सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ बदलते रंग रूप केसांचे ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

केस विंचरताना छोटे झालेले, काहीसे पांढरे आणि थोडे कुरळे केस विंचरताना मनात आलं की, हेच का ते आपले लांब सडक केस! त्यांची आता रया गेली आहे! विचार करता करता केसांचा जीवनातील बदल माझ्या डोळ्यासमोर येत गेला….

बाळ जन्माला आलं की त्याला बघायला येणारे लोक त्याचा रंग,नाक, डोळे याबरोबरच त्याच्या जावळावर चर्चा करीत असतात.

एखाद्या बाळाला खूप जावळ असते तर एखादे बाळ एकदम टकलू असते! मग त्यावरून ते कोणाच्या वळणावर गेलं आहे, यावर बायका चवी चवीने बोलत असतात. त्यातून ती मुलगी असेल तर बघायलाच नको. तिची आजी तिच्या लांब सडक होणाऱ्या केसांची वेणी घालण्याची स्वप्ने बघू लागते. साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी लांब सडक केस हे सौंदर्याचे लक्षण मानले जाई. अंबाडा, खोपा यातून बाहेर येऊन स्त्रिया लांब सडक वेणी कडे वळल्या होत्या तो काळ! अजूनही दक्षिणेत लांब सडक केसांचे महत्त्व जास्त दिसते आणि त्या केसावर कायमच गजरा आणि फुले माळली जातात.

माझ्या लहानपणी आई आणि आजी दोघी बेळगाव, रत्नागिरी भागात राहिलेल्या असल्याने केसांचे कौतुक फार! दर रविवारी सकाळी केसांना तेल चोपडले जाई. पाटावर बसायचं, चार बोटं तेलाची जमिनीवर टेकवायची आणि केसांनाच काय पण हात पाय, पाठ, तेल लावून चोळून घ्यायचं! तेव्हा ते नको वाटायचं, पण सक्तीचंच असे. नंतर बंब भर पाणी तापवलेले असे. गवला कचरा (सुगंधी वनस्पती) घालून केलेली शिकेकाई  आमच्याकडे भरपूर असे. मग काय अभ्यंग स्नानाचा थाट!

कोकणात पावसाच्या दिवसात केस वाळायचे नाहीत म्हणून आई तव्यावर थोडे निखारे टाकून त्यात धूप घालायची, त्यावर एक टोपले पालथे घालून मंद आचेवर केस सुकवून द्यायची.तेव्हा त्याचा असा काही सुगंध घरभर दरवळायचा की बस! अजून ते सुगंधी दिवस आठवतात!

ओले केस वाळवण्यासाठी त्याची बट वेणी घालून दुपारपर्यंत केस वाळले की  आई केसांच्या कधी दोन तर कधी चार वेण्या घालून द्यायची. घरातल्या फुलांचा गजरा माळला की, इतर कोणत्याही वेशभूषाची गरज लागायची नाही. आम्हा सर्व मैत्रिणीचे केस लांब सडक होते, पण देशावर आल्यावर हे सर्व बदलले. कोकणात पाणी आणि हवा लांब केसाला पोषक आहे, तसेच जे लोक मासे खातात त्यांचे केस तर विशेष तुकतुकीत असतात! असे हे लांब केस मिरवीत माझे कॉलेज शिक्षण संपले.

लग्नात लांब केसांची वेणी घालून उभी राहिले. मुलीचे लांब केस ही जणू लग्नातली एक अटच वाटत असे त्याकाळी! पुढे बाळंतपणात केसांची लांबी आणि जाडी थोडी कमी झाली. आणि केसांचे प्रेम ही कमी झाले .चाळीशी च्या आसपास केसांचे शेंडे कमी केले की केस वाढतात असा समज होता आणि नाहीच वाढले तर आणखी थोडे कापून “पोनि टेल” वर येतात, तसंच माझं झालं! केसात रुपेरी चांदी दिसू लागल्यावर इतक्यात पांढरे केस दिसायला नको म्हणून वेगवेगळे डाय आणि मेहंदी लावली. त्याचा परिणाम म्हणून केस आणखीनच  कमी होऊ लागले. माझे मोठे दीर म्हणायचे,

“Once you dye, you have to dye, until you die..!”

तसं केसांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. केसाचा अनुवंशिक गुण हाही महत्त्वाचा आहे .काहींचे केस मुळातच दाट असतात तर काहींचे मुळातच विरळ असतात. माझ्या परिचयातील कोकणातील एक आजी साठीच्या होत्या, पण त्यांचे केस पांढरे शुभ्र झाले तरी लांब सडक होते, तर दुसऱ्या आजी  85 वर्षाच्या होत्या, तरी केस लांब आणि काळेभोर होते. एकंदरीत कोकणातील स्त्रियांचे केस खास असत!

अलीकडे प्रदूषण, हवेतील रखरखीत पणा, तेल न लावणे यामुळे केसांची वाढ कमी झाली आहे असे वाटते. केसांची निगा राखायला वेळ मिळत नाही आणि आधुनिकतेच्या नावाखाली केस कापणे ओघानेच होत आहे. अर्थात कापलेले केस ही मेंटेन करावे लागतात. नाहीतर आमच्या आईच्या भाषेत डोक्याचा अगदी “शिपतर”(टोपले )झालंय असं म्हटलं जाई! अगदी जन्मापासून केसांमध्ये असा हळूहळू बदल होत जातो. वयाबरोबर केसांची रया जाते.

नकळत आरशात बघताना  किती उन्हाळे- पावसाळे या केसांनी पाहिले हे जाणवते आणि नुसत्या उन्हा पावसानेच नाही तर अनुभवाने हे पांढरे झालेले केस विचारांची परिपक्वता दाखवत डोक्यावर शिल्लक आहेत असे उगीचच वाटते! असो, कालाय तस्मै  नमः! केसासारख्या छोट्याशा नाजूक विषयावर सुद्धा त्याच्या बदलत्या रंग रूपाचं वर्णन हे असं करावसं  वाटले !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments