श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “बिझी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
कंपनीत महत्वाची मिटिंग असल्यानं टेंशन होतं. गडबडीत आवराआवर करत असताना बायको म्हणाली, “ पुढचा सोमवार फ्री ठेव. आत्यांच्या मुलाचं लग्नयं. घरातलंच कार्य असल्यानं तुला यावं लागेल. नेहमीचं ‘बिझी’च कारण देऊ नकोस.”
“अजून चार दिवस आहेत..तेव्हाचं तेव्हा बघू ”
घराबाहेर पडलो. नंतर दिवसभर मीटिंग्ज, प्रेझेंटेशन, मोबाईलमध्ये बिझी झालो. रात्री उशिरा घरी आलो. भूक नव्हती पण उपाशी झोपू नये म्हणून दोन घास खाल्ले.
“ दुपारी काय जेवलास ? ”बायकोनं विचारलं.
“ जेवलो नाही पण सँडविचेस,वेफर्स आणि कॉफी……”
“ त्रास होतो.मग कशाला असलं खातोस? व्यवस्थित जेवायला काय होतं ? ”
“ अगं,आजचा दिवस खूप पॅक होता. क्लायंटबरोबर पाठोपाठ महत्वाच्या मिटिंग्ज् होत्या. वेळच मिळाला नाही.”
“ हे नेहमीचच झालंय. आठवड्यातले चार दिवस टिफिन न खाता परत आणतोस. दरवेळेस तीच कारणं…”
“ चिडू नकोस. सतत सटरफटर खाणं होतं म्हणून मग जेवायचं लक्षात राहत नाही. डार्लिंग,ऐक ना,आज खूप दमलोय.यावर नंतर बोलू.प्लीज..”–
“ आज लग्नाला यायला हवं होतसं. सगळे आलेले फक्त तू नव्हतास. प्रत्येकजण विचारत होता.”
“ महत्वाचं काम होतं.”
“ ते कधी नसतं?.”
“ तू,आई,बाबा होता ना… नाहीतरी मी तिथं बोर झालो असतो आणि एक लग्न अटेंड केलं नाही म्हणून काही बिघडत नाही.”
“ नातेसंबंध बिघडतात ”
“ स्पष्ट बोल ”
“ गेल्या दहा वर्षात तू सर्वच समारंभ चुकवलेत. नातेवाईकांशी तुझा कनेक्ट राहिलेला नाही.”
“ सो व्हॉट !! महत्वाची कामं होती म्हणून आलो नाही. त्याचा एवढा इश्यू कशाला? ”
“ कामं तर सगळ्यांनाच असतात. कंपनीच्या पलीकडं सुद्धा आयुष्य आहे.ऑफिसबरोबर घरच्यासुद्धा जबाबदाऱ्या असतात. कशाला महत्व द्यायचे हे समजलं पाहिजे.”
“ ऑफकोर्स, तेवढं समजतं. सध्या करियरचा पीक पिरीयड आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पर्सनल गोष्टी बाजूलाच ठेवाव्या लागतात.”
“ कंपनीत बाकीचे लोकपण आहेत ना ? ”
“ आहेत. कंपनीत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. सध्यातरी इतर गोष्टींपेक्षा कामाचं महत्व जास्त आहे.”
“ पस्तीशीतच घर, गाडी, बँक बॅलेन्स सर्व मिळवलंस. अजून काय पाहिजे ? थोडा दमानं. जे कमावलयं त्याचा तरी उपभोग घे.”
“ आराम वगैरे करायला आयुष्य पडलंय. लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाचा एक टप्पा झालाय. अजून बरंच काही मिळवायचयं. पन्नाशीला कुठं असणार हे ठरलंय.”
“ पन्नाशीचं प्लॅनिंग? बापरे इतक्या लांबचा विचार आताच कशाला? “
“ तुला कळणार नाही. आयुष्य कसं प्लान्ड असावं ”
“ माझ्याशीच लग्न करायचं याचंसुद्धा प्लॅनिंग केलं होतसं का? ”
“ हे बघ उगीच शब्दात पकडू नकोस ”
“ बरं !! गंमत केली. लगेच चिडू नकोस. एवढंच सांगायचयं की उद्याचा दिवस चांगला करताना ‘आज’ ला विसरु नकोस.”
“ पुन्हा तेच !! माझ्या प्रायोरीटीज ठरलेल्यात.”
“ तू स्वतःसकट आम्हांलाही खूप गृहीत धरतोस ”
“ म्हणजे ?”
“ प्रत्येकवेळी तुझ्या मनासारखं व्हायला पाहिजे हा हट्ट योग्य नाही. तुला माणसांची किंमत नाही ”
“ असं काही नाही. पैसा असला की माणसाला किंमत येते. आणि सध्या तोच कमावतोय.”
“ बरंच काही गमावतोस सुद्धा. घर, मुली,आईबाबा यांच्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही.”
“ तू आहेस ना ”
“ हो, मला पण आधाराची गरज लागते. मी एकटीच आहे ना. घरात आपण प्रवाशासारखं राहतोय ”
“ पुन्हा तीच रेकॉर्ड नको. अजून काही वर्ष तुला एडजेस्ट करावं लागेल. नो चॉइस !!”
“ आतापर्यंत तेच तर करतेय. आम्हांला नाही निदान स्वतःला तरी वेळ देशील की नाही ? ”
“ काय ते नीट सांग.”
“ आताशा फार चिडचिडा झालायेस. सतत अस्वस्थ, बेचैन, तणावाखाली असतोस. वेळेवर जेवत नाही की झोपत नाहीस. डोळ्याखाली काळी वर्तुळ झालीत. थोड चाललं की धाप लागतीय. तब्येत ठीक नाहीये. कामांच्या नादात दुखणं अंगावर काढू नकोस. मागे ब्लडप्रेशर वाढलं तेव्हाच डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं.. पण तू साफ दुर्लक्ष केलंस.”
“ आय एम फाइन ”
“ नो,यू आर नॉट. तुला त्रास होतोय पण कामाच्या नादात…..ऐक,डॉक्टरांकडे जाऊ या. सगळया तपासण्या करू.”
“ ओके, नक्की जाऊ. फक्त थोडे दिवस जाऊ दे. आत्ता खूपच बिझी आहे.”
“ कामं कधीच संपणार नाहीत. अजून वेळ गेलेली नाही. शरीरानं इंडिकेअटर्स दिलेत. कामाच्या बाबतीत जेवढा जागरूक आहेस तेवढाच तब्येतीबाबत बेफिकीर आहेस म्हणून काळजी वाटते.”
“ डोन्ट वरी, मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेतो तेव्हा डॉक्टरांकडे जाऊ ”
“ प्रॉमिस ? ” .. बायको.
“ हजार टक्के ”
बायकोला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळच आली नाही. खरं सांगायच तर दोन तीन दिवस तब्येत ठीक नव्हती. परंतु महत्वाच्या कामामुळे दुर्लक्ष केलं अन त्याच दिवशी मिटिंगमध्येच कोसळलो. डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. नंतर कळलं पॅरेलिसिसचा अटॅक आला. जीव वाचला परंतु उजवी बाजू निकामी झाली. जबरदस्त धक्का बसला. वास्तव स्वीकारायला फार त्रास झाला. उतारवयातल्या आजाराला तरुणपणीच गाठल्यानं खूप हताश, निराश झालो. एकांतात भरपूर रडलो, स्वतःला शिव्या घातल्या पण पश्चातापाव्यतिरिक्त हाती काही लागलं नाही. आयुष्य ३६० डिग्री अंशात बदललं. स्वतःला नको इतकं गृहीत धरलं त्याची शिक्षा मिळाली. आधी हॉस्पिटलमध्ये.. नंतर घरात असे दोन महीने काढल्यावर हल्लीच घराबाहेर पडायला लागलोय. संध्याकाळी काठी टेकवत हळूहळू चालतो तेव्हा लोकांच्या नजरेतील सहानभूती आणि कीव करण्याचा फार त्रास होतो. काही दिवसांपूर्वी खूप खूप बिझी असलेला मी आता वेळ कसा घालवायचा या विवंचनेत असतो. गॅलरीतून रस्त्यावर पाहताना बहुतेकजण माझ्यासारखेच वाटतात… सो कॉल्ड बिझी ….. उद्यासाठी आज जीव तोडून पळणारे….
…. एक महत्वाचं सांगायचं राहिलं .. .. माझ्या आयुष्यातील घडामोडीचा कंपनीच्या कामावर काहीही परिणाम झाला नाही. माणसं बदलून काम चालूच आहे. कुठंही अडलं नाही. मला मात्र उगीच वाटत होतं की…….
—
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈