श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ “सावरकर आणि मी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
६ जानेवारी १९२४: रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानातून सुटून मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य बारा तेरा वर्षे रत्नागिरी येथे पण नजर कैदेत होते.
आज ६ जानेवारी रोजी सावरकरांच्या सुटकेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यापूर्वी मी लिहिलेला सावरकरांचा समाज सुधारक हा पैलू , प्रामुख्याने मला आवडलेला व त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी सर्व समाजापुढे मांडलेला आहे. याबाबतचा माझा लेख आज पुन्हा आठवला आणि आपल्यासमोर मांडतो आहे.
सावरकर आणि मी –
त्यांची माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. याची देही याचि डोळा त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिलेही नाही. तरीसुद्धा त्यांची माझी पहिली भेट झाली ती मी एसएससीला म्हणजेच अकरावीला असताना १९६५-६६ मध्ये.
हो, ही भेट होती त्यांच्या एका निबंधातून झालेली. त्या निबंधाचे नाव होते ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हो तेच ते, विनायक दामोदर सावरकर. अकरावीला असताना मराठीच्या पुस्तकात ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हा आम्हाला धडा होता. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक जीवनाचा धडा होता. आमच्या मराठीच्या आपटेबाईंनी हा धडा जरी आम्हाला शिकवला होता, तरी तो माझ्या डोक्यात बसला तो माझ्या आईने मला शिकवला तेव्हा ! तसं पहायला गेलं तर माझी आई आणि सावरकर यांच्यात वैचारिक साम्य फार नव्हतं. त्या धड्यामध्ये सावरकरांनी परमेश्वराची जी संकल्पना मांडली आणि जी माझ्या डोक्यात रुजली ती वस्तुतः आमच्या आईला मान्य असण्याचं काही कारण नव्हतं. पण तरीही स्वतःची मतं लादण्यापेक्षा त्या धड्यामध्ये सांगितलेला विचार उत्तम प्रकाराने समजावून सांगणे ही हातोटी आमच्या आईमध्ये असल्याने, त्या निबंधाचे माझ्या मनामध्ये जे बीज पेरलं गेलं त्यातून माझ्या अनेक विचारांची जडणघडण होत गेली.
त्या निबंधाची मांडणी मला खूप आवडली. ज्या विषयाची आपल्याला मांडणी करायची आणि जी बाजू आपल्याला पटवून द्यायची आहे, त्याच्या विरोधी बाजू पूर्वार्धात पूर्णपणे पटवून द्यायची आणि उत्तरार्धात त्या सर्व पूर्वार्धातील मुद्द्यांचे खंडन करायचे. अशा पद्धतीचे त्या निबंधाचे लेखन माझ्यावर प्रभाव पाडून गेले.
ईश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करणे ही त्या वेळेला मला क्रांतिकारी कल्पना वाटली. कारण त्या वेळेपर्यंत ईश्वर आणि त्याचं अस्तित्व, हे लहानपणापासून झालेल्या संस्कारातून आपण गृहीतच धरलेलं असतं. तसं मी ते गृहीतच धरलेलं होतं. सावरकरांनी माझं ते गृहित मुळापासूनच उखडून टाकलं प्रथमच.
सावरकरांच्या म्हणण्यानुसार मनुष्याचा देव म्हणजे, देव प्रसन्न व्हावा म्हणून माणसे जी काही कर्मकांडं करतात, ती कर्मकांडं करण्यासाठी भाग पाडणारा देव. हा देव त्यांना सर्वथा अमान्य आहे. नवसाला पावणारा देव, भक्ताच्या हाकेला ओ देणारा देव, भक्ताच्या नैवेद्याने प्रसन्न होणारा देव, भक्ताच्या नामस्मरणाने.त्याच्या हाकेला धावून जाणारा देव, किंबहुना देव नावाचं कोणतंही अस्तित्वच त्यांना (आणि अर्थात मलाही) अमान्य आहे. त्यामुळे ज्याला अस्तित्वच नाही अशा देवाला प्रसन्न करून घेण्याची कोणतीही कृती ही निरर्थक आहे या मतावर ते ठाम आहेत. देवाने मानवासाठी काहीही निर्माण केलेलं नाही आणि देव मानवासाठी काहीही करीत नाही. या विश्वामध्ये नैसर्गिक प्रक्रियेने जे काही निर्माण झालं आहे त्या निर्मितीचा उपयोग मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी, सुखासाठी आणि उपयोगासाठी करून घेत असतो. ही कृती करीत असताना तो स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करतो, विकास करतो आणि या निसर्गकृती मागील कार्यकारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पुढील पिढ्यांसाठी संशोधनाचे विश्व अधिकाधिक विस्तारून ठेवतो. या निसर्गाच्या अर्थात या संपूर्ण विश्वाच्या निर्मिती मागे काही कार्यकारण भाव असेल काही सूत्रबद्धता आणि नियमबद्धता असेल आणि त्या सर्वांना बांधून ठेवणारी शक्ती असेल व त्या शक्तीलाच जर आपल्याला देव समजायचं असेल तर, त्या विश्वाच्या देवाचीच पूजा केली गेली पाहिजे. मनुष्याच्या देवाला पूर्णपणे नाकारलं पाहिजे. हा निसर्ग काही विशिष्ट नियमाने बद्ध आहे त्या नियमांची माहिती करून घेणे त्याचं सर्वतोपरी ज्ञान मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे त्यासाठी संशोधन कार्यात रममाण होणे हीच त्या विश्वाच्या देवाची पूजा असं ते मानतात. म्हणूनच त्यांनी कोणतेही पूजा पाठ आणि कर्मकांडांचं समर्थन केलं नाही. पुरस्कारही केला नाही. उलट त्याचा विरोध केला. निषेध केला. ज्या कृती मागे निश्चित कार्यकारण भाव नाही नैतिक विचार नाही आणि मानवतेच्या मूल्यांचा विचार नाही अशा सर्व गोष्टींना त्यांनी विरोध केला. मग त्या गोष्टी हिंदू धर्मात असोत वा दुसऱ्या कोणत्याही धर्मात असोत. देवपूजेपासून देवतांचे स्तोम वाजवणाऱ्या मंदिरे, व्रतवैकल्ये, ज्योतिष शास्त्र, मुहूर्त, यात्रा, जत्रा, उत्सव या सर्वांना त्यांनी विरोध केला आहे. माणसा माणसांमध्ये भेदभाव करणाऱ्या चातुर्वर्ण्य, जातीयवाद अशा सर्व गोष्टींना कडाडून विरोध केला आहे. धर्मशास्त्राच्या आधारे समर्थन करत असलेल्या श्रृती आणि स्मृतींना त्यांनी नाकारलं आहे. त्यासाठी त्यांचे इतर बरेच साहित्य वाचले पाहिजे. किमान त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले पाहिजेत. त्यांचे क्ष किरणे नावाचे त्यांच्या निवडक लेखांचे निघालेले पुस्तक ते तरी वाचले पाहिजे. खरं म्हणजे या निबंधानंतर एसएससी नंतरच्या सुट्टीमध्ये मी झपाटल्यासारखा समग्र सावरकर वाङ्मय वाचत होतो. माझ्या आठवणी प्रमाणे त्यावेळी पाच-सहा खंड होते. ते मी वाचून काढले आणि त्यांच्यासारखाच मी निरीश्वरवादी झालो. सावरकर व आगरकर या दोघांनी हिंदू धर्म हा भटाभिक्षुकांचा धर्म नाही हे पोट तिडकीने ठामपणाने व ओरडून ओरडून सांगितले. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. त्याला रूढी आणि कर्मकांडांच्या बंधनात जखडून त्याचा मूळ जीव घोटण्याचा प्रयत्न करून त्या जीवनशैलीचा धर्म बनवला गेला. तिथेच आपल्या संस्कृतीच्या, जीवनशैलीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. सावरकरांचा हिंदू धर्म म्हणजे तथाकथित धर्म मार्तंडांच्या पाशात जखडलेला हिंदू धर्म नव्हता असे माझे मत झाले आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे तथाकथित पारंपरिक सनातनी हिंदुत्ववादी लोकांच्या हिंदुत्वापेक्षा अत्यंत वेगळं होतं आणि ते तथाकथितांना पटण्यासारखं आणि पचण्यासारखं नव्हतं आणि नाही. अर्थात या सर्वांचा विचार मांडण्यासाठी अजून एका लेखाचे प्रयोजन करावे लागेल असे मला वाटते. पण एकंदर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्यानंतर मला सुचलेल्या कवितेच्या ओळी पुढे देत आहे.
भावी काळ कसा असेल अपुला ठाऊक ना मानवा.
केंव्हा देव जगी करेल प्रलया माहीत नाही कुणा.
भूकंपातुन जीव आणिक किती जातील पृथ्वी तळी.
आगी आणिक वादळामधुनही जीवीतहानी किती.
देवा प्रार्थियले आम्ही जरि किती याहून नाही गती.
विश्वा वाचविण्या समर्थ जगती वैज्ञानिकाची मती.
© श्री सुनील देशपांडे
नाशिक मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈