श्री अमोल अनंत केळकर

??

☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते. 

पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.

“बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना” आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले. 

एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.

“ओ आजोबा नीट घेऊन खा की?” मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. 

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला. 

“काळजी करू नकोस, बाबा सापडले!!” कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!

त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली. 

“काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???”

त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले. 

“हे आजोबा कोण आहेत तुमचे?” मी विचारले.

“वडील आहेत माझे.” त्याचे उत्तर.

“त्यांना काही त्रास आहे का?” माझा पुढचा प्रश्न.

“हो त्यांना अल्झायमर आहे.”

अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता. 

” मग हे आजोबा असे कुठेही जातात का?” 

” हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत.”

मी शॉकच झालो. 

“मग तुम्ही यांना शोधता कसे?”मी विचारले.

“आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी.”

“असे वारंवार होत असेल” मी आश्चर्याने विचारले. 

तो स्मितहास्य करून म्हणाला “महिन्याला एक दोन वेळेस”

“काळजी घ्याआजोबांची ! बाप रे काय हा वैताग” मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, “बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं.”

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.              

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.

उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो…                 

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments