सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ ….आणि फूल कोमेजून गळले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
गेले वर्षभर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला तोंड देणारी आमची प्राजक्ता गेली…हे जरी कधी तरी घडणार हे अटळ होते, तरी प्रत्यक्षात ती जाणे ही गोष्ट पचवणे खूपच अवघड जात आहे..
प्रकाशभावजी आणि दिप्ती यांच्या संसारात प्राजक्ता म्हणजे तसं उशिरानेच उमललेले हे सुकुमार फूल! सांगलीला आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्याने ती जन्मल्यापासूनच मी तिला पाहत होते. तिच्याविषयी काय बोलावे? खरोखरच गुणी मुलगी होती ती! लहान होती तेव्हा इतके शांत होती की घरात लहान मुल आहे हे सुद्धा कळू नये! लहानपणापासून अभ्यासात हुशार,देखणी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी, भरपूर मित्र-मैत्रिणी असणारी, स्वभावाने शांत पण तरी तितकीच स्वतःची मते ठामपणे मांडणारी अशी प्राजक्ता इंजिनियर झाली! अशी ही सुंदर गुणी मुलगी.
ओंकार आणि तिचा प्रेम विवाह झाला. लग्नानंतर दोघेही जर्मनीला गेले. तिच्या आयुष्यातील परमोच्च सुखाचा काळ असेल तो! दोघेही समरसून उपभोगत होते, पाच सहा वर्षाच्या नोकरीनंतर दोघांनीही भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि इथे आल्यावर दोघांचेही जॉब चालू झाले..
सर्व काही चांगले चालू असताना अकस्मात तिच्या बाबांना हार्ट अटॅक आला, हार्टचे आॅपरेशन झाले आणि त्यांचे महिनाभराचे आजारपण चालू असतानाच प्राजक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले. बाबांना हे कळू नये म्हणून तिने आटोकाट प्रयत्न केले. शेवटी बाबा गेल्यावरच तिचे खरे आजारपण सुरू झाले…
ओंकार आणि प्राजक्ताने प्राजक्ताचे कॅन्सरचे निदान झाल्यापासून शर्थीचे प्रयत्न केले. सर्व प्रकारच्या उपचारांना तिने धैर्याने तोंड दिले. ओंकारची साथ ही खरोखरच प्रचंड होती. त्याच्या आधारावरच तिचे आयुष्य चालू होते.. एलोपथी, होमिओपॅथी, टार्गेट थेरपी ट्रीटमेंट, आयुर्वेदिक सर्व प्रकारचे उपचार तिने
केले. गेले वर्ष या सर्वांमध्ये तिची आई, बहीण, मेव्हणे सर्व साथ देत होते…. पण कॅन्सर हा असा काही रोग आहे की, त्याचा शेवट मृत्यूकडेच जातो..काही सुदैवी उपचारानंतर त्यातून बरेही होतात .. किंवा काही काळापुरते आयुष्य ही वाढते. ….
भारतात आल्यावर वाकड येथे त्यांनी मोठा फ्लॅट घेतला होता. हौसेने घराची सजावट केली होती. उमेदीचे वय होते.. पण नशिबात वेगळेच वाढून ठेवले होते. कसेबसे पाच सहा महिने त्या फ्लॅटवर ते राहिले असतील आणि तिचे दुखणे वाढले. 20 नोव्हेंबरला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अक्षरशः रोगाशी झगडणे चालले होते. शेवटी सात जानेवारीला तिला घरी आणले. स्वतः प्राजक्ताही आपल्या दुखण्याबरोबर खंबीरपणे लढत होती, पण प्रयत्न करणे आपल्या हाती, यश अपयश सगळं परमेश्वराकडे..
हॉस्पिटल मधून घरी आणल्यावरही प्रत्येक श्वासासाठी तिला झगडावे लागत होते. ऑक्सिजन सिलेंडर बिचारा आपले काम करत होता, पण तिचे शरीर साथ देत नव्हते. जगण्याची मनापासून जिद्द होती, उमेद होती, मेंदू कार्यरत होता.. स्वतः आपल्या औषध पाण्याविषयी शेवटपर्यंत जागरूक होती. मृत्यूला चुकवायची निकराची लढाई चालू होती. वय किती तर अवघे पस्तीस पूर्ण! ही काय जायची वेळ होती का? जगेन मी, जगेन मी असा एक एक दिवस जात होता… पण शेवट त्याच्या हातात..
मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. वाटत होतं, आजचा दिवस तरी जाऊ दे ,अलीकडे तिला बोलता येत नव्हते, पण खुणेने किंवा लिहून सांगू शकत होती, पण आज मात्र सकाळपासून सगळं हळूहळू शांत होत चाललं होतं.. हे आमचं प्राजक्ताचं फुल आता कोमेजायला लागले होते…,.. स्वर्गातून पृथ्वीवर आलेला प्राजक्त हळूहळू पुन्हा स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत होता! आपल्या छोट्याशा आयुष्यात मिळेल तेवढे सुख तिने घेतले आणि इतरांनाही आनंद दिला. जसं प्राजक्ताचे फुल जास्त काळ टिकत नाही, एकदा का झाडावरून खाली जमिनीवर पडले की फार कमी काळ राहते. लवकरच सुकते. त्याचे आयुष्यच तेवढे! ‘प्राजक्त’फुलाचा रंग, गंध हे सगळे अल्पकाळ असते. तशीच ही आमची प्राजक्ता! सुंदर, गुणी मुलगी अकाली गेली.. स्वर्गातील आपल्या स्थानी! ते प्राजक्ताचे फुल गळून पडले कायमचे! आम्हाला सुगंध देत राहील! प्राजक्त फुलासारखं नाजूक, निर्मळ, छोटसं आयुष्य संपलं तिचं!ती गेली, पण कायमच हा प्राजक्त आमच्या मनात राहील!
भावपूर्ण श्रद्धांजली !
उज्वला काकू..
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈