सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 11 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
माझा भरत नाट्यम् च्या नृत्यातील एम.ए. चा अभ्यास सुरु झाला. ताईनी मला नृत्यातील एक एक धडे द्यायला सुरवात केली. एम. ए.. करताना मला ज्या ज्या अडचणी आल्या., त्याचे वर्णन करताना., त्या आठवताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो आणि आधीच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या त्याचे काहीच वाटेनासे होते. कारण एम.ए. सारखी उच्चपदवी मिळविण्यासाठी अखंड परिश्रम., मेहनत आणि मुख्य म्हणजे एकाग्रता यांची अत्यंत गरज असते. त्यावेळी माझा हा अवघड अभ्यास सुरु असताना माझ्या आई बाबांच्या वृद्धापकाळामुळे., वयोमाना प्रमाणे खालावणारी प्रकृति., त्यांच्या तब्येतीत होणारे चढउतार यामुने मी खूप अस्वस्थ आणि अस्थिर होऊन गेले होते.
त्यावेळी माझ्या भावाने मिरज – सांगलीच्या मध्यावर असणाऱ्या विजयनगर या भागामध्ये घर बांधले होते. त्याचवेळी माझ्या आईच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आम्हा तिघांनाही तो तिकडे घेऊन गेला होता. पण माझा नृत्याचा क्लास मिरजेत असल्यामुळे मला तिकडून ये- जा करावी लागत असे. शक्यतो माझा भाऊ मला कार मधून सोडत असे पण ज्यावेळी कामामध्ये तो व्यस्त असे त्यावेळी बाबा वडाप रिक्षाने मला सोडत असत. नेमका त्याच वेळी बाबांचा पार्किसन्स चा विकार विकोपाला गेला होता. पण मी एम.ए. करावे ही त्यांची जबरदस्त इच्छा होती. त्यामुळे कोणत्याही अडचणीना आम्ही कोणीच दाद देत नव्हतो.
वडाप रिक्षाची वाट पाहात आम्ही जेव्हा उभे असू त्यावेळी आम्हाला बरेचदा रहदारीचा रस्ता क्रॉस करून जावे लागत असे.त्या रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी भरधाव धावणाऱ्या गाड्या सुसाट धावत असत.त्यामुळे आम्ही ही जीव एकवटून रस्ता ओलांडत असू.त्यावेळी मला बाबांच्या हाताची थरथर जाणवत होती आणि चालताना ही त्यांना होणारे परिश्रम समजून येत होते.पण ते कोणतीही तक्रार न करता माझ्यासाठी भर दुपारी येत होते.त्यांच्या जिद्दीचे पाठबळ होते म्हणूनच तर सगळे जमू शकले.
नृत्याच्या प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन सुरू झाले होते.पण आता प्रश्न होता तो थिअरी चा.एम ए च्या अभ्यासासाठी., भारतीय नृत्यांच्या अभ्यासाबरोबर तत्त्वज्ञान या सारखा किचकट विषय होता.अशा एकूण प्रत्येक वर्षी चार पेपर्स चा अभ्यास मला करायचा होता.आता मोठा प्रश्न होता तो वाचनाचा.मला., मी अंदमानला जाऊन आल्यावर., ज्यांनी माझी मुलाखत घेतली होती., त्या सौ अंजली ताई गोखले यांची आठवण झाली.आणि मी त्यांना फोन केला.त्यांनी मला वाचून दाखवायला सहज आनंदाने होकार दिला.अशारितीने माझा तोही प्रश्न सुटला.ताईंनी त्यांच्या एमएच्या काही नोट्स मला वाचण्यासाठी दिल्या होत्या.त्याव्यतिरिक्त खरे मंदिर वाचनालय यामधून संदर्भग्रंथ आम्ही मिळवले होते.अशा तऱ्हेने एम एच या अभ्यासाचे रुटीन छान बसले.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈