सुश्री वर्षा बालगोपाल
☆ जिंदगी धूप तुम घना साया … ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
दूर कुठे प्रवास करायचा तर जुनी गाणी ऐकत प्रवास करायला बहुतेकांना आवडते.
तसेच मी पण लांबच्या प्रवासात गाणी ऐकताना जावेद अख्तर यांचे जगजीत सिंह यांनी गायलेले
तुमको देखा तो ये खयाल आया । जिंदगी धूप तुम घना साया।
हे गाणे लागले होते. पळणारी झाडे घरे पहात हे गाणे ऐकताना विचारांनाही चाके लागली आणि त्यात मन रंगून गेले.
खरेच आयुष्य जगायचे म्हणजे त्यामधे कोणीतरी भक्कम साथ देणारे असावेच लागते. मग ती साथ जोडीदाराची , मित्र/मैत्रिणीची, आई-वडिल, मोठ्या व्यक्तींची, हितचिंतकांची असो. पण जीवनातील सुख दु:खे आपण कोणाबरोबर तरी वाटून घेतली तर जगण्याची मजा कितीतरी पटीने वाढते ना?
अशावेळी आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तीचे स्थान अनन्यसाधारण होऊन जाते. ते किती अनमोल आहेत हे सांगायलाच आपल्या जोडीदाराला उद्देशून लिहिलेले जावेद अख्तरांचे हे शब्द.
जोडीदाराबद्दल जरी लिहिलेले शब्द असले तरी आपल्या आयुष्यात असलेल्या अनन्यसाधारण महत्वाच्या कोणत्याही व्यक्तीला हे शब्द अगदी लागू पडतात.
ज्याच्यामुळे आपले आयुष्य घडते, ज्याच्यामुळे आपण संकटावर मात करू शकतो, ज्याच्यामुळे मनाला एक उमेद मिळते, त्याबद्दल असे विचार येतात. जेव्हा मन पोळलेलं असत, संकटांनी घेरलेलं असतं तेव्हा त्याला शीतलता देणारं, आशा दाखवून चांगली वाट दाखवणारं असतं तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा आदर वाढलेला असतो.
नवर्याच्या यशामागे भक्कमपणे उभी राहिलेली पत्नी, मुलांना मोठे करण्यासाठी दिवसभर राबून कौतूक करणारे आई-वडिल, होतकरू हुषार मुलाला चांगल्या शिक्षणासाठी मदत करणारे शिक्षक, संकटात सापडलेल्या मित्राला मदतीचा हात देऊन कायम त्याच्या बरोबर रहाणारा मित्र, कोणा चांगल्या मुलाला अनुभवाचे बोल सांगून त्याच्या मनाला उभारी देणार्या मोठ्या व्यक्ती, एखाद्याचे चांगले गुण ओळखून त्या गुणांना प्रोत्साहन देणारे हितचिंतक हे सगळे मग घना छाया होतात आणि ओठी शब्द येतात जिंदगी धूप तुम घना साया•••
पण याही पेक्षा मोठा अनुभवही आला. आमच्या समोरच रहाणार्या ८५ वर्षाच्या आजी. काही दिवसांपूर्वीच त्यांचे यजमान वारले. मुलगा परदेशातून येऊन काही दिवस राहिला. पण नंतर त्याला जावेच लागले. मुलगी पण सासरी गेली.
मुलगी म्हणाली चल माझ्या सोबत. मुलगा पण म्हणाला तुला तिकडे परदेशात नेतो. पण आजीचा हट्ट जो पर्यंत माझे हातपाय धड आहेत तो पर्यंत मी कुठेच येणार नाही. अगं पण तू एकटी कशी राहशील? मुलांनी काळजीपोटी ते पण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, मी एकटी कुठे? माझ्या बरोबर तो तारणहार आहे ना . तो करेल सगळं नीट. आजपर्यंत माझे सगळे सुख दु:ख मी त्याला सांगत आले आणि कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यानेच तर माझी मदत केली.
यावेळी पण तो माझ्या सोबत आहे आणि इथून पुढेही राहील.
दूर कुठे तरी तेच गाणे लागले होते तुमको देखा तो ये खयाल आया••• आणि लगेच सगळ्यात श्रेष्ठ तो परमेश्वर आहे याची खात्री पटली आणि जिंदगी धूप तुम घना साया या गाण्याची प्रार्थना झाली.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈