डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – २ – लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

१९८६ साली माझी बदली पुणे येथे झाली. पुणे येथे असतांनाच लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या आंतरराष्ट्रीय , इंग्रजी माध्यमाच्या योग शिक्षक प्रशिक्षण केंद्रात मला प्रशिक्षण घेण्याचा योग आला. अनेक देशांतील डोळस प्रशिक्षणार्थी असतांनाही मी तेथे उत्तम प्राविण्य संपादन केले. पुणे येथे असतांनाच समाजशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत एम्. ए. उत्तीर्ण झालो. पुणे महानगर पालिकेने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मला प्रदान केला. 

१९९९ साली नाशिक येथील शासकीय अंध शाळेत माझी बदली झाली. येथील मुलांना संगीत शिकवले जात होते. माझ्या गीतांना संगीताची साथ मिळू लागली. त्यामुळे माझी नवनवीन देशभक्तीपर व सामाजिक गीते नावारूपाला आली. सौ. शारदा गायकवाड या स्वाध्यायी समाजसेविकेच्या पुढाकारामुळे ‘ज्योतीकलश’ हा माझा पहिला काव्यसंग्रह २००२ साली व ‘ चैतन्यचक्षू’ हा दुसरा काव्यसंग्रह २००४साली प्रकाशित झाला. नाशिक जिल्हा परिषदेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन माझा गौरव केला. समाजकल्याण खात्याच्या नाशिक विभागीय कार्यालयाने ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ मला दिला. राष्ट्रीय अंधजन मंडळाच्या महाराष्ट्र राज्य शाखेने ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार मला प्रदान केला. याच काळात स्वाध्याय प्रणित तत्वज्ञान विद्यापीठाच्या चार परीक्षा मी उत्तीर्ण झालो. त्यातील ‘ विचक्षण’ परीक्षेत मला जागतिक मेरीट प्राप्त झाले. 

माझ्या जीवनात अभूतपूर्व असा योग चालून आला. आजवर कुठल्याही शासकीय अंध शाळेतील अंध शिक्षकाला अधिक्षकाचे पद प्राप्त झालेले नव्हते. परंतु मला ते मिळाले. शासकीय अंध शाळा कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अधिक्षक पदावर मी रूजू झालो. त्या काळात कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषदेशी मी जोडला गेलो. या परिषदेतील वृंदा कांबळी यांनी माझ्या निवडक १८ कवितांच्या आधारे ‘सहा टिंबातून’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबतची संकल्पना अशी की जिल्ह्यातील निवडक प्राध्यापक, गायक, आकाशवाणी निवेदक अशा सहा व्यक्तींना प्रत्येकी तीन कविता गायन किंवा वाचन करण्यास दिल्या. त्यासाठी योग्य असा निवेदन पट तयार केला. अनेक तालुक्यातून हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 

अधिक्षक पदाची कारकिर्द यशस्वी रित्या पार पाडून २०१४ साली मी सेवानिवृत्त झालो. 

सेवानिवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो परंतु मला तो पडला नाही. नाशिक ही कवी लेखक नाटककार यांची साहित्य पंढरी आहे. या साहित्यिक मेळ्यात मी स्वतःला झोकून दिले. खऱ्या अर्थाने  माझ्या कवितांना जनाधार प्राप्त झाला.माझे अंधत्व गौण मानून माझ्या प्रतिभेचा आदर केला गेला. अनेक कविमंडळे नाशिकमध्ये आहेत. दर आठवड्याला कुठे ना कुठे कविसंमेलन होतेच. त्यात सहभाग घेऊ लागलो. २०१६ साली ‘दृष्टीपल्याड’ हा माझा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. विशेष म्हणजे मी ज्या शासकीय विद्यानिकेतनात शिक्षण घेतले होते त्यातील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 

अनेकांच्या आग्रहाखातर ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे माझे आत्मचरित्र २०१७ साली भव्य समारंभात प्रकाशित झाले. हा भव्य समारंभ म्हणजे शासकीय विद्यानिकेतनाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन होता. संपुर्ण महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास हजर होते. 

इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेने भगवत गीतेवर आधारित ‘गीताप्रज्ञा’ ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती.या परिक्षेत ९४% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या शुभहस्ते मला रू १५००० चा पुरस्कार एका भव्य समारंभात प्राप्त झाला.

सेवा निवृत्तीनंतरचा काळ अधिक सुखाचा व अधिक कार्यमग्न होण्यासाठी बोलका कॉम्प्युटर व बोलका मोबाईल हाताळण्याची कला मी अवगत केली. अनेक साहित्यिक व्हाट्सऍप गृपवर माझ्या कविता प्रसारित होऊ लागल्या. १० व ११ जून २०१७ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय अंध अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मला मिळाला तसेच २०१७ साली लिमका बुक रेकॉर्ड्स साठी सलग २४ तास कविसंमेलन पुणे येथे   माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

राज्यभरात अनेकदा अंध अपंगांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद मी भूषविले.तसेच डोळस कवींच्या अनेक संमेलनात माझ्या कवितांना तसेच काव्यसंग्रहांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ऑनलाइन काव्यस्पर्धेत वारंवार पुरस्कार प्राप्त होत आहेत.गझल या काव्यप्रकारातही माझी यशस्वी वाटचाल चालू आहे.

माझ्या मराठी व अहिराणी कविता वृत्तबद्ध व छंदोबद्ध असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकजण त्या कवितांचे गायन करून ऑडिओ पाठवतात. काही यूट्यूब चानलवर त्या गायनाचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात.  

डिसेंबर २०२१ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दूरदृष्टी या माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचे व काळोखातली प्रकाशवाट या आत्मचरित्राच्या विस्तारीत आवृत्तीचे प्रकाशन

झाले.  जानेवारी २०२३ मध्ये प्रतिभेचे नंदनवन हा माझा पाचवा काव्यसंग्रह नाशिक येथे कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात प्रकाशित झाला. 

अशाप्रकारे माझा यशस्वी जीवनप्रवास चालूच आहे.अंधत्वाबद्दल मी कधीही देवाला दोष दिला नाही कारण सर्वसामान्य माणसाप्रमाणेच मी आयुष्य जगलो. माझा मुलगा उत्तम प्राथमिक शिक्षक असून मुलीचे एलएलबी झाले असून तिचे पती भारतीय लष्करात ‘मेजर’ पदावर आहेत. चार नातवंडांसह  आमचे परिवार सुखी आहेत. कथा संपावायच्या आधी मला प्रामाणिकपणे कबूल करावेच लागेल की माझ्या जीवन प्रवासात माझी पत्नी सौ. रेखा हीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शेवटी जाता जाता एक स्वरचित कविता सादर करत आहे.

☆ चैतन्य-चक्षु ☆

(वृत्त आनंदकंद)

चैतन्य-चक्षु अपुले, जागे सदैव ठेवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

शिखरास उंच पाहू, पंखात जिद्द ठेवू  

ध्येयास गाठण्याला, उत्तुंग झेप घेऊ  

नैराश्य टाळण्याला, गाणे मधूर गाऊ  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

सृष्टी दिसे न काही, मज मान्य न्यूनता ही  

दैवास दोश द्यावा, ऐसे न यात काही  

जन्मास पाहण्याची, दृष्टी सकार ठेवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

नेत्रांध हो कुणी हा, प्रारब्ध जीवनाचा  

स्वार्थांध वासनाधिन, हा दोष मानवाचा  

टाळून या विकारा, गुणवान सर्व होऊ  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

काही असे करू की, दिपवू अखील विश्व  

म्हणतील अंध असुनी, झाला प्रकाश-पर्व  

अंधार आवसेचा, दीपावलीत भुषवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

— समाप्त — 

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments