सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 13 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
सौ.अंजली गोखले
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
प्रात्यक्षिक परीक्षेची माझी तयारी जोमाने सुरु होती. माझी त्या बद्दलची मनातली भीती ही पूर्ण निघून गेली. केव्हा एकदा परीक्षक येतात आणि माझी परीक्षा घेतात याची मला उत्सुकता लागून राहिली.
मनामध्ये लेखी परीक्षेची मात्र धाकधूक होतीच. आत्तापर्यंत पूर्ण दृष्टी गेल्यानंतर चौथी ते बीए पर्यंतच्या सगळ्या परीक्षा मी खालच्या वर्गातील लेखनिक अर्थात रायटरच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. आता मात्र एम ए या परीक्षेसाठी असणारा अभ्यास, हा वरच्या पातळीवरचा होता. त्यासाठी मला संदर्भग्रंथ ही वाचून घ्यावे लागणार होते. त्यासाठी रोज दुपारी गोखले काकून बरोबर तीन ते साडेचार पर्यंत जोरदार वाचन सुरू झाले होते. आमची खरी कसरत होती ती तत्त्वज्ञानाचे गाढे, जाडजूड पुस्तक वाचताना आणि ऐकताना. त्यामधली गूढ तत्वे, अवघड विचार बोजड नावे आणि त्यातल्या संकल्पना मधली जटिलता डोक्यात लवकर शिरू शकत नव्हती. आम्हाला हे जड जाते, लवकर लक्षात येत नाही हे समजल्यावर आम्हा दोघींनाही हसू येत होते. पण नेटाने वाचन मात्र आम्ही सुरुच ठेवले. हा किचकट अभ्यास सुरू असताना अधेमधे कधी आई, तर कधी बाबा आम्हाला वेलची घातलेला चहा, आल घातलेलं थंडगार लिंबू सरबत देऊन आम्हाला उत्साही करत असत. गोखले काकू जेव्हा वाचन करत असत, त्यावेळी मी माझ्या टेप रेकॉर्ड वर त्याच्या कॅसेट्स बनवून घेत असे आणि मला वेळ मिळाल्यावर ते ऐकून माझ्या मेंदूमध्ये मी सेव्ह करून ठेवत होते. असा सगळ्या विषयांचा माझा अभ्यास वेग घेत होता.
टी म वी म्हणजे ज्या विद्यापीठाचे परीक्षा देत होते त्यांचेही सहकार्य मला खूप लाभले होते. पेपर मध्ये प्रश्नांचा अंदाज येण्यासाठी, मी फोन करून आधीच्या परीक्षांचे पेपर्स मागवून घेत असे. ते हि ते लगेच पाठवून देत. थोड्या वेळ झाला तरी माझा फोन लगेच गेलाच म्हणून समजा. त्यांनाही माझा आवाज ओळखीचा झाला होता. मी पूर्ण अंध असूनही स्वतः फोन करते याचे कौतुक वाटून ते मला त्वरित मदत करत असत.
प्रत्यक्ष परीक्षा देण्याकरता, मला रायटर ची जुळवाजुळव आधीच करून ठेवावी लागणार होती. मला लेखनिक असा हवा होता की त्याचे अक्षर चांगले असेल, जो मी सांगितल्या सांगितल्या त्याच वेगाने भरभर लिहून काढेल. तो किंवा ती माझ्यापेक्षा वयाने आणि शिक्षणाने लहान असेल. परमेश्वर कृपेने श्रद्धा म्हस्कर नावाची मुलगी मला भेटली, माझी मैत्रीण झाली आणि तिने माझे पेपर्स, माझ्या मनाप्रमाणे उत्तम तऱ्हेने लिहून काढले. लेखी परीक्षा अशी कडक होती ज्यामध्ये मी आणि श्रद्धा हॉलमध्ये दोघीच असू आणि परीक्षक आमच्या मागेच बसलेले असत. मी सांगते ती प्रत्येक ओळ न् ओळ, शब्दन शब्द श्रद्धा लिहिते ना, आणखी दुसरे काही वाचत तर नाही ना, यावर त्यांची कडक नजर असे. अशा तऱ्हेने माझी. प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा उत्तम रित्या पार पडली.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈