सुश्री मीनाक्षी सरदेसाई
☆ मनमंजुषेतून : महपुरानंतरची एक आठवण – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆
पद्मिनी सातलाच कामाला आली. भराभरा बोलत होती.”आत्ताच काय ती भांडी टाका वयनी. सांजच्याला काय मी येनार न्हाई”.
म्हणाली तेव्हा तिचा ठसका मला जरा बोचलाच.”आता पूर उतरून बरेच दिवस झाले. आता का तुझ रडगाणं?आम्हाला सुध्दा त्रास झालाय महापुराचा. खूप स्वच्छता करायची आहे घराची. त्यात तुझा खाडा. आम्हालाही त्रास झालाय पुराचा. किती स्वच्छता करायची आहे.”
“आज पैसे द्यायला येनार हाईत.रासन कार्ड, फोटो तयार ठ्येवायला सांगितलंय कवाबी येनार म्हनं.मानसं मोजून तितके हजार देनार”
“होय का? महत्वाचंच काम आहे. कर सगळं व्यवस्थित. नि मग ये.”
मी तिला म्हटलं. निरक्षर आहे पण व्यवहारज्ञान चांगलं आहे तिला. दोन दिवसांनी ती कामाला आली.”किती मिळाले पैसे?”
“मिळाले की चार हजार.”.
“आता ते पोस्टात ठेव. अडिअडचणीला उपयोगी पडतील.”
“व्हय, साठले की गंठन करनार. हौस भागवून घेनार.”
दुसरे दिवशी पोस्टाचं काम करणाऱ्या बाई माझ्याकडे आल्या.
नि त्याच वेळी पद्मिनी पण आली.”आणलेस का पैसे? ”
“आज आण ग बाई तीन हजार. त्या बाई सारख्या मागे लागल्यात.”
“न्हाई जमायच वयनी. पावनं म्हनाय लागलेत” कुलदैवत करून या.”
“अग पद्मे, सरकारने हे पैसे तुम्हाला का दिलेत? तुमचं महापुरातलं नुकसान भरून काढण्यासाठी. देवाला जायला, साड्या घ्यायला नाही दिलेले. बचत कर मी म्हणतेय.”
पैसे ठेवायचा तिचा निश्चय डळमळीत झालाय हे माझ्या लक्षात आल, तरी दोन दिवसांनी तिला पुन्हा आठवण केली.
मी विचारलं. तर थोडी गोंधळलीच.म्हणाली,”भावाला राकी बांधायला त्यांच्या भैनी आल्यात.त्यानी साड्या मागितल्यात. नवरा म्हनतोय, माजे एक हजार दे. कंदी न्हाई ते साड्या देतो त्यास्नी.”
पद्मिनी तडतडली. आणखी दोन दिवस गेले.
“पद्मे, आता उरलेले पैसे तरी ठेव ग. कधी नाही ते एकदम इतके मिळालेत. जिवाला शांतता लाभेल तुझ्या. ऊठसूठ कर्ज काढतेस. व्याज भरतेस ह्याच्यातून वर कधी येणार तू? पैसे खर्च करण सोपं असतं . शहाणी ना तू? कळत नाही?”
“वयनी, घरात पानी शिरलं तवा भिंती पार विरघळल्यात.बुरशी चढलीय.न्हवरा म्हनतोय” भिंती रंगवुयात..गनपती येनार., लोक बघायला येनार. घर झकमक करुया की.यंदा दिवाळीबी झोकात करायची असं वाटतंय घरातल्यास्नी.”
शेवटी पैसापैसा तरी कशाला मिळवायचा ?सुखासाठीच न्हवं?महापुरातलं दुःख विसरायसाटी ह्यो सुखाचा उतारा.
मी परोपरीने सांगत राहिले नि ती कारणं पुढे ढकलत राहिली. तिला त्याचं काहीच नाही. उलट ती हसत म्हणाली,”वयनी, तुम्ही का घोर लाऊन घेताय जिवाला?तुम्ही बचत करा म्हनताय खरं, पर आम्हाला तरी येवढ्या रकमेची चैन करायला कंदी मिळनार वं? चार हजार मिळाले. घरच्या समद्यास्नी जे जे हवं त्ये करायला मिळतय,करनी धरनी झाली, द्येवाच्या नावावर ट्रिप होईल,गनपती साटी का होईना घर साजरं दिसायला लागलं,पोराची दिवाळी हुनार पद्मिनीचं ते चार्वाकी तत्वज्ञान समजायला मला जरा उशीर झाला. पण समजलं तेव्हा मी बिनघोर झाले.
© सुश्री मीनाक्षी सरदेसाई
मोबाईल नंबर 9561582372, 8806955070
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈