श्री सुहास सोहोनी
मनमंजुषेतून
☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-2 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆
(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.)
राजा नीलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली. सुंदर कविता होती. पण खाली लेखकाचे नाव होते – ‘रा. नि. बढे’. आधी गदिमांना लक्षात येईना की, हे कोण लेखक? मग आठवले की, अरे हे तर आपले ‘राजा बढे’. पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले. त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे ‘राधे तुझा सैल अंबाडा’ हे गाणे गाजत होते. त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदारपणे मान डोलावत म्हणू लागले…
“कुणी ग बाई केला? कसा गं बाई केला?
आज कसा राजा बढे, रानी बढे झाला?”
गंगाधर महांबरे म्हणून कवी, गीतकार होते. त्यांचे कौतुक करताना गदिमा एकदा खणखणीत आवाजात गर्जून गेले, ”जय’नाद निनादती अंबरे, जय जय गंगाधर महांबरे”!
एकदा गदिमांच्या एका कोल्हापुरी मित्राने त्यांना चक्क व्यवसाय करायची गळ घातली. साधासुधा नाही तर चक्क पोल्ट्री फार्म काढायचा म्हणून! मराठी चित्रपटसृष्टीत तसा पैश्याचा खळखळाटच असायचा. त्यांनी असे काही चित्र रंगविले की, गदिमा त्याला तयार झाले. घरात बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर मराठी माणसाने एक मोठा उद्योजक होण्याची स्वप्ने पहायला सुरवात केली. नशिबाने ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’ असे नाव नाही दिले. पण त्या काळात गदिमांनी चक्क १०, ००० रुपये तरी त्या गृहस्थांना दिले असतील. ५-६ महिने असेच गेले असतील. गदिमा आपल्या कामात व्यस्त होते. श्रावण महिन्यातील मुहूर्त काढून हे गृहस्थ एकदा ३-४ डझन अंडी घेऊन घरी आले, ‘अण्णा, ही आपल्या फार्ममधली अंडी!’ श्रावण असल्यामुळे सर्वच्या सर्व अंडी नोकरचाकरांना देऊन टाकावी लागली! असेच पुढे काही महिने गेले व गृहस्थ रडत आले की, ‘अण्णा अमुक तमुक रोग झाला व सर्व कोंबड्या मरून गेल्या!’ झालं. गदिमांची व्यावसायिक होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली व महाराष्ट्र एका मोठ्या पोल्ट्री उद्योजकाला मुकला!.
गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात ‘ए. क. कवडा’ या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती. त्या वेळच्या प्रसंगानुसार किंवा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते. ती खूप गाजली व हा “‘ए. क. कवडा’ नक्की कोण?” अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या. संपादकांना विचारणा झाल्या. पण नाव काही कोणाला कळाले नाही. डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहीर केले की, ‘ए. क. कवडा’ म्हणजे ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन होते. ‘
यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!
पु. ल. देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक! त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते. त्यावर गदिमा भाष्य करतात,
“पाया पडती राजकारणी, करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर”
गो. नी. दांडेकर तर दुर्गप्रेमी! चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती. त्यांच्याबद्दल –
“चाले त्याचे दैव चालते, चढतो, त्याचे चढते.
गळ्यात माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!”
कविवर्य मंगेश पाडगावकर, काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे. त्या काळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत. त्यावर गदिमा चिमटा काढतात,
“तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले,
घेऊ धजती इज्जत कैसी, ‘लिज्जत पापडवाले”
दुर्गाबाई भागवतांबद्दल… (त्या वेळी त्यांनी साहित्य विश्वात काहीतरी कारणावरून वादळ निर्माण केले होते!)
“जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां
दुर्गे, दुर्गे, सरले दुर्घट, आता हो शान्ता”
(शांत स्वभावाच्या शांता शेळके यांचा उल्लेख तर नसेल!)
गोमंतक निवासी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेमार्फत मुंबईमध्ये वाढलेल्या मद्रासी लोकांविरुद्ध ”लुंगी हटाओ, पुंगी बजाओ” अशी मोहीम चालू केली होती. त्याचा कदाचित संदर्भ घेऊन त्यावर….
“बोरीच्या रे बोरकरा, लेक तुझी चांगली
गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?”
रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत,
“गिरीशांची ही गर्द ‘आमराई’
त्यात उघडी यशवंत पाणपोई”
स्वतःलाही त्यांनी सोडले नाही! गदिमांना गीतरामायणामुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणत असत. शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते. म्हणून स्वतःबद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं. गदिमांच्या हातात कुर्हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..
“कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा
काय वाल्मिके, स्विकारिसी तू पुन:श्च पहिला धंदा?”
अश्या कितीतरी गंमतशीर गोष्टी, प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले होते. गदिमा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. अगदी हिमनगासारखे…. त्यांच्यात एक बिलंदर खेडूत दडलेला होता. एक सुसंस्कृत प्रकांड पंडित दडलेला होता. एक सच्चा राजकारणी दडलेला होता….. काय नव्हते… ? पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक खरा माणूस दडलेला होता. कधी कधी वाटते आपल्यासमोर त्यांची जी बाजू आली, त्याच्या हजारो पट ते आजही पडद्याआड आहेत.
– समाप्त–
लेखक : श्री सुमित्र माडगूळकर
प्रस्तुती : सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈