सुश्री सुनीला वैशंपायन
मनमंजुषेतून
☆ अशी ही म्हातारपणाची तऱ्हा..!! – लेखक : कृष्णकेशव ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆
परवा व्हाट्सअपवर म्हातारपणावर एक सुंदर कविता आली होती आणि त्यात दोन अगदी छान ओळी होत्या..!
🌹 तुम्हीच सांगा छंद
जोपासायला वयाचा संबंध असतो का ?…
रिकामटेकडं घरात बंद
माणूस आनंदी राहतो का ?” 🌹
छंद जोपासायला वयाचा संबंध असतो की नाही हे मला माहित नाही पण माझे काहीं म्हातारे मित्र आणि त्यांचे अफलातून छंद बघितल्यावर ‘रिकामटेकडेपणा बरा पण छंद आवर’ असं काहीसं मला हल्ली वाटायला लागलंय..
आता हेच बघा ना..!
आमच्या सोसायटीत पहिल्या मजल्यावर राहणारे कुंभकोणी काका..!
नेमकं मुलांच्या प्ले एरिया समोरचं त्यांचा फ्लॅट आणि मुलं सकाळ संध्याकाळ खेळायला आली की कुंभकोणी काका न चुकता गॅलरीत हजर..! किंबहुना गॅलरीत बसून मुलांवर डाफरत राहणे हा त्यांचा आवडता छंद..!!
“अरे किती आरडाओरडा करताय..खाली येऊन एकेकाला फटके दिले आणि बॉल ‘जप्त’ केला म्हणजे तुम्हाला समजेल..!”
दिवसातून एकदा तरी हा डायलॉग सगळ्या सोसायटीला ऐकू येतोच..
फिरायला जाणं अथवा सिनीयर कट्ट्यावर गप्पा मारत बसणं असल्या ‘टाईमपास’ गोष्टीत त्यांना इंटरेस्ट नव्हता..आयुष्य सगळं महापालिकेत ‘वसुली अधिकारी’ म्हणून गेल्यामुळे ‘जप्ती’ हा त्यांचा आवडता विषय..!
आणि चुकून एकदा कधीतरी बॉल त्यांच्या गॅलरीत येऊन पडला की कुंभकोणी काका तो बॉल घेऊन खाली जाईपर्यंत सगळी मुलं तेथून गायब झालेली असायची..!
पण कोणी बॉल मारलाय हे काकांच्या बरोबर लक्षात असायचं आणि मग त्याच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडीलांबरोबर कुंभकर्णी काकांची ‘ट्वेन्टी ट्वेन्टी’ सुरू व्हायची ती लवकर संपायची नाही..!
नाहीतरी कुंभकोणी काकांना सोसायटीची सगळी नियमावली तोंडपाठ असल्यामुळं त्यांच्याशी वाद घालणं अवघडचं..!
आणि मग तो बॉल ‘जप्त’ झालेला असायचा हे इथं सांगायला नकोच..!
(असे आत्तापर्यंत जप्त झालेले पंधरा वीस बॉल तरी कुंभकोणी काकांच्याकडे असतील.)
यंदा काहीं मोठ्या मुलांनी शेवटी चिडून त्यांचा दाराबाहेर ठेवलेला लाकडी शू-रॅक मध्यरात्री होळीत टाकायचं ठरवलं होतं..पण कुंभकोणी काकूंनी चार बॉल गुपचूप परत केल्यामुळें तो प्लॅन मुलांनी कॅन्सल केला..!!
धुमाळसाहेबांची मात्र वेगळीच तऱ्हा..!
तहसीलदार या पदावरून ते निवृत्त झालेले.. त्यामुळे वरुन आणि (टेबल)खालून भरपूर कमावलेलं..त्यांनी तीन चार बॅंकेत एफ डी आणि सेव्हींग खाती उघडून ठेवली आहेत..
आणि रोज एका बॅंकेत जाऊन सेव्हींग खात्यात हजार दोन हजार भरणे किंवा काढणे हा त्यांचा आवडता छंद..!
एकदा मी त्यांना विचारलं..”कशाला रोज बॅंकेत जाता..एटीएम कार्डनं पैसे काढत जा..जाण्यायेण्याच्या त्रासपण होणार नाही.. आणि हल्ली ‘होम बॅंकींग’ची पण सोय आहे..!”
ते हसून म्हणाले ” अहो त्यात कसला आला त्रास.!
उलट तेवढाच माझा तास दोन तास छान वेळ जातो..!
एकदा कौंटरवर टोकन घेतलं की अर्धा पाऊण तास तिथं एसीमध्ये कोचवर बसून आराम करता येतो..काहीं बँकेत वाचायला पेपर पण ठेवलेला असतो.!
आणि माझी मोठी डिपॉजीटस असल्यामुळे कधी कधी चहा पण मिळतो..! इथं घरी मुलगा व्यायाम करा, हे करा ते करा म्हणून सारखं मागे लागत असतो.!” (धुमाळ साहेबांनी जास्तीत जास्त वेळ बॅंकेत घालवता यावा म्हणून बॅंकासुद्धा जास्त गर्दी असलेल्या ‘सिलेक्ट’ केल्यायतं.!)
आता मला सांगा बॅंकांमधून कितीही एडव्हान्स टेक्नाॅलॉजी आली आणि सर्व्हिस इंम्प्रुव्हमेंट झाली तरी धुमाळांच्या या ‘लॉजीक’पुढे तिचा काय उपयोग होणार..!
शेजारच्या वींगमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शेंडेकाकांची तर वेगळीच गोष्ट..!
आईवडीलांना वरच्या फ्लोअरवर जायला यायला त्रास नको म्हणून मुलानं कौतुकानं ग्राऊंड फ्लोअरला फ्लॅट घेतलेला..! पण शेंडेकाकांना रोज सकाळी कोवळ्या उन्हात बसून पेपर वाचण्याची (गावाकडची) सवय..! आणि खाली ऊन येत नाही म्हणून शेंडेकाका रोज सकाळी पाच पन्नास
पायऱ्या चढून टेरेसवर जाऊन पेपर वाचत बसतात..! (तेवढाच पायांना व्यायाम होतो हे त्यांच अॅडिशनल लॉजिक.!)
आता ह्याला काय म्हणणार ..?
आणि शेवटी जे व्हायचं ते झालंच.. मागच्या आठवड्यात खाली उतरताना एक पायरी चुकली आणि पंधरा दिवसासाठी शेंडेकाकांना प्लॅस्टर घालून घरात बसावं लागल..!
माझा एक मित्र आहे.. बॅंकेतून रिटायर झाल्यापासून त्यानं वेळ घालवण्यासाठी एक छंद लावून घेतलाय..
रोज सकाळी उठलं की वॉटस्अपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मयतीचे शोकसंदेश देण्याचा.. आणि तेही कवितेत..!!
(कवि होण्याचं त्याच स्वप्न राहून गेल होतं.)
आणि तेवढ्यासाठी मित्रांचे, नातेवाईकांचे.. त्यांच्या भाऊबंदाचे असे आठ दहा गृप जॉईन केलेत.!
आणि मग एखाद्या गृपवर कुणाच्या वाढदिवसाचा मेसेज दिसला रे दिसला की शुभसंदेश आणि याची कविता तयार..!
“तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळणारा झरा..
सळसळणारा शीतल वारा..
पिवळ्या उन्हातील
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा..
तुला खूप खूप शुभेच्छा..!”
प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्याच्या काव्य प्रतिभेला असा नवीन नवीन बहर येत असतो.!
आणि अगदीच कुणाचा वाढदिवस नसेल तर हा अमिताभ बच्चन ‘माधुरी दिक्षित मोदीजी अशा सेलिब्रिटींचे वाढदिवस आपल्या मोबाईलवर उत्स्फूर्तपणे साजरा करत असतो..!!
संध्याकाळी सोसायटी च्या सिनियर सिटिझन कट्ट्यावर येणाऱ्या आबा पवारांचा किरकिर आणि कुरकुर हा स्थायीभाव..!
बायको असताना “आज भाजीच तिखट झाली.. चटणीचा भुगा झालाय, चहात साखर जास्त पडलीय” अशी सतत किरकिर करून सगळा संसार करपवलेला..!
आणि आता कट्ट्यावर बसलं की सुनेच्या तक्रारीचा पाढा वाचायला लागायचं.. (सूनेसमोर बोलण्याची काय बिशाद..?)
“बर्वेकाका.. आजकालच्या सुनांना घरातल्या वडीलधाऱ्यांबद्दल अजिबात प्रेम आणि आपुलकी वाटत नाही.. तुला सांगतो आजपर्यंत एकही दिवस माझ्या सूनबाईनं मला समोर उभं राहून जेवायला वाढलं नाही.. डायनींग टेबलवर ताट वाढून ठेवलेलं असतं आणि ती कायम बेडरूममध्ये बसून वॉटस्अपवर मेसेज बघत बसलेली असते..! सासऱ्याची अजिबात किंमत नाही..! “
“अरे तुझी सून निदान ताट वाढून तरी ठेवते.. इथं मला रोज सुनबाईचा जेवणाचा डबा डबेवाल्याकडे भरून द्यावा लागतो..! पण मी तुझ्यासारखं कुंथत नाही.
मुलगा सून दोघही नोकरी करतात.. दिवसभर कष्ट करतात त्यामुळं हातपाय धड आहेत तोपर्यंत आणि आपल्याला जमेल तशी त्यांना मदत करायची..! आपलं ओझं होऊ द्यायचं नाही..म्हणून मी प्रेमानं ते करतो..!
आणि हो.. तुझ्या सूनेची तरी काय चूक आहे..? ती समोर असली की तू तिच्या स्वयंपाकातलं अधिक उणं काढणार.. त्यापेक्षा समोर नसलेलं बरं..!”
काकांनी आबा पवारांच्या वर्मावरच बोट ठेवलं..
बर्वेकाका म्हणजे तसे आनंदमुर्ती..! म्हातारपण कसं आनंदात जगावं वागावं याच प्रात्यक्षिकच..!
पंचाहत्तरी ओलांडली तरी रोज सकाळी वॉकींग योगा.. त्यामुळं तब्बेत ठणठणीत..! घरची भाजी आणायला निघाले तरी सगळ्या शेजाऱ्यांना विचारत जायचे..” बाजारात चाललोय.. कुणाला काहीं आणायचय कां..? येताना घेऊन येतो..”
मागच्या महिन्यात त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं.. गृपवर त्यांनी मेसेज टाकला होता.. “मला नवीन गुडघे आले आहेत.. सगळे न विसरता बघायला आणि त्यानिमित्तानं चहाला या..!”
तर अशी ही नाना तऱ्हेची म्हातारी माणसं आणि त्यांच्या या अशा नाना तऱ्हा..!
पण त्यांचे हे असे तऱ्हेवाईकपणाचे कंगोरे आपल्या नेहमीच्या सरळसोट आणि बोथट आयुष्यात एक सुखद टोचणी देत असतात आणि रोजच्या जगण्यात नवनवीन रंग भरत असतात एवढं मात्र नक्की..!!
लेखक : कृष्णकेशव
प्रस्तुती : सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈