श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-१ ☆ श्री सुनील काळे ☆
पाचगणी फेस्टिवल निमित्त तीन दिवस आलेल्या गणेश कोकरे व सिद्धांत पिसाळ यांचे अनुभव — पाचगणी या ठिकाणी लाईव्ह पेन्सिल स्केच करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले गेले होते. फेस्टिवल तीन तारखेला संपला व चार तारखेला सकाळी आम्ही महाबळेश्वर फिरण्याचे ठरविले. नऊच्या सुमारास आम्ही आमचे निसर्ग चित्रणाचे साहित्य बरोबर घेऊन मोटरसायकल वरून निघालो निसर्गाचा आनंद घेत घेत श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी पोहोचलो. गाडी पार्क केली व पायी चालत चालत कृष्णामाई मंदिर या ठिकाणी पोहोचलो. समोरचे निसर्ग सौंदर्य पाहून भारावून गेलो. माझा विषय ‘वारसा’ असल्यामुळे कृष्णामाई मंदिर मला खूपच आवडले. त्यामुळे लगेचच मी माझे निसर्गाचित्रणाचे साहित्य काढून एका कोपऱ्यामध्ये मंदिराचे स्केच करायला सुरुवात केली. कोणत्याही पर्यटकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊन मंदिर पूर्ण दिसेल अशा ठिकाणी बसलो. चित्र काढण्यात मग्न झालो सुंदर असा ठेवा समोर असल्यामुळे त्याचे चित्र रेखाटण्यात खूप आनंद होत होता माझ्याबरोबर सिद्धांत होता तो ही एका कोपऱ्यात बसून चित्र काढत बसला होता जवळजवळ वीस मिनिटे आम्हा दोघांनीही मंदिराचे पेन्सिल स्केच केले माझे स्केच पूर्ण झाल्यामुळे मी जलरंगात रंगविण्यासाठी माझी पॅलेट व रंग बाहेर काढले रंगाला सुरुवात करणार तेवढ्यात लोंढे मॅडम आल्या व म्हणाल्या तुम्हाला या ठिकाणी चित्र काढता येणार नाही त्यांनी बंद करण्यास सांगितले काढलेले स्केच पुसून टाका असी तंबी दिली. मी छान चित्र झाल्यामुळे त्यांना विनंती केली चित्र काढायला कुठेही बंदी नसते पर्यटक सुद्धा फोटो काढत आहेत चित्र काढणे हा गुन्हा नाही. त्या खूपच भडकल्या चित्र पुसता येत नाही बहुतेक तुम्हाला म्हणून त्यांनी स्वतः खोडरबर हातात घेतला व चित्र खोडून काढले .मग चित्र पुसल्यावर तुम्ही इथे थांबू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे धमकावले व आम्हाला हाकलून दिले आम्ही त्यांना विनंती करत होतो तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवर परवानगी मिळवून द्या त्यांना आमचे कार्डही दिले मी कास पठार परिसरातील रहिवासी आहे ओळखपत्रही दाखवले फोन मधील मंदिरांची चित्रही दाखविली त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. चित्र काढू नका असा बोर्डही नाही म्हणाल्यावर त्यांनी आम्हाला तिथे थांबूच नका असे सांगितले मुंबईवरून परवानगी आणा असे सांगितले आम्ही त्यांच्याकडून लोंढे सरांचा नंबर घेतला त्यांनाही फोन केला परंतु त्यांनीही उलट सुलट उत्तरे देऊन फोन बंद केला आम्ही आमचे साहित्य गोळा केले पुसलेले स्केच घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेलो.
. . . .
क्षेत्र महाबळेश्वर (कृष्णामाई मंदिर) या ठिकाणी चित्र काढत असताना आलेला एक अनुभव
— गणेश तुकाराम कोकरे
शिक्षण : G.D.Art
व्यवसाय : चित्रकार (सातारा)
काही दिवसांपूर्वी मला व्हॉटसॲपवर माझ्या सातारा येथील या चित्रकार मित्राने हा मेसेज पाठवला . खूप वाईट वाटले . शासकीय व्यवस्थेविषयी खूप राग , संताप आला . हतबलता आली .मग जेष्ठ चित्रकार वासुदेव कामत , गायत्री मेहता यांच्याशी फोनवर बोललो . पण सर्वांना आलेले अनुभव सारखेच होते . सत्तेपुढे शहाणपण चालत नाही . मला सांगा या मंदिराचे प्रोफेशनल कॅमेऱ्याने फोटो काढले तर चालतात , व्हिडीओ शुटींग केले तरी चालते मग चित्रकाराने चित्र काढले तर काय त्रास होतो? एखादया चित्रकाराची दोन चार तासाची मेहनत खोडून टाकणारे हात किती अरसिक , असंस्कृत , क्रूर असतील .
एकदा सकाळी फिरत असताना मेणवलीच्या वाड्याजवळ 4 “x 6 ” इंच इतक्या छोट्या आकाराचे पेनमध्ये स्केच करत होतो . इतक्यात केअरटेकर बाई आली. तिने चित्रकाम अर्ध्यातच आडवले . अशोक फडणीसांची परवानगी घ्यावी लागेल म्हणाली म्हणून फोन केला तर फडणीस म्हणाले चित्रकार येतात , चित्र काढतात, प्रदर्शनात मांडतात, लाखो रुपये कमवतात मग आम्हाला काय मिळणार ? मी म्हणालो तुम्हाला शुटींगचे दिवसाला एक लाख रुपये मिळतात , वाडा पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांकडून तीस रुपये गाडी पार्किंगचे व पन्नास रुपये प्रवेशमूल्य घेता मग चित्रकारांकडून पैसे का घेता ? तर म्हणाले आता प्रथम अर्ज करा नंतर चित्राची साईज , कोणत्या माध्यमात चित्र काढले आहे ते तपासून विक्रीची किंमत पाहून आमचे कमीतकमी पाचहजार तरी द्या व लेखी परवानगी घेऊन अर्ज देवूनच नंतर चित्र काढायला या. मग तेथे लगेच चित्रकाम थांबवले .परत वाड्यात व मेणवली घाटावर खास चित्र काढायला गेलोच नाही . 4 ” x 6″ इंचाच्या छोट्या पेनने रेखाटलेल्या चित्राची किंमत किती असते ? मी मलाच प्रश्न विचारला ? खरंच चित्रकाराला रोज पाच हजार रुपये मिळाले असते तर तो किती श्रीमंत झाला असता ? अशी रोज चित्रे घेणारा कोणी मिळाला तर मी रोज घाटावरच चित्र काढत बसलो असतो . किती चित्रकार करोडपती झाले याचे अशोक फडणीसांनी संशोधन ,सर्वे केला पाहिजे तरच खरी चित्रकार मंडळी कोणत्या परिस्थितीत जगतात हे त्यांनां कळेल .
खरं तर तो चित्रकार त्या रेखाटनातून आनंद मिळवतो . त्याच्या रियाजाचा अभ्यासाचा तो एक भाग असतो . शिवाय आपल्या चित्रातून तो स्पॉट ते ठिकाण अजरामर करतो. तो ऐतिहासिक ठेवा होतो . नंतर कितीतरी वर्षांनी ते स्केच , चित्र एक महत्वाचे डॉक्यूमेंटच ठरते .
पण पैसा महत्वाचा ठरतो . लालफितीच्या सरकारी नियमांविषयी तर काय बोलावे ? आता घाटावर वॉचमन असतो . मोबाईलने फोटो काढले तर चालतात पण मोठा कॅमेरा दिसला की तो अडवतो , प्रथम पाचशे रुपये द्यावे लागतात मग कितीही फोटो काढले व्हिडीओ शुटींग केले तरी चालते. हा मेणवलीचा एक अनुभव सांगतोय असे कितीतरी त्रासदायक अनुभव माझ्या मनात साचलेले आहेत .अनेक कलाकारानां असे अनुभव येत असतात .
एक चित्रकार प्रथम स्पॉटवर जाणार , त्याचे निरिक्षण व अभ्यास करणार , नंतर चित्रांचे सामान आणून संपूर्ण दिवसभर भटकत वेगवेगळ्या अँगलने रेखाटन करणार व नंतर एक फायनल रंगीतचित्र तयार करणार . या कष्टांचे मोल समजणारी माणसे संपली की काय असे वाटते .
प्रदर्शन करणे म्हणजे एक लग्नकार्य करण्यासारखे असते . मुंबईत प्रथम दोनचार वर्ष बुकींग करून अगोदरच पैसे भरून मिळेल ती तारीख स्विकारावी लागते कारण आपल्याला सोयीच्या मुहूर्तावर हव्या त्या तारखा तर कधी मिळत नाहीत . ते देतील ती तारीख घ्यावी लागते . मग तो भर पावसाळा असो की ऑफ सिझन असो . प्रथम चित्र तयार करायची . त्यासाठी हार्डबोर्ड , ग्लास , माऊंटींग करून फ्रेमिंग करून घ्यायचे . फ्रेमर्सकडे तेवढी जागा नसते म्हणून चित्रे परत घरी आणायची .प्रवासात नुकसान होऊ नये म्हणून बबलशीटमध्ये परत पॅकींग करायची . मग प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका किंवा रंगीत ब्रोशर्स छापायचे नंतर बायर्स लिस्ट मिळवून सर्वानां पोस्टाने किंवा कुरीअरने पाठवायचे . प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्य अतिथी शोधायचे.. त्या कार्यक्रमांची तयारी करायची .
– क्रमशः भाग पहिला
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566