श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ रामायण… ☆ श्री सुनील काळे ☆
माझ्या लहानपणी दर श्रावण महिन्यात आमच्या पाचगणीच्या घरी वर्षातून एकदा सत्यनारायणाची पुजा असायची. या संपूर्ण महिन्यात एका धार्मिक ग्रंथाचे रोज रात्री जेवणानंतर अध्यायवाचन व्हायचे. माझे वडील जरा धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनां फार उत्साह असायचा. एकत्र कुटूंब पद्धतीने आम्ही राहायचो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या भरपूर होती. त्यावेळी जेवणानंतर सगळेच्या सगळे एकत्र बसायचे. कान देऊन माना डोलवत सगळे ऐकत राहायचे. वडील प्रत्येक ओळ वाचली की सर्वानां अर्थ समजून सांगायचे. दरवर्षी कधी हरिविजय, रामायण किंवा नवनाथांच्या कथांचा अध्याय लावला जायचा. त्या प्रत्येक अध्यायावर पहिल्या पानावर ब्लॅक ॲन्ड व्हाईट पेनने काढलेली रेखाचित्रे असायची. मी चित्रे पहात बसायचो. कधी कधी पाचगणीच्या लायब्ररीत चांदोबा किंवा अमर चित्रकथेची कॉमिक्स वाचायला मिळायची. ग्रंथपाल असलेले कमरुद्दीनचाचा आम्हा लहान मुलानां ती पुस्तके फुकट वाचायला द्यायचे. त्यासाठी एक वेगळे कपाट विद्यार्थी वाचनालयात ठेवलेले असायचे.
बालवयात हाताने काढलेली ती रेखाचित्रे पाहून मी आचंबित व्हायचो. ती चित्रे पाहणे, त्याच्या कॉपी करणे, त्यांचा संग्रह करणे याचे नंतर वेडच लागले. पण आपणही कधी कॉमिक्स करू असे त्यावेळी जराही वाटले नाही.
पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थी सहाय्यक समिती व महानगरपालीकेच्या घोले रोडवरच्या आंबेडकर वसतिगृहात राहत होतो. त्या रस्त्यावर नेहमी येणे जाणे व्हायचे. कोणी तरी सांगितले अमर चित्रकथा या कॉमिक्स कंपनीची पुस्तकातील चित्रे काढणारे चित्रकार प्रताप मुळीक या रामचंद्र सभामंडपाच्या गल्लीतच राहतात. मग एकदा मोठा धीर एकवटून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरी गेलो. मला कामाची गरज तर होतीच पण त्यापेक्षा प्रताप मुळीक दिसतात कसे हे पाहण्याची उत्सुकता खूप होती. अतिशय शांत स्वभावाचे, उंच, सडपातळ शरीरयष्टी, पँट व पांढरा झब्बा घातलेले, बुल्गानिन दाढी व डोक्यावर उलट्या दिशेने फिरवलेले केस व मिस्किल हास्य असलेले मुळीक सर पहिल्याच भेटीत आवडले. आणि त्यांनी कसलीही अट न ठेवता त्यांच्या मुलाच्या मिलींद मुळीकच्या परस्पेक्टीव्ह रेंडरींगच्या कामासाठी स्टुडिओत येण्याची व काम करण्याची परवानगी देखील लगेच दिली.
प्रताप मुळीक एक अफाट अलौकीक बुद्धीचे व्यक्तिमत्व आहे हे लवकरच लक्षात आले. त्यांचा मानवी शरीरशास्त्र व पौराणिक चित्रकथा काढण्यासाठी लागणाऱ्या सर्वच क्षेत्रातील व्यासंगाचा आवाका फार मोठा आहे हे लक्षात आले. उदा. पुरातत्व विभागातील वस्तूंचा, इमारतींचा, यथार्थदर्शनशास्त्राचा (परस्पेक्टीव्हचा ) ऐतिहासिक वस्तूंचा, तलवारी पासून त्या त्या काळातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा, प्राण्यांचा, घोडागाडी ते अत्याधुनिक गन्स, रेल्वे, जीप्स, वाहने, झाडे, डोंगरदऱ्या, आभुषणे, वेशभूषा यांचा इतका प्रचंड अभ्यास होता की कॉमिक्सचे स्क्रिप्ट आले की दोन तीन तासातच त्यानां संपूर्ण कॉमिक्सची चित्रे डोळ्यांसमोर दिसत व त्याच्यां मुक्त फटकाऱ्यांच्या शैलीत राम, कृष्ण, बुद्ध, येशू, महावीर, वेगवेगळे संत, महंत, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक थोर साधुपुरुष, महाराणाप्रताप ते शुजा, इन्स्पेक्टर विक्रम, नागराज, अमिताभ, अशी अनेक दृश्य अदृश्य सजीव, निर्जिव काल्पनिक व वास्तव पात्रे कागदावर पेन्सिलने उमटत. कधी आकाशातून, कधी डोंगरावरून, कधी समोरून, कधी खूप खालून दिसणारी वेगवेगळया प्रतलांवरची त्यांनां चित्ररेखाटने सहज करताना पाहून पाहणाऱ्या आमच्यासारख्या नवशिक्या चित्रकारांचा मेंदू बधीर व्हायला लागायचा. वाटायचे किती काम करायला पाहीजे. सतत रेखाटने करायला हवीत. समोर दिसते ते दृश्य मग ते घर, ऑफीस, शाळा, इमारती, दुकाने, रेल्वेस्थानके, बसस्टॉप, झाडे, डोंगर जेजे समोर दिसेल तशी सतत रेखाटने करण्याची सवयच लागली. हात बंद असला तरी मेंदू व स्मरणशक्ती कधी बंद पडू देऊ नका असे बाबा नेहमी सांगायचे. त्यांचा मुलगा मिलिंद साधारण आमच्या वयाचा तो त्यानां बाबा म्हणायचा म्हणून आम्हीसुद्धा त्यांनां बाबा म्हणायचो. स्त्री असो वा पुरुष नुसती ॲक्शन महत्वाची नसते, नुसती शरीराची ठेवण महत्वाची नसते तर माणसे बोलतात कशी ? त्यांचे हातापायाची, बोटांची पेरे, पंजाची ठेवण कशी बदलतात यावर लक्ष द्यावे प्रत्येक चेहरा बोलतो तो नीट पहा असे ते शांतपणे सांगत. मानवी भावभावनांचा अभ्यास करून माणसाचे सुख, दुःख, राग, हास्य, आनंद, क्रौर्य, त्रास अशा भावना चेहऱ्यावर दिसल्या पाहिजेत, प्रत्येक अँगलने त्याचे निरिक्षण करायला पाहिजे यावर त्यांचा भर असे. माणसाची उंची व त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांचा पोशाख वेगवेगळा असला पाहिजे. समोरचा माणूस साधू असला तर त्याचा सात्विक भाव चेहऱ्यावर आला पाहिजे, दुष्ट वृत्तीचा, गुंड माणूस दाखवायचा असेल तर त्या व्यक्तिरेखेच्या पोशाखातून, त्याच्या ॲक्शनमधून त्याचे कॅरेक्टर दिसले पाहीजे त्यासाठी माणसांचे सतत निरिक्षणे करत राहा असे ते सांगत, पौराणिक मालीकांमध्ये कर्णभूषणे, गळ्यातील हार, हातातली अंगठी असो वा कपाळावरील गंध असो त्याकडे लक्ष द्या. तलवारीची रचना, रथ, त्यांचे घोडे, बैलगाडी, वाघ, सिंह यांचे डोळे त्यातील भाव चित्रात दिसले पाहिजेत अशा अनेक छोट्या गोष्टी स्टुडीओमध्ये रेखाटन करताना ते सांगत असत. ते आमच्यासाठी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.
आपणही कॉमिक्स क्षेत्रात काम करायचे असे मी ठरवले होते. त्यासाठी रात्ररात्र जागून शिवाजीनगरच्या बसस्टॉपवर आम्ही काही मित्रमंडळी स्केचिंग करत असायचो. पण माझे दुर्देव असे की शिकत असतानाच त्यानां हैदराबाद येथील मोठ्या कॉमिक्स बनवणाऱ्या कंपनीने बोलावून घेतले व प्रताप मुळीक सहकुटूंब हैदराबादला काही वर्षांसाठी शिफ्ट झाले व आमचा कॉमिक्स शिकण्याचा अभ्यासही थंडावला.
१९८७-८८ साली अभिनेता अरुण गोविल, दिपिका यांची रामानंद सागर दिग्दर्शक व निर्माते असलेली ‘ रामायण ‘ ही सिरियल टिव्हीवर खूप प्रसिद्ध झाली, खूप गाजली. त्या कलाकारांना घेऊन अमर चित्रकथा या कंपनीने एक कॉमिक्स केले होते. त्यावेळी मी देखील माझ्या अभ्यासासाठी मुळीकांचे एक हस्तलिखित कॉमिक्स तयार केले होते. त्या संपूर्ण कॉमिक्सची रेखाटने, त्याची कॅलिग्राफी, त्याचे मुखपृष्ठ, अगदी वेळ देऊन मन लावून करताना प्रचंड आनंद मिळाला होता. आज तीन तपानंतर ते हस्तलिखित, हस्तचित्रित, रोटरींग पेनने सुलेखन केलेले कॉमिक्स बाहेर काढले कारण त्याचा विषय होता ‘ रामायण ‘.
आज वाईला बाजारात गेलो होतो. सगळीकडे रांगोळ्या, भगवे झेंडे, गुढया, लहान मुलांच्या रामायणातील वेशभूषा, रामाची गाणी ऐकून व फेसबुकवरच्या अनेक चित्रकारांची रामायणावरील चित्रे पाहून मी केलेल्या सुनील कॉमिक्सची व मूळ चित्रकार प्रताप मुळीक बाबांची खूपच आठवण आली.
छतीस वर्षांपूर्वीचे एक हस्तलिखित कॉमिक्स माझ्या वडीलांची व प्रताप मुळीकांची आठवण करून गेले.
आता ती ध्यासाने पछाडलेली निरागस ध्येयवेडी माणसे काळाच्या पडद्याआड गेली.
आता उरल्या फक्त त्यांच्या आठवणी…. ‘ रामायण ‘ कॉमिक्सच्या रुपात…….
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566