श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “२०२४ मध्ये…” ☆ श्री मंगेश मधुकर

अजून एक वर्ष संपलं .. .. 

सरत्या वर्षाला निरोप देताना,

नवीन वर्षातसुद्धा आजूबाजूला, 

भावनांवर ताबा नसणारे,

कशानंही ‘ईगो’ दुखावणारे,

रागावर कंट्रोल नसणारे,

कायम अस्वस्थ असणारे,  

विचार न करता वागणारे,

जाईल तिथं स्वार्थ पाहणारे,

मुखवटे घालून बोलणारे,

नात्यांपेक्षा व्यवहाराला महत्व देणारे, 

स्वतःच्या आगाऊपणाचं कौतुक वाटणारे,

नेहमीच दुसऱ्यांच्या चुका दाखवणारे,

ईएमआय, इंटरनेट, इमोशन्स यात गुरफटून 

वर्षातले ३६५ दिवस टेंशनसोबत जगणारे,

सुशिक्षित असूनही अडाण्यासारखं वागणारे,

पैशाचा माज दाखवणारे,

फालतू गोष्टीवर वारेमाप खर्च करणारे,

सेलिब्रेशनसाठी निमित्त शोधणारे,

उथळ गोष्टीत आनंद मानणारे,

सार्वजनिक ठिकाणी मूर्खासारखं वागणारे,

निर्लज्जपणे वाहतुकीचे नियम तोडणारे,

गर्दीत बेफाम गाडी चालवणारे,

फोनवर बोलत ड्रायव्हिंग करणारे, 

स्वतःबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे,

कुठंही वेडयावाकड्या गाड्या पार्क करणारे,

रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानं थाटणारे,

अशा दुकानातून खरेदी करणारे,

रस्त्यावर कचरा टाकणारे,

कुठंही पचकन थुंकणारे, 

अन्न फेकून देणारे,

डॉक्टर असूनही व्यापाऱ्यासारखं वागणारे,

दुकानासारखं हॉस्पिटल चालवणारे, 

वाढदिवस सार्वजनिक साजरा करणारे,

जागोजागी फ्लेक्स लावून स्वतःची टिमकी वाजवणारे,

फुटकळ कामाचे वारेमाप प्रदर्शन करणारे,

शोभत नसताना विचित्र फॅशन करणारे,

सोयीनुसार रूढी-परंपरा पाळणारे,

‘आमच्यावेळी असं नव्हतं’ हे सतत ऐकवणारे,

वेळ कसा घालवावा या विवंचनेत असणारे,

वय वाढलं तरी हेका न सोडणारे,

माणसांपेक्षा मोबाईलला जवळचा मानणारे, 

सतत फोनवर बोलणारे,

हेडफोडवर गाणी ऐकत चालणारे,

सोशल मीडियाला भुलणारे,

खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडणारे, 

लाईक्स,कमेंट हेच आयुष्य मानणारे,

चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणारे,

राजकारणाचे खेळ आणि 

खेळातले राजकारण पाहत गप्प बसणारे,

अजूनही नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणारे,

आणि आपसात भांडणं करणारे,

आणि 

नव्या वर्षात यंव करायचं, त्यांव करायचं 

असं नित्य नियमानं ठरवणारे आरंभशूर,

 

…… असे मी, तुम्ही, आम्ही, आपण सारे एकाच माळेचे मणी……..

 

सो कॉल्ड मॉडर्न लाईफमध्ये 

अस्वस्थता, बेचैनी आणि मोबाईल सतत सोबत,

जावं तिथं गर्दी आणि गोंगाट, 

सगळी सुखं आहेत तरी मन शांत नाही 

माणसं असूनही किडा-मुंगीसारखं जगणं.

त्याच त्या चक्रात फिरत राहणं.  

स्वप्न,अपेक्षा पूर्ण करण्याच्या धावपळीत 

तब्येतीला फारच गृहीत धरलं जातयं.

डायबेटिस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे कायमचे सोबती 

फार लवकर आयुष्यात येऊ लागलेत… वेळीच काहीतरी करायला हवं.

नाहीतर दिवसेंदिवस हे वाढत जाणार.

जीव तोडून कमावलेला पैसा, 

जीव टिकवण्यासाठीच खर्च होणार, 

तेव्हा …… 

नंतरचा पश्चात्ताप टाळण्यासाठी थोडा विचार करा…  

नक्की काय चुकतंय हे शोधा….. 

 

समाजासाठी, घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी…… 

2024 मध्ये…….फक्त कॅलेंडरच नाही …. तर काही सवयीसुद्धा बदलू या.

‼सर्व वाचकांना नवीन वर्षातला प्रत्येक दिवस मनासारखा, आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा‼

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments