श्री सुनील शिरवाडकर
☆ लाखमोलाची पुडी… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
माझा एक मित्र आहे. अवि नावाचा.आयुर्वेदाचा डॉक्टर आहे तो.आता डॉक्टरच म्हटल्यावर काही ना काही कारणाने त्याच्याकडे जाणे होतेच.
त्याच्याकडे गेले की नेहमीचे दृश्य. पितळी खलबत्त्यात तो औषधे कुटत असतो.बाजुच्या टेबलवर कागदाचे चौकोनी तुकडे मांडून ठेवलेले असतात.साधारण पंचवीस तीस तुकडे.तीन बाय तीन इंचाचे.औषध कुटुन झाल्यावर तो त्या प्रत्येक कागदावर ती पुड टाकत जातो. अगदीच समप्रमाणात. बरोबर शेवटच्या कागदापर्यंत पुरतं ते औषध. समोरच एक लाकडी मांडणी. त्यात छोट्या छोट्या डब्या. औषधांच्याच. एखादी डबी घ्यायची. त्यातील एक एक गोळी प्रत्येक कागदावर ठेवायची. मधुनच पेशंट अजुन काही तरी एखादी तब्येतीची तक्रार सांगतो.
“ठिकेय..देतो औषध त्याच्यातच टाकून”
मग अजुन एखाद्या डबी उघडतो.बारीक चमचाच्या टोकाने कुठली तरी पुड त्या कागदांवर टाकतो.काळी पुड..तपकिरी पुड..लाल गोळी.. पांढरी गोळी.. प्रत्येक कागदावर आहे ना हे बघतो.सगळी औषध योजना मनासारखी झाली याची खात्री पटली की एक एक पुडी बांधायला घेतो.
अगदी कुशलतेने तीन चार घड्या घातल्या की इंचभर लांबीची अगदी घट्ट पुडी तयार होते. एवढ्या पुड्या बांधायला वेळ लागतोच.एकदा मी त्याच्या मदतीला धावलो.माझा व्यवसाय सोनाराचा.सोन्याच्या दागिन्यांच्या पुड्या बांधायची सवय असतेच.तसं अवीला..म्हणजे डॉक्टरांना सांगितलं.
तो म्हणाला..
“अरे बाबा..तुमच्या पुड्या म्हणजे लाखमोलाच्या पुड्या..”
छोटी असते ती पुडी.. मोठा असतो तो पुडा. पण ते बांधणे म्हणजे कौशल्याचेच काम.किराणा दुकानात आता सगळं वाणसामान पैक केलेलं असतं,पण पुर्वी गिर्हाईकाच्या ऑर्डर नुसार बांधुन द्यायचे.राजाभाऊ जोशींचं किराणा दुकान होतं आमच्या गल्लीत. काही आणायला गेलं की ते ,पेपर घेऊन त्याच्या बाजुची पट्टी टर्रकन फाडायचे.ती त्या पेपरवर ठेऊन काट्यामध्ये ठेवायचे.मग रवा,साखर काय असेल ते काट्यामध्ये टाकुन वजन झाले की तो कागद अगदी कुशलतेने उचलुन दोन्ही हात उंचावून त्याच्या घट्ट पुडा बांधायचे.त्यावर एकावर एक दोर्याचे फेरे लपेटायचे..दोर्याचा बंडल दिसायचा नाही.प्रश्न पडायचा की हा दोरा येतोय कुठुन.पण असा छान आणि घट्ट पुडा बांधायचे ना ते..कुठुन कागदाच्या फटीतून रवा साखर बाहेर येण्याची शक्यताच नाही.
कधी चिवडा आणायला जावे.त्याचाही पुडा असाच बांधायचे.फक्त दोऱ्याचे चार पाच वेढे झाले की लाल रंगाचा चतकोर कागदी तुकडा त्यावर ठेवायचे.’कोंडाजी यांचा उत्तम चिवडा’..फेटा घातलेल्या कोंडाजी पहिलवानाचा फोटो.. त्या कागदावरुन पुन्हा दोरा गुंडाळायचे.नाशिक चिवड्याचा हा पुडा अखिल भारतात तेव्हापासून प्रसिद्ध होता.
कितीतरी पुडे आठवतात.कधी संध्याकाळी येताना गजरा आणावा. वेडावून टाकणारा मोगऱ्याचा गंध.हिरव्या मोठ्या पानात ठेऊन त्याची हलक्या हाताने बांधलेली पुडी. आतल्या नाजुक कळ्या कोमेजून जाऊ नाही म्हणून. हळुवारपणे तो खिशात ठेऊन आणायचो.
गुरुवारी एकमुखी दत्ताच्या दर्शनाचा नेम.जाताना रामसेतुजवळच्या पांडे मिठाई कडून पळसाच्या पानात बांधलेले चार पेढे. दत्तापुढे उघडून ठेवलेली ती पुडी. छोटासा गाभारा..धुपाच्या सुगंधाने भरलेला.. आणि भारलेला.सगळी मुर्ती फुलांना झाकुन गेलेली. त्यातून दिसणारा दत्ताचा तो तेजस्वी चेहरा.पाठीमागून येणारा ‘दिगंबरा..दिगंबरा..’ चा गजर..
दोरा न वापरता पुडी बांधणे ही एक कलाच आहे. आमचा व्यवसाय सोनारकामाचा. पुर्वी धर्मकाट्यावर वजन करण्यासाठी जावे लागायचे. म्हटलं तर खुप अवघड काम. तिथे गर्दीत उभं रहायचं..आपला नंबर आला की हळुच पुडी उघडायची..त्यातले सोन्याचे मणी तिथल्या लहान वाटीत टाकायचे..वजन झालं की पुन्हा त्याची पुडी बांधायची.हे सगळं गर्दीत.. उभ्यानेच. एखादा मणी सुध्दा खाली पडता कामा नये.
पण एक गोष्ट नक्की. सोन्याच्या दागिन्यांची पुडी बांधावी तर आमच्या दादांनीच..म्हणजे वडिलांनी.
पेपरचा साधासाच चौकोनी कागद.. त्यावर त्याच आकाराचा गुलाबी कागद. या गुलाबी कागदाची रंगछटा खुपच आगळी. त्यावर सोन्याचा दागिना जेवढा खुलुन दिसतो ना..तेवढा कशावरच नाही. तर त्या गुलाबी कागदावर ठेवलेलं ते गंठण.सोन्याच्या तारेत गुंफलेलं..खाली ठसठशीत मंगळसूत्राच्या दोन वाट्या.अतिशय सुबकपणे एक उजवी घडी..एक डावी घडी घालत दादा त्याची पुडी बांधत. त्यातही एक नजाकत होती.आजकालच्या शेकडो रुपयांच्या ज्वेलरी बॉक्सला मागे सारणारी ती मंगळसूत्राची पुडी.. अवी म्हणतो तश्शीच…. अगदी ‘लाखमोलाची पुडी’
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈