सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

असं ऐकलं होत की अमरनाथ दर्शनाचे फळ काशीच्या दहा पट, प्रयागच्या त्रिवेणी संगमाच्या शंभरपट,आणि कुरुक्षेत्राच्या 1000 पट इतकं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे अमरनाथला जाण्याबद्दल एक कुतूहल आणि जिज्ञासा होती. तीव्र इच्छा असली की योग जुळून येतो. आणि तसंच झालं.

ऑगस्ट 1999 सालची गोष्ट. रोटरी क्लबने अमरनाथ, काश्मीर, वैष्णोदेवी यात्रा आयोजित केली होती. 187 जणांची  टीम निघाली. जम्मूला पोहोचल्यानंतर दुसरे दिवशी आमच्या बस जम्मुहून  पहाटे चार वाजता निघाल्या. जम्मू ते पहेलगाम 300 कि.मी. चा चौदा तासांचा संपूर्ण घाटाचा प्रवास होता. मी खिडकीत बसून सुंदर मनोहर निसर्गाचे नेत्रसुख घेत होते. वाटेत रामवनला खाणे पिणे झाले. बनिहाल ला जम्मू आणि काश्मिर यांना जोडणारा तीन किमीचा जवाहर टनेल. या बोगद्यावर काश्मीर पोलीस, बी एस एफ, आणि आर्मी यांचा कडक पहारा होता.  रात्री सात ते सकाळी सहा बोगदा बंद. त्यामुळे लवकर पोहोचणे गरजेचे होते. वेळेत बोगदा पार केला. आणि समोर काय वा वा निसर्ग देवतेचे सुंदर हसरं गोजिरवाण लावण्य रूप, जन्नत का नजारा  असं काश्मीर दिसायला लागलं. डोळे दिपून गेले. झेलम च्या काठावर वसलेलं अनंतनाग, तेथील डोलणारी भात शेती, लपतछपत खळखळत वाहणारी अरु नदी साथ करत होती. जागोजागी तपासणी केंद्रातून पार पडावं लागत होत. पहेलगामला पोचायला संध्याकाळ झाली. नंतर प्रथम सामानाची विभागणी केली. फक्त एक पाठीची सॅक बरोबर घ्यायची होती. व दुसरी बॅग परस्पर श्रीनगरच्या हाऊस बोटीत जाणार होती. रात्री झोपायला प्रत्येकाला स्लीपिंग बॅग दिल्या. पण रात्रीच्या मुसळधार पावसाने त्या  गारठून गेल्या. थंडीने झोपतर नाहीच लागली. पण उद्याचं काय ? हे प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलं. अमरनाथालाच आवाहन केलं. त्याने आमच्या हाकेला  ओ दिली. आणि सकाळी सूर्यनारायणाच दर्शन झालं. सर्वानी  त्याला हात जोडले. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरल. सूर्यनारायणाच्या साक्षीने छोट्या गाड्या मधून जाताना एकोणीस किमीचा अत्यंत अवघड आणि अरुंद घाट, लीडर नदीच रौद्र पात्र, भीषण खळाळणारा  फेसाळणारा दुधाळ  प्रवाह  पाहून जीव मुठीत घट्ट धरला होता. बहात्तरशे फूट उंची पासून  9 हजार पाचशे फूट उंचीवरील चंदन वाडी ला पोचलो. 50 ते 60 घरांचं इतकं छोटं गाव होतं ते. 15 ऑगस्ट चा दिवस होता.तिरंगा झेंडा फडकवला. आधाराची छडी घेतली. घोडे ठरवून निघालो. आता खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली.

“पाऊले चालती अमरनाथ वाट, जिज्ञासे भरिले  मन  काठोकाठ.” अशा भारावून गेलेल्या मनाने पिसू घाटीचा चढ चढणे सुरू झाले. मान पूर्णपणे आकाशाकडे करून पाहिलं की डोंगराच्या टोकावरील माणसे छोट्या बाहुली पेक्षा लहान दिसायची. आता आपण तिथं कधी पोहोचणार, असं म्हणत तिथे पोहोचलो की पुन्हा तीच पुनरावृत्ती. असं कितीदा तरी व्हायला लागलं. उंच उंच चढण, वाकडेतिकडे दगड गोटे यातून वाट काढत, आमचे ओझे पाठीवर घेऊन बिचारे घोडे चालत होते. रस्ता संपत नव्हता. शंकराला भेटायला जाणाऱ्या देवांचे दान वांशी झालेले युद्ध आणि त्यात देवांनी दानवांना  मारुन टाकून, त्यांच्या वाकड्यातिकड्या हाडांचा झालेला  ढीग म्हणजेही पिसू घाटी असं म्हणतात. तीन किमी चढून, अकरा हजार पाचशे फूट उंच असलेल्या पिसू टॉप वर पोचलो. आणि एक अवघड टप्पा फार केला. आता पुढील टप्पा शेषनाग.

उंच, खोल वाकडीतिकडी अरुंद पायवाट, वळणे वळणे असे मार्गक्रमण चालू होते. घोड्यावर बसूनही प्रत्येक श्वास महत्त्वाचा वाटायला लागला. थोड्याच वेळात निळ्याशार पाण्याचे सुंदर शेषनाग सरोवर, त्यातून वहाणारी शेषनाग नदी आणि त्याच्या आरक्षणाला उभा असलेला शेषनाग पर्वत दिसायला लागला. देवांना त्रास देणाऱ्या वायुरूपी राक्षसाला,शेषनागाने पाताळातून येऊन, सहस्त्र मुखांनी वायु ग्रहण करून, त्याचा वध केला. तोच पर्वत शेषनाग म्हणून अमर झाला. पुढे निघालो आणि शेषनागचे पत्त्याच्या बंगल्यासारखे, आमच्या मुक्कामाचे तंबू दिसायला लागले. हुश्श वाटलं. चंदन वाडी ते शेषनाग बारा किमी अंतर करायला सहा ते सात तास लागले. माझ्यासारख्या  प्राणीप्रेमीला घोडे आणि त्यांना धरून चालणारे घोडेवाले, यांच्याबद्दल खूपच सहानुभूती वाटायला लागली.आमच्यापेक्षा तेच पुण्यवान आहेत असं वाटायला लागलं. रात्री लंगरमध्ये अगदी सात्विक, राजसिक, उत्तम जेवण होते. पण तोंडावर ताबा ठेवला होता. आरोग्य सुविधा, प्रचंड कडाक्याची थंडी, झोपायला तंबू, त्यावर एक टांगलेला कंदील, शांत एकाकी वाटणारा आसमंत, विरळ हवा, बाहेर प्राणी पक्षांचे आवाज नाहीत अशा वातावरणात झोप झाली. सकाळी उठून पुढील टप्पा पंचतरणी.

सकाळी शेषनाग ते पंचतरणी असा पुन्हा 12 किमीचा प्रवास सुरू झाला. खडतर म्हणावा असा. वळणावळणातून दरीच्या कडेकडेने, पाय वाटेने पावले वाटचाल करीत होती. जागोजागी जवान होते. हसतमुखाने त्यांच्या लंगर मध्ये “चहा तरी घ्या ” असा आग्रह करत होते. “जय जवान” “जय जवान”, म्हणून आम्ही त्यांना आदरणीय हाका मारत होतो. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून “ओम नमः शिवाय” ” बम बम भोले” ” जय जय भोले “, उच्चार तोंडून येत होते. सर्वजण उत्साहात दिसत होते. महागुनाजपास या सर्वोच्च उंचीवरील, 14800 फूट या ठिकाणी पोहोचलो. पुढे अर्धा कि.मी. वर  पाबीपाल  आणि थोडे पुढे पोषपत्रीला थोडी विश्रांती घेतली. सर्वत्र बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मेंढीच्या दुधाचा बिन साखरेचा, काश्मिरी चहाची चव  चाखायला मिळाली. थोड्याच वेळात पंचतरणीच्या कॅम्पचे तंबू दिसायला लागले. पोषपत्री ते पंचतरणी अंतर पूर्णपणे दगडा दगडातून कापत १४८०० फुटावरून १२०००फूट उतारावर आलो. वाटेत तुषार उडवत वाहणारे झरे, -झुळझुळ वाहणारे थंडगार पाणी पाहून मन तृप्त होत होते. दुरूनच रुंदच्या रुंद  पंचतरणीच पात्र  दिसलं. खरंतर पाच नद्यांच्या संगमाने तयार झालेल्या नदीचे पात्र हे गोठलेलं ग्लेशियर असत. पण बर्फ वितळायला लागल्यामुळे पात्र ओलांडायला त्रास झाला नाही. रात्री उत्तम जेवणाचा आस्वाद घेतला. पंचतरणीच्या अंगाई गीताने निद्रा देवतेच्या अधीन झालो. आणि सकाळी तिच्याच  गाण्याच्या भूपाळीने जाग आली. आता पुढील सात कि.मी. चा अर्ध्या दिवसाचा टप्पा,

पंचतरणी ते अमरनाथ गुहा. असाच खडबडीत मार्ग. दोन तासात संत सिंग पहाडी आणि तसेच पुढे चार किमी पूर्ण गलेशियार. अमरगंगा नदी कधी समोर उभी ठाकायची, कधी डोंगराला ठोसा देऊन भगदाड पाडायची. मधूनच लपाछपी करायची. अवखळ मुलीसारखी, लांब उंच उड्या मारत नाच करायची. अमर गंगेची अशी रूप न्याहाळत गुहा कधी दिसायला लागली हे कळलंच नाही. गुहेच्या पायथ्यापासून चारशे पायऱ्या पायी चढून 13500 फुटावर जायचे होते. अमरनाथाच्या ओढीने तोही चढ कसा पार झाला लक्षातच आलं नाही. पहातो तो काय! महाकाय आणि प्रचंड बर्फाचं शिवलिंग! पूर्ण समर्पित होऊन हात जोडले. डोळ्यात कृतकृत्यतेचे  भाव आले. आणि आनंदाश्रू तरळले जायला लागले. आनंदाला शब्द नव्हते. देवदेवतांना मृत्यूपासून रक्षण करून त्यांच्यावरील प्रेमाने द्रवीभूत झालेल्या, रसमय शिवलिंगाचे, बाबा बर्फानीचे दर्शन हव  होत  ते मिळालं. शिवाने डोक्यावरून खाली घेऊन, पिळलेल्या चंद्रातून निघालेल्या अमृतधारेच -अमरगंगेच तीर्थ बरोबर घेतलं. वरती  फडफड आवाज आला. म्हणून पाहतो तो, दोन कबुतर शंकराला नृत्य समयी कुरकुर करणाऱ्या शिष्यांना, दिलेल्या शापाने झालेली ही ती कबूतर.काय खात पीत असतील कुणास ठाऊक !तेथेच असलेल्या बर्फमय पार्वती आणि गणेशाचं दर्शन घेऊन, तृप्त मनाने गुहेतून बाहेर पडलो.परतीचा रस्ता संगम टॉपला पोचलो. मोहम्मद अली आणि फारुख घोडेवाले यांना बक्षीस दिली. त्यांचे आभार मानले.घोड्यांच्या अंगावरून हात फिरवून निरोप घेतला.आता पुढील बालताल च्या वाटेला दुसरे घोडे ठरवले.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments