सुश्री वर्षा बालगोपाल
☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
सकाळी लवकर ऊठून अंगणात सडा टाकायचा मग त्यावर छानशी रांगोळी काढायची असा दिवस सुरू व्हायचा•••
तेव्हा आजीला विचारले “ का गं आजी सडा रांगोळी करायची? “ तेव्हा आजीने सांगितले••••
“ या कृतीतच संसाराचे सार दडलेलं आहे गं•••
आश्चर्याने मी विचारले “ ते कसं?”
तशी आजी म्हटली, “ ते मी सांगते. पण तू मला सांग, सडा रांगोळीचे अंगण पाहिले तर तुला काय वाटते?”
मी म्हटलं “ काय वाटणार? छान वाटते. प्रसन्न वाटते. अजून काय?”
आजी म्हटली, “ बरं आता मी सांगते बरं का ! सकाळी उठून जेव्हा बाई आधी अंगण झाडते ना••• तेव्हा कालची मनातली घाण रुसवे फुगवे कुरबुरी यांचा कचरा ती बाहेर फेकून देते. नंतर जेव्हा पाण्याने ती सडा टाकते ना•••• तेव्हा आपल्याच मनावर ती समजुतीची, सामंजस्याची शिंपण करीत असते आणि सगळी नकारात्मकता ती दाबून टाकत असते. मग जेव्हा ती या दाबलेल्या मनावर अर्थात सडा टाकलेल्या अंगणावर रांगोळी काढते ना? तेव्हा सगळी सकारात्मकता त्यात येते. माझे अंगण चांगले दिसावे, माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मी सूख द्यावे याकडे तिचे चित्त जाते. मग कोणासाठी काय काय करायचे कसे करायचे याचे नियोजन ती रांगोळी काढताना करते. .. मग असे सकारात्मक उर्जेने भरलेलं मन तिला दिवसभर सळसळतं ठेवतं. तिच्याकडून घरातील सदस्यांना सुखावण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. पर्यायाने तिच्या बाजूने घरातील शांतता प्रसन्नता टिकवण्याचा प्रयत्न होत असतो…. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा सुंदर रांगोळी पहाते तेव्हा ती पण प्रसन्न होते. जरी वाईट विचार मनात घेऊन आली असेल तरी त्याचाही काही अंशी निचरा होतो. पर्यायाने त्याचा या घराला मोठा फायदाच होतो.”
अशा प्रकारचा सकारात्मकतेचा एक स्त्रोत सध्याच्या काळात आपणच बंद केला आहे. सध्या अंगणच नाही तर त्यापुढे रांगोळी तरी कशी येणार?
पण असा विचार करण्यापेक्षा दारात जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेतच छोटीशीच रांगोळी काढूया. सगळी नकारात्मकता घालवून जेवढी सकारात्मकता घेता येईल तेवढी घेऊया. दिवसाची सुरुवात चला निर्मळतेने करू या…
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈