालो. ऑनलाईन तिकीट काढताना पाहिलं, एका कोपर्यात एक मध्यमवयीन बाई एकटीच मोठ्याने बडबडत होती. मला ते विचित्र वाटलं. मी प्रश्नार्थक दृष्टीने मुलीकडे पाहिलं. ” ती खूप दारू पिऊन बडबडत असेल ” मुलगी म्हणाली. तिकीट काढून पुढं जाताना पत्नी म्हणाली, “काय इथल्या लोकांचं जीवन! एकाकी. कुणी बोलायला नाही ते असंच स्वतःशीच बोलत बसतात “.
काहीही असो, इथल्या गो-या लोकांच्या समाजजीवनातली एक काळी बाजू मला समजली.
आठवत नाही, कोणत्यातरी स्टेशनवर उतरून बसने लंडनमधल्या महाराष्ट्र मंडळाच्या हाॅलमध्ये पोहोचलो. इंग्लंडमध्ये रहाणारी शेकडो मराठी माणसं भेटली. काहीजण इतर देशांतूनही आले होते. अनेक पुरूष सलवार, कुर्ता तर महिला साड्या परिधान करून आल्या होत्या . सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद, मनामनात उत्साह आणि सर्वत्र उत्सवाचे वातावरण भरले होते. त्यात काही जणांचे इंग्लंडमध्ये मोठमोठे उद्योग होते. कुणी नोकरी करत होते तर काही विद्यार्थी होते. काही मुलं आपल्या आईवडीलांसोबत, तर काही वयस्कर आईवडील आपल्या मुलांसोबत आले होते.
आपले भौगोलिक, उत्पन्नाचे , वयाचे आणि इतर भेद विसरून ‘ मराठी माणूस ‘ या समान मुद्द्यावर या उत्सवात सारेजण सहभागी झाले होते. एंथ्रोपोलॉजी मध्ये याला एथनिसीटी म्हणतात.
आम्ही पोहोचलो तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले होते. अनेकांनी विविध गीते, नृत्य, संगीत सादर केले. त्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होते. ‘ सैराट ‘चित्रपटातील झिंग झिंग झिगाट गाण्यावर सारे सभागृह बेभान होऊन नाचत राहिले. ज्यांना नाचणं जमत नव्हतं, ते टाळ्या वाजवून साथ होते.
रात्री दहाच्या सुमारास आम्ही परत जायला निघालो. एखाददुसरा माणूस सोडला तर रस्त्यावर कुणीच नव्हतं. त्यात बोचरी थंडी. काही बसचा प्रवास करून आम्ही पॅडिंग्टन स्टेशनवर पोहोचलो. एका प्लॅटफॉर्मवरून संगीताचे सुरेल सूर ऐकू येत होते. उत्सुकतेने जवळ जाऊन पाहिलं. रेल्वेचा तो बॅन्ड होता. रेल्वे स्टेशन म्हणजे, गाड्यांचा धडधडाट, इतर काही कर्णकर्कश आवाज, पॅसेंजरांच्या गोंगाटात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, यांची सवय असलेल्या मला हा आश्चर्याचा धक्का होता.
रेल्वेने हिचीन स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रात्र खूप झाली होती. कधी एकदाचं घरी पोहोचतो, आणि अंथरूणात शिरून झोपी जातो असं झालं होतं. चालता चालता वर पाहिलं. विस्तीर्ण आकाशात जिकडं पहावं तिकडं अगणित तारे आणि ग्रह. कल्पना चावलांच्या एका वाक्याची समर्पकता जाणवली ..
“आकाशात पाहिलं की,आपण एका भौगोलिक सीमेत बांधले जात नाही”.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈