डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

वैद्यकीय

  1.   रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे उपचार देण्यात आले.
  2. ज्यांना अजिबातच ऐकायला येत नाही अशी अनेक वृद्ध मंडळी मला रस्त्यात भेटतात. रस्त्यावरून चालताना रस्ता ओलांडताना किंवा इतर अनेक वेळी ऐकूच न आल्यामुळे अपघात होतात त्यात बऱ्याच वेळा हात पाय मोडले जातात.

अशा सर्वांना एक एक करून मांडके हियरिंग सर्विसेस या प्रथितयश संस्थेतून कानाची तपासणी करून घेत आहोत आणि योग्य त्या व्यक्तींना कानाची मशीन देत आहोत. 

ऐकू यायला लागल्यानंतर ही माणसं छोटे छोटे आवाज सुद्धा कौतुकाने ऐकत राहतात. रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांचा गोंगाट… हॉर्नचा कर्ण कर्कश्श आवाज… स्पीकरवर जोरजोरात लागलेली गाणी… एरव्ही कोणालाही या सर्वाचा त्रास होईल, परंतु त्यांना हे आवाज ऐकताना खूप आनंद होतो…! 

  1. ज्यांना दिसत नाही अशा अनेक वृद्धांना रासकर डोळ्यांचे हॉस्पिटल किंवा लेले हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन त्यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करत आहोत, चष्मे देत आहोत आणि मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा करून घेत आहोत.

दिसायला लागल्यानंतर यांना काय पाहू आणि काय नको असं होतं…

भिंतींचे रंग, गाड्यांचे रंग, आकाशाचा रंग, घातलेल्या कपड्याचे रंग… एरव्ही या गोष्टी सुध्दा कोणी इतक्या बारकाईने पाहत नाही परंतु याच गोष्टींचं त्यांना किती अप्रूप…! 

बरोबर आहे, ज्याच्याकडे जी गोष्ट आहे त्याला त्याची किंमत नसते… 

उपाशी असलेल्यालाच चतकोर भाकरीची किंमत जास्त कळते… 

शेवटी काय, आनंद आणि सुख याची खरी अनुभूती त्यालाच येते ज्याने या अगोदर दुःख पचवली आहेत…! 

  1. कुंडीतीलं झाड अतिशय सुरक्षित वातावरणात जगत असतं, पण ते कुणीतरी पाणी घालण्याची वाट पाहत असतं, परंतु जमिनीवर उगवलेलं झाड मात्र जमिनीतला ओलावा शोषून जगतं…!

अशीच जमिनीतला ओलावा घेवुन जगणारी… रस्त्यावर राहणारी वृद्ध माणसं… माझे मित्र श्री नितीन पाटील यांच्या सहकार्याने, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, अतिशय उत्तम क्वालिटीची ब्लॅंकेट या सर्वांना देऊन त्यांच्या अंगावर मायेचं पांघरुण घालता आलं…

अन्नपूर्णा प्रकल्प

आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

आयुष्याच्या वाटेवर भेटलेले, श्री अमोल शेरेकर, हे फक्त शरीरानेच दिव्यांग आहेत. बाकी आत्मविश्वास एखाद्या धडधाकट माणसाला सुद्धा लाजवेल. 

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून या कुटुंबाला आपण व्यवसाय सुरू करून दिला आहे.

अमोल यांची पत्नी घरात जेवण तयार करते आणि श्री अमोल शेरेकर पॅकिंग करून रुग्णालयातील भुकेल्या गरिबांच्या हातात हे डबे नेवुन देतात. 

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

खरंच जेवणाच्या एका घासाने किती जणांना जगवले…. !

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

या संपूर्ण वर्षात कधी भंगारवाला झालो आणि उकिरड्यात टाकलेल्या वस्तू गोळा करून त्यांना जोडत गेलो… कधी पोस्टमन होऊन आपली मदत योग्य त्या पत्त्यावर पोहोचवली…. आणि वर्षभराचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडत गेलो…! 

उजाले मे मिल जाते हैं लाखों यहाँ…

अहसान उनका मानो जिन्होने अंधेरे मे साथ दिया…

आमच्या या धडपडीला तुमची साथ मिळाली… विनाअट विना अपेक्षा आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात आम्हाला मदत करत गेलात, ऋण कसं फेडावं तुमचं…??? 

काही वेळा मला असं वाटतं, की आपण एकाच घड्याळाचे काटे आहोत…. प्रत्येक काट्याची उंची वेगळी, गती वेगळी, रुप वेगळे, रंग वेगळा…. 

तरीही घड्याळाच्या मध्यबिंदूवर आपण एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत…. हा मध्यबिंदू आहे माणुसकीचा…!!!

आणि उंची, गती, रूप, रंग वेगळा असेलही परंतु, घड्याळाच्या या एका परिघात आपण एकत्र राहून एकाच दिशेने चाललो आहोत…

वर्षभरात नकळतपणे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागत आहोत… मोठ्या मनानं माफ करावं…. !

सरत्या वर्षाचे धन्यवाद, येणाऱ्या वर्षाला अभिवादन आणि आपणा सर्वांना प्रणाम. 

नवीन वर्षाच्या आपणास शुभेच्छा… !!! 

प्रणाम  !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments