सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
“मुखी रामनाम गाऊ, मुखी रामनाम!” हे ऐकतच लहानाची मोठी झाले .गोंदवलेकर महाराजांनी रामनामाची उपासना सांगितली होती, ती आमच्या घरात चालू होतीच.. त्यामुळे घरातील वातावरणाचा मनावर प्रभाव असल्याने ‘जेथे राम, तेथे नाम’ अशी श्रद्धायुक्त भावनेने उपासना चालू आहे.
सध्या अवघ्या पुण्याला या रामवस्त्राने ऊब पांघरली आहे असे म्हणायला हरकत नाही! डेक्कन जिमखान्यावरील फर्ग्युसन रोडला अनघा घैसास यांच्या “सौदामिनी” साडी सेंटर मध्ये राम वस्त्र विणण्याचे आयोजन केले आहे, असे कळल्यावर आपण तिथे जाऊन दोन धागे तरी विणू या असं मनानं ठरवलं होतं! दोन-तीन दिवस या विचारातच गेले. मग माझ्या दोन तरुण मैत्रिणी जान्हवी आणि योगिता यांच्याबरोबर मी ‘सौदामिनी’ दुकानात गेले. तेथील वातावरण पाहून मन भारावून गेले. त्या दिवशी फारशी गर्दी ही सकाळी नव्हती, त्यामुळे आम्हाला आरामात चार धागे विणण्याची, हात मागाजवळ स्वतःचा फोटो काढून घेण्याची, तसेच रामाच्या मूर्तीचा फोटो काढण्याची संधी मिळाली! मनाला खूप समाधान वाटले. त्यानंतर मात्र रोज राम धागा विणायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि त्या भाविक वातावरणाचे वस्त्र सर्वांच्या मनात विणले जाऊ लागले. ‘इतके काय आहे, तिथे बघूया तरी!’ या विचाराने माझ्या मिस्टरांनी मला तिथे जायचंय अशी इच्छा व्यक्त केली. मी काय एका पायावर तयार होते! रामसेवेत आणखी चार धागे विणायला मिळतील म्हणून! आम्ही सकाळी तिथे दहा वाजता पोहोचलो. आता पहिल्यापेक्षा गर्दी खूपच वाढली होती. रांग लावावी लागत होती.
तरीही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असल्यामुळे आम्ही दोघे लवकरच आत गेलो.रामनामाचे धागे पुन्हा एकदा विणताना मन भरून आले..हे विणलेले वस्त्र आता अयोध्येला जाणार या कल्पनेने!
श्रीराम हे आपल्या देशाचे उपास्य दैवत आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही! राम आणि कृष्ण हे परमेश्वराची दोन्ही रूपे आपल्यासाठी पूजनीय आहेत.ग. दि. माडगूळकरांच्या गीत रामायणातील वर्णनाने सुद्धा श्रीरामाची नगरी, अयोध्या आपल्या डोळ्यासमोर येते!” श्रीरामाच्या पूजेसाठी आज *अयोध्या सजली…..”हे गीत पुन्हा एकदा 22 जानेवारीला आपल्या ओठावर येणार आहे. श्रीरामांचा आदर्श कायमच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अयोध्याचा राजाराम, एक पत्नी व्रत असणारा राम, आपल्या माता-पित्याबद्दल आदर दाखवणारा राम, आपल्या बंधूंबद्दल प्रेम असणारा राम, सर्व प्रकारच्या नात्यांना जोडणारा हा श्रीराम आपल्यासाठी आदर्श आहे!
रामभूमी मुक्त करून घेण्यासाठी खूप मोठा लढा हिंदूंना द्यावा लागला. पण आता खरोखरच ते रामराज्य थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसू लागले आहे.
दोन धागे रामासाठी विणायचे म्हंटल्यावर गेले काही दिवस हजारोंच्या संख्येने राम धागा विणण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. आपली रामा बद्दलची श्रद्धा येथे रामनामात गुंतली आहे. जी वस्त्रे अयोध्येला जाणार आहेत, त्याचा एक अंश भाग तरी आपल्या हातून विणला जावा , या श्रद्धेने येथे लोक येत आहेत. प्रत्येक जण दोन धागे विणतात, तिथं असणाऱ्या मूर्तीला श्रद्धेने नमस्कार करतात आणि कृतार्थ भावनेने परत जाताना म्हणतात,’ रामराया तुझ्या वस्त्राचे दोन धागे विणण्याचे भाग्य मला मिळाले, ही तुझी माझ्यावर तेवढी कृपा आहे! एका श्रध्देने समाज एकत्र येतो. आपल्यातील एक विचार वाढीला लागतो, हे केवढे मोठे समाज मन जोडण्याचे काम या रामनामाच्या धाग्यांनी केले आहे. या एकूणच संकल्पनेला माझा मनापासून नमस्कार ! *जय श्रीराम!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈