मनमंजुषेतून
☆ “आठवण” … लेखक : श्री सुधीर रेवणकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
“ मी वर जाईन ना… तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत……. “
‘ दे वो माय ‘ असा शब्द लहानपणी ऐकू आला की आई बोलायची, “ बघ रे काही असेल. एखादी पोळीभाजी देऊन टाक तिला.”
मी नेहमी कंटाळा करायचो.
“ उठतो का आता ? “ मी तणतण करत जे असेल ते द्यायचो.
“ असे करू नये. आपल्यातला एक घास दुसऱ्याला दिला, तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकून जातो.”
मी उर्मटपणे बोलायचो… “ आई, दोन पोळ्या दिल्यात भिकारणीला. बघू तुझा गणपती बाप्पा किती पोळ्या टाकतो माझ्या ताटात. “
“ आई म्हणायची, मी जिवंत आहे तोपर्यंत टाक. मी गेल्यावर कूण्णाला ही देऊ नको. मी जाईल ना मग आठवतील माझे शब्द.”
दरवेळी भिकारी दारावर आले की जुनी साडी दे, जुनी चादर दे , स्वेटर दे. मग आमचे वादविवाद. वय होत आले, तसे मी तिच्यावर रागावणे कमी केले. दारावरचे भिकारी पण कमी होत गेले.
मग एक दिवस आई गेली. मी ठरवले तिच्या आवडत्या तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये अस्थीविसर्जन करायचे. नाशिक, पंढरपूर झाले आणि मी काशीला पोहचलो. भर पावसाळा चालू. मी सगळे विधी करून परत निघालो. ट्रेन सकाळी दहा ला, पण चार तास लेट. मी प्लॅटफॉर्म वरूनच एक व्हेज पुलावचे पॅकेट घेतले. थोडे केळं घेतलेत आणि जिन्याच्या पायरीवर बसून राहिलो.
काही वेळाने एक बाई आणि कडेवरचे पोरगं माझ्याजवळ थांबून काही खायला मागू लागले. मी नकळतच पुलाव पॅकेट, पाणी, चार पाच केळी पण तिला देऊन टाकली. दोघे ही पुढे निघून गेलीत. वाराणसी ते ठाणे दीड दिवसांचा प्रवास. स्टेशनं भरपूर. मनात म्हटले, खाऊ काहीतरी नंतर. पाचच्या आसपास ट्रेन आली. मी ज्या कंम्पार्टमेंट मध्ये होतो, तिथे तरुण नवरा नवरी आणि त्याची म्हातारी आई आमच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांना शिर्डीला जायचे होते.
मी सगळी माहिती सांगितली. त्यांनी पण हिंदीतून विचारले मी का आलो वाराणसीला. मी पण सांगितले की अस्थिविसर्जित करायला आलो होतो. सात वाजता चहा वाला आला. मी दोन कप घेतले बॅगमधून अर्धा उरलेला पार्ले G खाल्ला. परत एक कप चहा प्यायलो.
आठ-साडेआठला बोगीत सगळ्यांनी डब्बे उघडून खायला सुरवात केली. मी पार्लेवरच झोपणार होतो. पुढच्या स्टेशनला घेऊ बिस्कीट म्हणून शान्त बसलो. इकडे सुनबाई मुलाने डब्बा काढला, पांढऱ्या केसांच्या आजीला बघून मला आईची आठवण येतच होती.
सून, मुलगा आणि म्हातारीने एकमेकांना खूण केली . पोरीने चार प्लास्टिकच्या प्लेट वाढल्या. पुरी भाजी, चटणी ,लोणचे एक स्वीट, काही फ्रुट कापून प्लेट मध्ये सजवले आणि मुलाने आवाज दिला, “ अंकल हात धो लिजीए और खाना खाईए .”
मी नको नको म्हंटले तरी त्यांनी जेवायलाच लावले. मी पोटभर जेवलो. अवांतर गप्पा झाल्या. मी वरच्या बर्थ वर झोपायला गेलो. सगळे झोपायला लागलेत. लाईट बंद झालेत. मी चादरीच्या कोपऱ्यातून हळूच खाली पाहिले. म्हातारी सेम टू सेम..
डोक्याखाली हाताची उशी घेऊन झोपलेली. अगदी माझ्या आईची आवडती सवय. आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकतो. एक छोटे पॅकेट काय त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले.
बाहेर चिक्कार पाऊस आणि गेले दोन महिने आईच्या आठवणींचा मनात रोखलेला पाऊस दोघेही मग डोळ्यावाटे मुसळधार बरसू लागलेत.
आई नेहमी म्हणायची…. “ मी जाईन ना वर, तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत….. “
लेखक : श्री सुधीर रेवणकर
संग्राहक : श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈