सौ.वनिता संभाजी जांगळे
मनमंजुषेतून
☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
आमची आत्या जाऊन पंधरा दिवस होऊन गेले. आत्या ही फक्त नावापुरतीच आत्या होती , ती आम्हा भावंडांसाठी माहेरात असणारी जणू दुसरी आईच. तिच्या लग्नानंतर एका वर्षातच नवर्याने मांडलेल्या छळामुळे आमचे चुलते (आबा )यांनी तिला परत आमच्या घरी आणले. पुन्हा तिला परत सासरी नांदायला पाठविलेच नाही. आणि आत्याने पण कधी नांदयला जायची इच्छा व्यक्त केली नाही. तेंव्हा पासून ती माहेरात राहिली. आपल्या तीन भावांचे संसार आणि त्यांची मुले संभाळण्यात ती रमली. तिने पंचवीस माणसांचे कुटुंब घट्ट मायेच्या मिठीत बांधून ठेवले. नात्यांचे सर्व मोती प्रेमाने एकाच मजबूत धाग्यात गुंफून, त्याची गाठही तितक्याच ओढीने घट्ट आवळली. आज आम्हा भावंडांमध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा , प्रेम, आपुलकी आहे ती सर्व माझ्या आत्यानी केलेल्या संस्कारांमुळे आहेत. आत्या जितकी प्रेमळ होती तितकीच रागीट सुध्दा होती. शाळेत गणिताचे गुरूजी आणि घरात आत्या यांचा मार खाऊनच आम्ही घडलो.
आत्याला तिच्या स्वतःच्या संसाराचा अनुभव नव्हता. तरीही तिने अनेकांचे संसार उभे केले आणि चांगल्या रितीने संसार कसा करायचा याची शिकवणसुध्दा दिली. आत्या जणू अनुभवांचे एक पुस्तक होती. चाली-रीती, संस्कार यांची ती वारसदार होती. ती अशिक्षित होती. संस्कृतीची जपणूक उत्तम करत होती. आमच्या कुटुंबातच नव्हे तर गावात तसेच पै-पाहुण्यांच्यात कोणतेही मंगलकार्य असले की आत्या तिथे हजर. तिच्या हातूनच सर्व कार्यक्रम पार पडायचे. तिला स्वतःला सुध्दा अशा दगदगीत वाहून द्यायला आवडायचे.
आत्याच्या स्वतःच्या संसाराची वाताहात झाली पण भावांच्या संसारात येणारे चढउतार याचा तिने कधीच त्रागा केला नाही. तिने कधी कोणतेच नाते तुटण्याइतपत ताणले नाही. पंचवीस माणसाच्या कुटुंबात कधीच तिने नात्या-नात्यात दुरावा येऊ दिला नाही. मग जावा-जावा असोत अथवा भाऊ-भाऊ असोत. कधी एकत्र कुटुंबात भांड्याला भांडे लागलेच तर तिच्या काळजाचा थरकाप व्हायचा. तिची चिंता वाढायची. तिने प्रयत्न केले ते पडलेल्या फटींना सांधायचे. मायेचे मलम लावून तिने नात्यांना उभारी दिली. आत्याचे संपुर्ण आयुष्य हे फक्त रांदणे आणि सांधणे यातच गेले.
आत्याने आम्हां बहिणींना तिच्या सगळ्या चांगल्या सवयी लावल्या. तिचेच संस्कार घेऊन आम्ही सासरी नांदायला गेलो. म्हणून मी आज अभिमानानी सांगते, “माझ्यात जे काही चांगले आहे ती आत्याची माझ्याकडे ठेव आहे. “
आत्याच्या बाबतीत विशेष वाटते ते हे की, स्वतःचे अपत्य नसताना दुसऱ्याच्या लेकरांवर अतोनात प्रेम करणे ,त्यांचे भविष्य चांगले घडावे याकरता सतत प्रयत्न करणे. दुसर्ऱ्याचे संसार सजविण्यात, सावरण्यात स्वतःचे आयुष्य झिजविणे. आत्या, हे सारं तूच करू जाणे! गावात येणारे ग्रामसेवक, तलाठी, शाळेतील शिक्षक, माल विकायला येणारे फिरस्ते यांना कधी आत्यानी उपाशीपोटी जाऊ दिले नाही. हे सगळेजण आत्याला त्यांची मोठी बहीण मानायचे.
आपले सर्व आयुष्य तिने एकाकी घालविले पण धुतल्या तांदळाप्रमाणे तिचे चारित्र्य आणि मन होते.
अशी आत्या आज आमच्यात नाही पण तिच्या आठवणी रोज मनास खोलवर हेलावून टाकतात. नकळत डोळे भरून येतात आणि डोळ्यांतून ओघळते ते एका थोर पुण्यवती आईचेच वात्सल्य. “आत्या तू आमच्यात होती म्हणून पंचवीस माणसाचे कुटुंब चाळीस वर्ष एकत्र होते “
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈